

Wadegaon College Case
esakal
वाडेगाव : महाविद्यालय सुरू करण्यासाठी दान दिलेल्या ०.५ आर जमिनीऐवजी ५० आर जमीन असल्याचे कथित बनावट कागदपत्र तयार करून विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी श्रीधर वामनराव भटकर यांच्या तक्रारीवरून बोधिसत्व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वाशिमचे अध्यक्ष अनिल लक्ष्मण इंगळे यांच्याविरुद्ध बाळापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ४६५, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भटकर यांनी १३ सप्टेंबर रोजी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, वाडेगाव भाग क्रमांक १ मधील गट क्रमांक ६९ मधील त्यांच्या एक हेक्टर २६ आर शेतीपैकी ०.५ आर जमीन त्यांनी बोधिसत्व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल इंगळे यांना एल.एन. कला महाविद्यालयाच्या इमारतीसाठी ५ जानेवारी २०१३ रोजी दानपत्राद्वारे दिली होती. संबंधित दानपत्राची नोंद दुय्यम निबंधक कार्यालय, बाळापूर येथे झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, याच जमिनीबाबत कागदपत्रांमध्ये फेरफार करून ०.५ आरऐवजी ५० आर जमीन असल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कागदपत्रांच्या आधारे दुर्गाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
तसेच नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक निकष पूर्ण करण्याच्या उद्देशाने युनियन बँक ऑफ इंडिया, वाशिम शाखेतील सात लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे (एफडी) असल्याचे दर्शविणारे कागदपत्र सादर करण्यात आल्याचा आरोप असून, ही कागदपत्रेही बनावट असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील कागदपत्रांची माहिती अधिकारातून मागविण्यात आली असून, त्यांची पाहणी केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन व पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक विनोद खाडे करीत आहेत.
नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक निकष पूर्ण करण्याच्या उद्देशाने सात लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे कागदपत्र सादर केल्याचा आरोप तक्रारीत आहे. संबंधित एफडीचे कागदपत्र बनावट असल्याचा दावाही करण्यात आला असून, पोलिस तपासात त्याची सत्यता स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र, महाविद्यालयाच्या परवानगी प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप गंभीर असल्याने पोलिस प्रशासन व विद्यापीठाने या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.