अ‍ॅग्रो

लिंबू प्रक्रियेतून मिळतील रोजगाराच्या संधी

चंद्रकला सोनवणे

औषधी गुणधर्म असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. लिंबापासून अनेक उपयुक्त असे पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे महिला, बेरोजगार अाणि बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
 

रस
   रस काढण्यासाठी मोठ्या आकाराची चांगली पिवळसर फळे घेऊन स्वच्छ धुवून घ्यावीत. लिंबू प्रेसरच्या सहाय्याने रस स्टीलच्या पातेल्यात काढून गाळून घ्यावा.
   स्टीलच्या पातेल्यामध्ये रस ८० अंश सेल्सिअस तापमानाला २० मिनिटे गरम करावा. किंवा प्रतिलिटर रसामध्ये ६०० मिली ग्रॅम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.
   बाटल्या व झाकणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे ठेवून निर्जंतुक करून त्या कोरड्या कराव्यात व त्यामध्ये ताबडतोब रस भरून घ्यावा. निर्जंतुक करून घेतलेली झाकणे बसवून हवाबंद करावीत.
   या रसाचे स्क्वॅश, सरबत, सिरप करता येते. रासायनिक संरक्षक वापरून साठविलेल्या रसापासून स्क्वॅश सरबत करताना पुन्हा सोडिअम बेन्झोएट मिसळण्याची आवश्‍यकता नसते.

स्क्वॅश
   स्क्वॅश तयार करण्यासाठी २० टक्के रस, ४५ टक्के साखर अाणि १ टक्का सायट्रिक आम्ल घ्यावे.
   सरबताप्रमाणेच स्क्वॅश तयार करावा. परंतु रस १ लिटर, साखर २ किलो अाणि पाणी १ लिटर घ्यावे.
   १ लिटर स्क्वॅश पासून ८ लिटर सरबत तयार करता येते.

लोणचे
   लिंबाचे लोणचे गोड, आंबट तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते.
   लोणचे तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली पिवळसर रंगाची व मोठ्या आकाराची फळे निवडावीत व स्वच्छ धुवून फडक्‍याने कोरडी करावीत.
   लोणचे तयार करताना जितकी जास्त स्वच्छता राखली जाईल तेवढे चांगल्या प्रतीचे लोणचे तयार होते व ते खराब होत नाही.
   लिंबू स्वच्छ धुवून व कोरडे करून घेतलेल्या लिंबाच्या स्टीलच्या तीक्ष्ण सुरीने चार सारख्या फोडी कराव्यात व त्यातील बिया काढाव्यात. लिंबाचे गोड लोणचे तयार करण्यासाठी खालील घटक पदार्थ वापरावीत.
   लिंबू - १ किलो
   मीठ - १२० ग्रॅम
   अाले (बारीक तुकडे केलेले) ५० ग्रॅम
   हळद, विलायची, मिरे, बडीशेप, लाल तिखट प्रत्येकी १५ ग्रॅम
   लवंग ५ नग
   गूळ ७०० ते ८०० ग्रॅम
   काचेची बरणी स्वच्छ करून नंतर ती गरम पाण्याने धुवून कोरडी करून कडक उन्हामध्ये तीन ते चार तास उलटी करून ठेवावी.
   स्टीलची मोठी थाळी घेऊन त्यामध्ये प्रथम लिंबाच्या फोडी घेऊन त्या मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्याव्यात.
   गुळाचा शेगडीवर मंद आचेवर पाक करून घ्यावा व स्टीलच्या चाळणीने गाळून घ्यावा. थोडा थंड झाल्यास तो लिंबाच्या फोडीवर टाकावा.
   दुसरीकडे बडीशेप, लवंग, मिरे भाजून बारीक कुटून घ्यावे. (लिंबाचा बारीक किस + गूळ + मीठ + मसाला) एकत्रित करून शिजवावे व तो घट्ट होईपर्यंत शिजवावे नंतर ते थंड करावे आणि उन्हामध्ये ठेवलेल्या रुंद तोंडाच्या बरणीमध्ये हे लोणचे भरावे झाकण घट्ट लावून ते स्वच्छ व कोरड्या ठिकाणी ठेवावे.

सरबत
   घटक : रस ५०० मिली, साखर १.३० किलो, पाणी ८ लिटर
   सरबतामध्ये ५ टक्के रस १५ टक्के साखर आणि ०.२५ टक्के सायट्रिक आम्लाचे प्रमाण असावे.
   लिंबाचा गाळून घेतलेला रस घ्यावा. स्टीलच्या पातेल्यात ८ लिटर पाणी घेऊन त्यात साखर मिसळून मंद आचेवर मिश्रण विरघळून गाळून घ्यावे.
   थोडे थंड झाल्यावर लिंबाचा रस त्या साखरेच्या मिश्रणात मिसळून घ्यावा. निर्जंतुक कोरड्या बाटल्यांमध्ये सरबत भरावे आणि घट्ट झाकणे बसवून घ्यावीत.
   बाटल्या ८० अंश सेल्सिअस तापमानाला गरम पाण्यात उकळून बाहेर काढून त्या थंड होण्यासाठी उघड्यावर ठेवाव्यात.

लिंबाचे अाैषधी गुणधर्म
   सकाळी उठल्यावर लिंबूपाणी व मध घ्यावे त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे पचनसंस्था सुरळीत चालते.
   लिंबामध्ये पेक्‍टीन हा तंतुमय घटक आहे. या तंतुमय पदार्थाच्या नियमित सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
   हृदयविकार होण्याचीही संभावना कमी होते.
   पाण्यात लिंबाचा रस व जिऱ्याची पूड घालून पिल्यास यकृताचे रोग बरे होतात.
   १०० ग्रॅम लिंबात ५७ कॅलरी ऊर्जा असते. त्याशिवाय जीवनसत्व-क ४० मिली ग्रॅम असते. बी गटातील जीवनसत्व थायमिन रायोफ्लेवीन नायासीनही मुबलक प्रमाणात असतात.
   लिंबातील जीवनसत्व-क मुळे फेरिक स्वरुपातील लोहतत्त्वाची उपलब्धता व अॅनेमिया कमी करण्यास मदत होते.
   लिंबू फळापासून सायट्रिक आम्ल तयार होते. या सायट्रिक आम्लाचा उपयोग प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी होतो.

- चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७  (के. एस. के.(काकू)अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कची वादळी खेळी अन् स्टब्स-होपचेही आक्रमण; दिल्लीचे मुंबईसमोर 258 धावांचे आव्हान

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

T20 WC 24 India Squad : अजित आगरकर पोहचला दिल्लीत; लवकरच निश्चित होणार भारताचा वर्ल्डकप संघ?

SCROLL FOR NEXT