Vilas-Dakhore
Vilas-Dakhore 
अ‍ॅग्रो

काटेकोर पाण्यात बारमाही काकडी, भाजीपाला

माणिक रासवे

हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव (ता. वसमत) येथील विलास डाखोरे यांना कायमच पाणीटंचाई भेडसावते. तरीही उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करीत वर्षभर विविध भाजीपाला पिकांची शेती ते उत्तम प्रकारे करीत आहेत. दहा वर्षांपासून काकडी शेतीत सातत्य ठेवले आहे. बाजारात जाऊन स्वतः हातविक्री करण्यावर भर देत शेतीतील नफा त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव (ता. वसमत) येथील विलास वैजनाथराव डाखोरे यांना घरगुती व तांत्रिक अडचणींमुळे सातव्या इयत्तेपुढे शिकता आले नाही. शेतीचा अनुभव घेता घेता त्याची जबाबदारी पुढे आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खांद्यावर पेलली. 

पळसगाव शिवारात गावापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांची सुमारे १८ एकर शेती आहे. सिंचनासाठी बोअरची व्यवस्था आहे. केळी, ऊस, भाजीपाला, कापूस ही त्यांची पारंपरिक पीकपद्धती आहे. गेल्या दहा वर्षांपासून काकडी उत्पादनात त्यांनी सातत्य ठेवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोलकाता झेंडूचे उत्पादन ते घेऊ लागले आहेत.

काकडी उत्पादनातील सातत्य
  डाखोरे दरवर्षी अर्धा ते एक एकरात काकडीची लागवड करतात. बाजारपेठेतील दरांचा अंदाज घेऊन वर्षातील फेब्रुवारी-मार्च, तसेच खरिपात अशी साधारण दोन वेळा त्यांचे लागवडीचे नियोजन असते. यंदाच्या उन्हाळ्यात अर्धा एकर क्षेत्र त्यासाठी दिले आहे.  

 डाखोरे यांचे क्षेत्र तसे मोठे आहे. मात्र भाजीपाला पिकांसाठी त्यातील सुमारे दोन ते अडीच एकरच क्षेत्र  असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. त्यामुळे क्षेत्र वाढवण्यासाठी मर्यादा येतात.

 आता भाजीपाला पिकांसाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला आहे. 

 काकडी हे मुख्य पीक झाल्याबद्दल ते सांगतात की कमी कालावधीत हे पीक येते. लागवडीपासून साधारण ३५ दिवसांनी प्लाॅट सुरू होतो. तो सुमारे दोन महिने तरी चालतो. सुरवातीला एक दिवसाआड ४ ते ५ क्विंटल उत्पादन निघते. काही दिवसांनी दररोज तोडा करावा लागतो.

  एकूण कालावधीत एकरी २० ते २५ टन व काही वेळा ३० टनांपर्यंतही उत्पादन मिळते. 

वर्षभर राहते मागणी 
  काकडीला वर्षभर मागणी राहते. दर हंगाम व आवकनिहाय किलोला १० रुपयांपासून ते १५, २० व ३० रुपयांपर्यंत राहतात. अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत खर्च वजा जाता एकरी ३० हजार रुपये तरी हाती पडतात. हवामान, उत्पादन, दर व विक्री या सर्व बाबी साधल्यास हा आकडा पुढेही जातो. 

  अन्य भाजीपाला पिकांचा एकूण हंगाम कालावधी हा जास्त राहतो. त्या तुलनेत दोन ते अडीच महिन्यांत काकडीचे ताजे उत्पन्न हाती येते असे डाखोरे म्हणतात.  

लागवडीचे नियोजन 
  आपण पिकविलेला कोणता शेतीमाल दररोज बाजारात विक्रीसाठी गेला पाहिजे यादृष्टीने दरवर्षी पिकांचे नियोजन असते. 

  केळी, ऊस, कापूस अशी पिके असतातच. मात्र मिरची, टोमॅटो, वांगे, भेंडी, दोडका, टिन्डा आदी विविधताही त्यांच्या शेतात आढळते. याशिवाय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन पिकात बदलही होतो. 

  एकूणच भाजीपाला पिकांमुळे दररोजच्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.  

स्वतः विक्री करण्यावर भर...
डाखोरे यांच्या शेतापासून वसमतचे मार्केट साधारण पाच किलोमीटर तर नांदेडचे मार्केट ३५ किलोमीटर अंतरावर आहे. याच मार्केटवर अधिक भर असतो. काही वेळा परभणी येथील मार्केटमध्येही भाजीपाला पाठवला जातो. आठवड्यातील दोन दिवस नांदेड व एक दिवस वसमत येथे बाजारच्या दिवशी स्वतः बसून डाखोरे भाजीपाला विक्री करतात. व्यापाऱ्यांनाही विक्री केली जाते. परंतु स्वतः विक्री केल्याने किलोमागे किमान पाच ते दहा किंवा त्याहून अधिक रुपयांचा नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे. 

शेतीसोबत विक्रीचीही जबाबदारी 
 शेतातील उत्पादनासह विक्रीची जबाबदारी स्वतः सांभाळण्याचे कष्टही डाखोरे पेलतात. पहाटे चार वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत अथक कष्ट काही संपत नाहीत. भाजीपाला काढणीच्या कामांचे नियोजन दररोज सालगड्यांच्या मदतीने ते करतात. यंदा चुलत भाऊदेखील मदतीला आला आहे.

जमीन सुपीकेतवर भर 
डाखोरे यांच्याकडे एक बैलजोडी, दोन गायी, ट्रॅक्टर आहे. घरच्या जनावरांपासून काही प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. गरजेनुसार शेणखत विकतदेखील घेतात. यामुळे दरवर्षी आलटून पालटून दोन ते तीन एकर जमिनीला शेणखताचा उपयोग होतो. रासायनिक खतांचा वापरदेखील योग्य प्रमाणातच केला जातो. ठिबकद्वारे विद्राव्य खते दिली जातात. जमिनीची सुपीकता टिकून राहण्यावर भर दिला आहे. 

कोलकता झेंडूची लागवड...
वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक डाॅ. श्रीकांत गावंडे यांची शेती डाखोरे यांच्या शेताजवळ आहे. महाविद्यालयाच्या सेंद्रिय शेती जनजागृती अभियानांतर्गत डाॅ. गावंडे शेतकऱ्यांना फुले, भाजीपाला पिकांच्या विविध वाणांबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार डाखोरे यांनी कोलकता झेंडूची ३० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते पुणे, नांदेड, जालना येथील मार्केटमध्ये फुले पाठवत आहेत. त्यास सरासरी प्रतिकिलो २० रुपयांपासून ते ४० रुपये दर मिळतो. झेंडूमध्ये यंदा शुगरबीटची लागवड केली आहे. त्यापासूनही बोनस उत्पादन मिळत आहे.

पाणीटंचाई, मात्र पाण्याचा काटेकोर वापर
सिंचनासाठी विहीर आणि बोअरची सुविधा आहे. शेताजवळून सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याची चारीदेखील जाते. परंतु गेल्या दोन वर्षापासून चारीला पाणी आलेले नाही. उन्हाळ्यात विहीर, बोअरचे पाणी कमी पडते. वीज भारनियमनाची समस्या आहे. या परिस्थितीत जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी डाखोरे यांनी पारंपरिक प्रवाही सिंचन पद्धती बंद करीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे कमी पाण्यात बारमाही भाजीपाला पिकांचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे.
- विलास डाखोरे, ९८८१३३१४५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT