अ‍ॅग्रो

गुणवत्तापूर्ण दुधाला मिळाला किफायतशीर दर...

विकास जाधव

बदलत्या बाजारपेठेचा अंदाज घेत सेंद्रिय अन्नधान्य उत्पादनाबरोबरीने सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील शेतकरी अलीकडे सेंद्रिय पद्धतीने दूध निर्मितीकडे वळले. यामुळे दरातील चढ-उताराचे धोके काही प्रमाणात कमी झाले. स्वच्छ दूध निर्मिती, जनावरांचे योग्य आरोग्य व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धतीने चारा उत्पादन, शेणखत विक्री, कुक्कुटपालनातून पशुपालकांनी आर्थिक नफा वाढविला आहे. 

स्वच्छ दुग्धोत्पादनावर भर 
मुंजवडी (ता. फलटण) येथील विजय बबनराव पवार हे नोकरी करत पशुपालन करणारे शेतकरी. १९९६ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर विजयकुमार यांनी भिगवण येथील खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. यावेळी त्याच्याकडे चार होल्स्टिन फ्रिजियन गाई होत्या. बंदिस्त गोठ्यामुळे व्यवस्थापनाच्या अडचणी येत होत्या. 

विजय पवार यांनी २००८ मध्ये गोविंद डेअरीचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार ४० बाय ६० फुटांचा कमी खर्चात मुक्त संचार गोठा बांधला. गोठ्यामध्येच सिमेंट पाइपमध्ये पिण्याचे पाणी, गव्हाणीची सोय केली. मुक्त संचार गोठा असल्याने व्यवस्थापनासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वेळेत बचत झाली. धार काढण्यासाठी यंत्राचा वापर सुरू केला. गाईंचे आरोग्य सुधारले. सध्या १५ होल्स्टिन फ्रिजियन गाई आणि ११ कालवडी आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना सेंद्रिय दूध उत्पादनाची माहिती मिळाली. या दुधास नेहमीपेक्षा आठ ते दहा रुपये अधिक दर मिळणार असल्याने सेंद्रिय पद्धतीने दूध उत्पादनाचा निर्णय घेतला. 

गुणवत्तापूर्ण दूधनिर्मितीवर भर 
विजय पवार म्हणाले की, २०१० मध्ये सेंद्रिय दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने व्यवस्थापनात बदल केले. पाच एकरावर मका, मेथी घास, मारवेल या चारा पिकांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन ठेवले. दरवर्षी ४० टन मुरघास तयार करतो. ॲझोला तसेच हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीस सुरवात केली. खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी स्वतः घरच्या घरी मक्यापासून पशुखाद्य तयार करतो. हा मका सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करतो. दररोज प्रत्येक गाईला ३५० ग्रॅम ॲझोला, पाच किलो हायड्रोपोनिक्स चारा आणि २० किलो चारा कुट्टी देतो. मुक्त संचार गोठ्यामुळे गाईंना व्यायाम होतो. गाई निरोगी राहतात. त्यामुळे दुग्धोत्पादनात वाढ मिळते. सध्या आठ गाई दुधात असून दररोज ११५ लिटर दूध उत्पादन आहे. सध्या प्रति लिटर  ३० ते ३७ रुपये दर मिळतो. गोविंद डेअरी जागेवरून दूध घेऊन जाते. खर्च वजा जाता दर महा ४५ हजार रुपये नफा मिळतो.

माझी पत्नी सौ. स्वाती गाईंचे सर्व दैनंदिन व्यवस्थापन पहाते. गाईच्या व्यवस्थापनासाठी मजूर नाही. गाय आजारी असेल तर औषधोपचाराच्या काळात त्या गाईचे दूध डेअरीला देत नाही. दुग्धोत्पादनाच्या जोरावर मी तीन एकर शेती खरेदी केली आहे. 

विजय पवार यांनी मुक्त संचार गोठ्यात त्यांनी ४० गावठी कोंबड्यांचे पालन केले. या कोंबड्या खाद्य हुडकताना शेण पसरवतात. त्यामुळे शेण लवकर वाळते. कोंबडीपालनातून दरमहा दोन हजार मिळतात. तीन टन शेणखत आठ हजार रुपयांना विकले जाते. परिसरातील शेतकऱ्यांकडून शेणखताला चांगली मागणी आहे. 

नोकरी सोडून पशुपालनाला सुरवात
जावली (ता. फलटण) या दुष्काळी भागातील रमेश दशरथ निंबाळकर यांनी बीए बीपीएड शिक्षण घेतल्यावर पाच वर्षे विना पगार नोकरी केली. २००० मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि एक होल्स्टिन फ्रिजियन गाई खरेदी केली. या गाईपासून झालेल्या कालवडीचे संगोपन सुरू केले. 

गाईंच्या व्यवस्थापनाबाबत निंबाळकर म्हणाले की, माझी दहा एकर शेती आहे. पाच एकरावर चाऱ्यासाठी मका,ज्वारी, लसूण घास लागवड आहे. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने चारा व्यवस्थापन ठेवतो. दोन एकरावर रब्बी कांदा लागवड असते. टप्प्याटप्प्याने गाईंची संख्या वाढू लागल्याने मनुष्यबळ आणि वेळही जास्त जाऊ लागला. यामुळे मी २००७  मध्ये ५० बाय ६० फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा बांबूचा वापर करून तयार केला. यामुळे श्रम कमी झाले. गाईचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. दुग्धोत्पादनात वाढ झाली.  
 
सेंद्रिय दूधनिर्मितीच्या दिशेने...
रमेश निंबाळकर यांनी २०१० मध्ये सेंद्रिय पद्धतीने दुग्धोत्पादनाचा निर्णय घेतला. याबाबत ते म्हणाले की, मी गाईंच्या व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. गाईंना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी दरवर्षी १५ टन मुरघास तयार करतो. ॲझोलाचे तीन वाफे आहेत. हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन घेतो. दररोज एका गाईला अर्धा किलो ॲझोला, सात किलो हायड्रोपोनिक्स चारा आणि १५ किलो चारा कुट्टी देतो. घरच्या घरी पशूखाद्य निर्मिती करतो. त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने मका लागवड करतो. गाईंना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतो. आजारी गाईचे दूध वेगळे केले जाते. सध्या २० पैकी १२ गाई दुधात आहेत. दररोज १४० लिटर दूध मिळते. सर्व दूध गोविंद डेअरी घेऊन जाते. सध्या प्रति लिटर ३० रुपये दर मिळतो. खर्च वजा जाता दर महा ३५ ते ४०  हजार रुपये नफा पशुपालनातून मिळतो. कोंबडीपालन तसेच शेणखतातूनही किफायतशीर उत्पन्न मिळते.
रमेश निंबाळकर ९४०३३४९६३९

व्यवस्थापनाचे मुद्दे   
मुक्त संचार पद्धतीने गाईंचे संगोपन.
सेंद्रिय पद्धतीने चारा उत्पादन, घरच्या घरी पशुखाद्य निर्मिती.
मूरघास, ॲझोला आणि वर्षभर सकस चारा उत्पादनावर भर.
वेळेवर आरोग्य तपासणी, आयुर्वेदिक औषधोपचार.
सेंद्रिय व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन.
नेहमीच्या दरापेक्षा प्रति लिटर ८ ते १० रुपये जास्तीचा दर.

दुग्धोत्पादनाची सूत्रे 
गाईंच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देताना डॉ. शांताराम गायकवाड म्हणाले की, हे पशुपालक चार वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने चारा उत्पादन घेतात. पशुखाद्य घरच्या घरी तयार करतात. त्यासाठी लागणारा मका, सोयाबीन, ज्वारी, गहू उत्पादनदेखील सेंद्रिय पद्धतीने केले जाते. मुक्त संचार पद्धतीने गाईंचे व्यवस्थापन ठेवले जाते. त्यामुळे गाईंचे आरोग्य आहे. आयुर्वेदिक पद्धतीने औषधोपचार केले जातात.आजारी गाईचे व्यवस्थापन आणि दूध स्वतंत्र ठेवले जाते. प्रत्येक गाईची ठराविक दिवसांनी आरोग्य तपासणी होते. स्वच्छ दूध निर्मितीवर भर दिला आहे. या गाईंच्या दुधाला ४ ते ४.२ फॅट तर एसएनएफ ८.८ ते ९ आहे. सेंद्रिय व्यवस्थापन प्रणालीचे  पशुपालकांनी प्रमाणीकरण केले आहे. त्यामुळे ग्राहकास गुणवत्तेची खात्री देता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT