Prabhakar-Tondare 
अ‍ॅग्रो

बिगर हंगामी भाजीपाला पीकपद्धतीतून आर्थिक सक्षमता

धोंडोपंत कुलकर्णी

लातूर जिल्ह्यात जांब (ता. अहमदपूर) येथील प्रभाकर तोंडारे यांनी परिसरातील सोयाबीन, तूर आदी पिकांच्या मागे न लागता आपल्या सहा एकरांत केवळ तीन ते चार प्रकारच्या भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित केले. बाजारपेठेतील विविध कालावधीत मिळणारे दर अभ्यासून बिगरहंगामी पद्धतीच्या लागवडीवर भर देत कलिंगड, टोमॅटो, दोडका अशी पिके निवडली. त्यातून वर्षाचे आर्थिक गणित त्यांनी स्थिरस्थावर केले आहे.

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील जांब भागात सोयाबीन, तूर आदी मुख्य पिके घेतली जातात. याच गावातील प्रभाकर तोंडारे यांची सहा एकर शेती आहे. पारंपरिक हंगामी पिकांपेक्षा अधिक फायदा देऊ शकणाऱ्या पिकांचा त्यांनी अधिक विचार केला. त्यातही बाजारपेठेत कोणत्या महिन्यात कोणत्या मालाला किती मागणी व दर असतात याचा अभ्यास केला. त्या दृष्टीने ठरावीक पिकांची निवड केली. 

कलिंगडाची बिगर हंगामी शेती 
तोंडारे म्हणतात की, कलिंगडाचे पीक उन्हाळ्यात केले जात असले तरी त्यास किलोला सहा ते सात रुपयांच्या दरम्यानच दर मिळतात, असा अनुभव आहे. त्या तुलनेत नवरात्रातील उपवासांच्या कालावधीत फळांना चांगली मागणी असते. त्यामध्ये कलिंगडाचा उठाव होऊ शकतो हे त्यांनी जाणले. त्यादृष्टीने जुलै १२ च्या दरम्यान लागवड करण्यास सुरवात केली. पावसाळ्याच्या हंगामात सहसा शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल नसतो. पावसाळ्यात उत्पादनात घट येण्याचाही धोका असतो. मात्र तोंडारी यांनी त्याचे योग्य नियोजन करून नवरात्रीच्या काळात आपला माल बाजारात आणण्यास सुरवात केली आहे. 

एकरी तीस टन उत्पादन 
दरवर्षी कलिंगडाचे एकरी तीस टनांपर्यंत उत्पादन घेत असल्याचे तोंडारी सांगतात. यंदा मात्र पावसाळ्यात झालेल्या नुकसानीमुळे एकरी २१ टनांपर्यंतच उत्पादन मिळाले. किलोला पंधरा रुपये दर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र मागील आठवड्यातील पावसामुळे दर घसरला. ए ग्रेडच्या मालाचे बारा टन उत्पादन मिळाले. त्याला जागेवरच दहा रुपये दर मिळाला.

मुंबईच्या व्यापाऱ्याने थेट खरेदी केली. बी ग्रेडच्या मालाचे ८ टन तर सी ग्रेडच्या मालाचे एक टन उत्पादन मिळाले. त्यांना अनुक्रमे सहा व तीन रुपये दर मिळाला. उत्पादन खर्च ६० हजार रुपये वजा जाता एकरी एक लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला. पावसाळ्यातील वातावरणामुळे कलिंगडाला कमी गोडी मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र तोंडारी यांनी पिकललेले कलिंगड मधुर स्वादाचे होते. त्याचे वजन ४ ते ५ किलोपर्यंत मिळाले होते.

बिगर हंगामातील भाजीपाला 
अन्य भाजीपालाही बिगर हंगामी घेण्याची तोंडारी यांची पद्धत आहे. प्रत्येक पिकासाठी ते सुमारे एक एकरच क्षेत्र देतात. टोमॅटो जूनच्यादरम्यान घेतल्यास त्याला दर कमी मिळतात हे अभ्यासून त्यांनी ऑगस्टमधील लागवडीला प्राधान्य दिले. हा टोमॅटो ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात बाजारात येतो व त्याला प्रति क्रेट ५०० ते १००० रुपयांपर्यंतचा दर मिळतो असे तोंडारी यांनी सांगितले. एकरी दरवर्षी सुमारे दोन हजार क्रेट उत्पादन त्यांना मिळते. दिल्ली येथील व्यापारी जागेवरूच माल खरेदी करतात. एकरी एक लाख रुपयांचा खर्च वजा जाता बाजारपेठेतील दरांच्या चढउतारावर ७५ हजार ते एक लाख रुपये एकरी नफा मिळतो. 

कांदा व दोडका 
जोडीला खरीप कांदाही असतो. त्याचे एकरी २०० क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. त्यास किलोला सरासरी आठ रुपये दर मिळतो. दोडका हेदेखील हुकमी पीक झाले आहे. या पिकाची लागवडही एकरभरातच व ऑगस्टमध्ये होते. हे पीकदेखील तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळवून देते. किलोला २५ ते ३० रुपये दर मिळतो.

पिकांमधील नुकसानीचे अनुभव लक्षात घेऊन मिरचीसारखे पीकही बदलले जाते. हे पीकही एक लाख रुपयांचे उत्पन्न देऊ शकते. सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाचे हंगामी पीक असल्याने त्यातूनही नफा कमावण्यात येतो. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्याने या हंगामात कोणतही पीक घेण्यात येत नाही. अशा रितीने वर्षभर चार ते पाच पिकांची नियमित घडी बसवून आर्थिक ताळेबंद घातला आहे. नांदेड, लातूर, अहमदपूर आदी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. आंध्र प्रदेशातील निजामाबाद येथेही गरजेनुसार माल पाठवला जातो. आपल्या शेतीतील पद्धतशीर नियोजनातून परिसरात तोंडारी यांनी ओळख तयार केली आहे.

शेतीतून प्रगती 
शेतीतील उत्पन्नातूनच दोन मुलांना लातूर येथे शिक्षणासाठी ठेवणे शक्य झाले. पाण्यासाठी पाइपलाइन केली. मुलीचे लग्न करता आले. कोणतेही कर्ज डोक्यावर नाही. केवळ बाजारपेठांचा अभ्यास करून भाजीपाला पिकांचे नियोजन करीत राहिल्याने आर्थिक सक्षमतेपर्यंत पोचणे शक्य झाले. 
-  प्रभाकर सदाशिव तोंडारे, ८८८८१६७२७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT