Agriculture-Development
Agriculture-Development 
अ‍ॅग्रो

जलसंधारणाच्या कामांतून शेती विकासाला आला वेग

माणिक रासवे

परभणी जिल्ह्यातील शेवडी (ता. जिंतूर) या डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांना शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. त्यातून गावचे शिवार जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामांमुळे पाणीदार झाले. गावात नव्या पीकपद्धतीचा अंगीकार होत आहे. शेततळ्यातील संरक्षित पाण्याच्या काटेकोर वापरातून वर्षभरात दोन ते तीन पिके घेणे शक्य झाले आहे. उत्पन्नात वाढ होऊ लागल्याने गावाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळाली आहे. 

परभणी जिल्ह्यातील अवर्षणप्रवण जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाशी सामाना करावा लागतो. तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या अनेक गावांतील अल्पभूधारक शेतकरी, मजुरांना खरिपाच्या सुगीनंतर कामांच्या शोधात मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागते. जिंतूर-येलदरी राज्य रस्त्यावर शेवडी हे छोटे गाव आहे. गावाच्या भोवती डोंगर असल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जात असे. जिरायती बहुल या गावातील शेतकऱ्यांचे अर्थकारण खरीप हंगामावरच बेतलेले. जानेवारीपासूनच पाणीटंचाई तीव्र होई.  

जलयुक्त शिवारातून बदलाला वेग 
महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याच वर्षी २०१५ मध्ये शेवडी-एनोली गावाची निवड झाली. गावचे भौगोलिक क्षेत्रफळ ७२२.७६ हेक्टर आहे. गावशिवारातील ६०२ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य असले तरी दगड गोटे, उथळ जमिनींचे प्रमाण अधिक आहे. 

अभियानांतर्गत झालेली कामे 
 कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्यामार्फत जलसंधारणाचे विविध उपचार 
 यात १४२ हेक्टरवर खोल समतल चर. त्यामुळे डोंगरावरून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरले.
 सिमेंट बंधाऱ्यांचे खोलीकरण
 एनोली तलावातील गाळ काढण्यात आला.

शेतकरी मंडळ झाले सक्रिय 
वर्षानुवर्षे पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागलेल्या शेवडीत शिवारफेरीच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन झाले. शासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग यांचा समन्वय घडला.  शेतकऱ्यांच्या विचारमंथनातून गावात जलयुक्त शिवार शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामाध्यमातून शेतीशाळांचे आयोजन करण्यात येते. यात नवे तंत्रज्ञान, पीक पद्धती, मार्केट यांवर चर्चा होते. राज्यातील विविध प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहली आयोजित केल्या जातात.

शेततळ्यातून विद्युत पंपाशिवाय सिंचन 
शेवडी शिवारात डोंगराच्या पायथ्याशी खुशाल काळे, शंकर काळे, सुधाकर काळे यांनी ३० बाय ३० बाय १० मीटर आकाराचे सामूहिक शेततळे घेतले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अस्तरीकरणही केले. त्यात विहिरीचे पाणी साठवले जाते. शेततळ्यापासून तीनशे फूट अंतरांवर जिंतूर- येलदरी राज्य रस्त्याच्या बाजूला काळे यांची जमीन आहे. तेथून ३० ते ३५ फूट उंचीवर शेततळे आहे. त्यात पीव्हीसी पाईप टाकून पाणी बाहेर काढण्यात आले. पाईपच्या पुढे तीन पाइपलाइन जोडल्या. त्यांना ठिबक संच बसविले. यामुळे गुरुत्वाकर्षण पद्धतीने विद्युत पंपाशिवाय पिकांना पाणी देणे शक्य झाले. या तीनही शेतकऱ्यांनी एकूण साडेचार एकर क्षेत्रात हळदीचे उत्पादन घेतले.

कडवंची गावापासून प्रेरणा..
जालना जिल्ह्यातील कडवंची गावशिवारात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी उपलब्ध झाले. तेथील शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. द्राक्षातून अर्थकारण सुधारले. शेवडीतील शेतकऱ्यांनी कडवंचीला भेट देऊन येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. यंदा शेवडीत १२ एकरांवर द्राक्षपीक आहे. 

राज्य शासनाचा पुरस्कार...
 जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे विभागीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा रोख पाच लाख रुपयांचा पुरस्कार शेवडीला मिळाला.  
 पुरस्काराच्या रकमेतून जलसंधारणाची अन्य कामे होणार.
 तत्कालीन कृषी सहाय्यक जी. टी. राठोडदेखील जलमित्र पुरस्काराने सन्मानित.

कामांची फलश्रूती 
 माथा ते पायथा जलसंधारणाच्या कामांमुळे विहिरी, बोअरची पाणी पातळी वाढली.  
 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत तसेच शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थेकडून तीस लाख रुपये मदत, लोकसहभाग आदींच्या माध्यमातून शिवारात ६५ शेततळी. पैकी चार शेतकऱ्यांकडून शेततळ्यास अस्तरीकरण.
 पूर्वी पारंपरिक पिकांवरच शेतकऱ्यांची मदार असे. आता ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, काकडी, टरबूज, खरबूज, रसवंतीसाठी ऊस अशी विविधता दिसत आहे. 
 जिल्ह्यातील प्रमुख झेंडू उत्पादक गाव म्हणून शेवडीची ओळख  
 शेततळ्यांत मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आदी व्यवसाय सुरू झाले.
 शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा ठिबक सिंचन पद्धतीने काटेकोर वापर करून वर्षभरात दोन ते तीन पिके घेणे शक्य झाले.  

शेतकरी प्रतिक्रिया..
सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने उत्पादनाबरोबरच उत्पन्नात वाढ होत आहे. अभ्यास दौऱ्यांमधील चर्चेतून नवीन पीक पद्धती, तंत्रज्ञानाचा अंगीकार केला जात आहे. 
- शिवाजी सानप, ९८२२०५८५८७ अध्यक्ष, जलयुक्त शिवार शेतकरी मंडळ, शेवडी 

शेतकरी मंडळामुळे तंत्रज्ञानविषयक जागृती होत आहे. त्यामुळे नवी पीकपद्धती, पूरक व्यवसाकडे शेतकरी वळले आहेत.
- मनोहर नागरे, सचिव, जलयुक्त शिवार शेतकरी मंडळ, शेवडी
 
आमची २७ एकर शेती आहे. पूर्वी कापूस, तूर घेत होतो. तलावातील सहा एकर हलक्या जमिनीवर गाळ टाकल्याने सुपीकता वाढवणे शक्य झाले आहे. झेंडू, हरभरा, टरबूज, काकडी अशी पिके घेत आहोत. अर्धा एकर ऊस व रसवंतीही आहे.
- गजानन घुगे, ७२१८७४१४२५ 

आमची दहा एकर शेती असून दोन एकरांत ‘मनरेगा’तून शेततळे उभारले. अस्तरीकरण केले असून त्यात दीड कोटी लिटरपर्यंत पाणीसाठवण होत आहे. त्याद्वारे दोन एकर द्राक्षे, प्रत्येकी एक एकर टरबूज, खरबूज घेतले आहे. शेततळ्यात पाच हजार मत्स्यबीज सोडले आहे.
- विश्वनाथ काळे 

सामूहिक शेततळ्यामुळे पाणी उपलब्ध झाले. भारनियमान तसेच कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सिंचनासाठी अडथळा येऊ नये म्हणून शेततळयाला ठिबक सिंचन संच जोडला आहे. हळदीनंतर द्राक्षे घेणार आहोत. शेततळ्यात मत्स्यबीज सोडले आहे.
- खुशाल काळे, ९७६४२६४३२४ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT