Agriculture success story in Marathi Gokulam Gaurakshan Sanstha
Agriculture success story in Marathi Gokulam Gaurakshan Sanstha 
अ‍ॅग्रो

गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम गोरक्षण'चे व्रत

विनोद इंगोले

नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम गोरक्षण संस्थेने भाकड आणि वयस्क गाई, बैलांच्या संगोपनासाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेने अपघात तसेच इतर कारणांमुळे जखमी झालेल्या जनावरांसाठी रुग्णवाहिका, तसेच आधुनिक उपचार पद्धतीची सोय उपलब्ध करून दिली आहे. गवळाऊ गोवंश संवर्धन आणि शेतकरी प्रशिक्षणासाठी संस्थेने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.

राज्यात भाकड गाई आणि शेतीकामी उपयोगी न पडणाऱ्या बैलांच्या संगोपनाचा मोठा प्रश्‍न आहे. अशा जनावरांच्या व्यवस्थापनाकडे लोकांचे दुर्लक्ष होत आहे. याची दखल घेत डॉ. हेमंत मुरके यांनी गोकुलम गोरक्षण संस्था उभारण्याचा निर्णय घेतला. मित्र आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या सहकार्याने संस्थेची नोंदणी केली. त्यानंतर २०१३ मध्ये अमरावती- चांदुरबाजार मार्गावर गोकुलम गोरक्षण संस्थेची गोशाळा उभारली. या प्रकल्पाकरिता डॉ. हेमंत मुरके यांनी स्वतःची तीस एकर शेतजमीन दिली आहे. सध्या या संस्थेचे अध्यक्ष डॉ. हेमंत मुरके आहेत. इतर सदस्यांच्या मदतीने त्यांनी ही संस्था चांगल्या प्रकारे चालविलेली आहे.  
 
जनावरांकरिता मुक्त संचार गोठा  

संस्थेने प्रक्षेत्रावर दहा गोठे उभारले आहेत. या गोठ्यांमध्ये जनावरांना चारा व पाणी देण्याची सोय आहे. तीन मोठे गोठे हे मुक्‍तसंचार पद्धतीचे आहेत. एका गोठ्यामध्ये जनावरांचे उपचार, दुसऱ्या गोठ्यामध्ये दुधाळ गाई आणि तिसरा गोठा गवळाऊ गोवंशसंवर्धन केंद्रासाठी आहे. संस्थेमध्ये नव्याने दाखल होणारी जनावरे प्रथम ‘वेलकम शेड’मध्ये ठेवली जातात. याबाबत माहिती देताना अभिषेक मुरके म्हणाले, की संस्थेत नव्याने येणारे आजारी गाई, बैल येथे दोन ते तीन दिवस ठेवले जातात. त्यांच्यावर उपचार, लसीकरण केले जाते. प्रक्षेत्रावरील इतर जनावरांना रोगांचा संसर्ग होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. गाईंच्या व्यवस्थापनासाठी ५० कामगार कार्यरत आहेत.

 चारा नियोजन 

संस्थेने ६० बाय १२० फूट आकाराचे शेड चारा साठवणुकीकरिता उभारले आहे. हरभरा, तूर, सोयाबीन, मूग, उडदाचे कुटार (सुका चारा) त्यासोबतच मका, ज्वारी, बाजरी, गवत, हायड्रोपोनिक्स पद्धतीने उत्पादित चारा, अझोला, ढेप, चुरी, गूळ असे घटक जनावरांच्या आहारात वापरले जातात. दर तीन दिवसांआड प्रत्येक जनावरांना सवामणी ही पौष्टिक लापशी एक किलो या प्रमाणात दिली जाते. पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार आयुर्वेदिक औषधी घटक लापशीमध्ये मिसळले जातात.  संस्थेने स्वतःच्या पंधरा एकर प्रक्षेत्रावर चाऱ्याची लागवड केली आहे. त्यासोबतच परिसरातील शेतकऱ्यांकडून हिरवा व सुका चारा दोन रुपये किलोप्रमाणे विकत घेतला जातो. एका गाईला दररोज सरासरी १० ते १५ किलो चारा दिला जातो.

 उत्पादनांची निर्मिती आणि विक्री 

संस्थेतर्फे प्रक्षेत्रावर गांडूळ खत, दशपर्णी अर्क, दंतमंजन, कीडनाशक, जीवामृत, गोवरी, गोमूत्र अर्क आणि गोनाईल या उत्पादनांची निर्मिती केली जाते. भाकड गाई, बैलांच्या शेण व मूत्रापासून ही उत्पादने तयार केली जातात. दर महिन्याला संस्थेतून दीड लाख रुपयांच्या पंचगव्य उत्पादनांची विक्री होते. सद्यःस्थितीत  गोशाळेत ३०० भाकड जनावरे आहेत. आजारी असलेल्या गाईंपासून मिळणारे शेण आणि गोमूत्राचा वापर निविष्ठा व इतर घटकांमध्ये केला जात नाही, अशी माहिती डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

सेंद्रिय भाजीपाला, फळांचे उत्पादन 

संस्थेच्या पाच एकर प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. संस्थेने तीन एकर पेरू, पाच एकर आवळा लागवड केली आहे. संस्थेतर्फे सेंद्रिय भाजीपाला, आवळा आणि पेरूची विक्री केली जाते.  

मृत जनावरांचे समाधी खत 

नैसर्गिकरीत्या मृत्यू झालेल्या जनावरांना गोशाळेच्या प्रक्षेत्रावर समाधी दिली जाते. आजपर्यंत सुमारे २२५ जनावरांना गोरक्षण संस्था परिसरात समाधी देण्यात आली आहे. तीन फूट बाय चार फुटांचा खड्डा करून त्यामध्ये दहा टोपले शेण, १० किलो मीठ टाकून त्यावर मृत जनावर ठेवले जाते. त्यानंतर पुन्हा मीठ व शेणाचा थर दिला जातो. दोन वर्षांनंतर या खड्ड्यातील माती काढून पडीक जमिनीत मिसळली जाते. या मातीमुळे जमिनीचा पोत सुधारतो, अशी माहिती डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी दिली. 

शेतकरी प्रशिक्षण केंद्र 

संस्थेच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती, पशुपालन, पंचगव्य उत्पादनांबाबत प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीविषयक प्रशिक्षणाचेही आयोजन केले जाते. कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग यांसारख्या शासकीय संस्थांना प्रशिक्षणगृह उपलब्ध करून दिले जाते. संस्थेच्या कार्याची माहिती घेण्याकरिता शाळेतील मुलांच्या सहली प्रक्षेत्रावर येतात. गाईंचे आर्थिक व सामाजिक महत्त्व कळावे या उद्देशाने शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. संस्थेतर्फे शाळा, महाविद्यालयामध्ये गोपालनाबाबत जनजागृतीचे काम केले जाते.

जनावरांकरिता रुग्णवाहिका  

गोशाळेपासून शंभर किलोमीटर अंतरावरील जखमी किंवा आजारी जनावरांना आणण्यासाठी गोकुलमच्या वतीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. जखमी जनावरास संस्थेच्या दवाखान्यात आणून उपचार केले जातात. आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक जनावरांकरिता ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. रुग्णवाहिकेत हायड्रॉलिक प्रणाली असल्याने जनावरांना माणसाच्या मदतीने उचलावे लागत नाही. परिणामी त्यांना आणखी दुखापत होण्याचे टळते. 

आधुनिक उपचाराच्या सोयी  

संस्थेत आणलेल्या जनावरांसाठी आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. आजारी जनावरांसाठी क्ष-किरण तपासणीची सुविधा आहे. या माध्यमातून जनावरांची हाडे तुटलेली आहेत किंवा नाही याविषयी लगेच कळते. कर्करोग, अपघातात पाय तुटलेले, अंध, ब्रुसोला आजारग्रस्त, भाजलेल्या गाई अशी अनेक प्रकारची बाधित जनावरे येथे उपचारासाठी येतात. गोठ्याला आग लागून भाजलेल्या जनावरांकरिता स्वतंत्र उपचार कक्ष आहे.

जनावरांकरिता अद्ययावत रुग्णालय  

संस्थेच्या प्रक्षेत्रावर येत्या काळात पाच कोटी रुपये खर्चून जनावरांकरिता अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेले रुग्णालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन झाले. जागतिक दर्जाच्या उपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही पूर्ण सेवा निःशुल्क असेल, अशी माहिती डॉ. हेमंत मुरके यांनी दिली. 

गवळाऊ गोवंश संवर्धन केंद्र 

विदर्भात प्रामुख्याने गवळाऊ हा देशी गोवंश दिसतो. या गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी संस्थेने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या संस्थेच्या गोठ्यात २५ गवळाऊ गाई आहेत. येत्या काळात जातिवंत दुधाळ गवळाऊ गाईंचे संवर्धन करण्यावर संस्थेने भर दिला आहे. 

संपर्क : डॉ. सुनील सूर्यवंशी : ९३७१४०५१०४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT