अ‍ॅग्रो

मित्रांची अशी दिलदारी म्हणूनच शेळीपालनात भरारी 

अभिजित डाके

सांगली जिल्ह्यातील विभूतवाडी (ता. आटपाडी) गावाची अोळख कायम दुष्काळी अशीच राहिली आहे. केवळ जिरायती शेतीवर बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरातील अनेक तरुण मुंबई, पुणे येथे माथाडी कामगार म्हणून किंवा अन्यत्र नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. 

कंपनी बंद पडल्याने परतले गावी  
विभूतवाडीचे सुखदेव पाटील यांची आर्थिक परिस्थिती हलाखाची होती. कुटूंब तसं मोठं. दोन वेळचं पोट भरणं मुश्‍कील झालं होतं. त्यामुळं त्यांनी मुंबई गाठली. तिथं माथाडी म्हणून त्यांना नोकरी लागली. मिळत असलेल्या पगारावर प्रपंचाचा गाडा कसाबसा चालत होता. मुलं मोठी होऊ लागली होती. अचानक कंपनी बंद झाली. सत्तावीस वर्षे मुंबईत राहिलेले सुखदेव या घटनेने विचलित झाले. पण समोर कुटूंब दिसत होतं. हात पाय हलविल्याशिवाय गत्यंतर  नव्हतं. 

गावी पुन्हा संघर्षच  
सन २०१२ मध्ये सुखदेव गावी परतले. शेतात मोलमजुरी करू लागले. त्यावर प्रपंच सुरू होता. आपल्या शेतीत काहीतरी केलं तर दोन पैसे अधिक मिळतील अशी आशा तयार झाली. पण भावकीतील वादविवाद समोर आले. त्यात एक गुंठादेखील जमीन मिळाली नाही. प्रत्येकवेळी नवं संकट उभं राहायचं. पण हिंम्मत न हारात मार्ग काढत सुखदेव पुढे जात      होते.  

मित्राचं दुःख मित्रच अोळखतात   
हाताला कधी काम मिळायचं, कधी मिळायचं नाही. मुलांचं शिक्षण त्यामुळं अडलं होतं. मित्र खाशाबा पावणे, दादासो खरजे, दीपक मोटे दररोज आपुलकीनं विचारपूस करायचे. त्या वेळी सुखदेव यांच्या चेहऱ्यावरील दुःख या मित्रांना दिसलं. त्यांनी सारी परिस्थिती समजून घेतली. जमिनीअभावी शेतीत काही करणे शक्य नसले तरी शेळीपालन सुरू करण्याविषयी सल्ला त्यांनी मित्राला दिला. पण त्यासाठी भांडवल नसल्याचे सुखदेव यांनी बोलून दाखवले. मग मित्रांनीच पुढे यायचे ठरवले. 

त्यांनी आर्थिक भार उचलला. या व्यवसायातून जसे पैसे मिळत जातील तसे परत कर असा प्रस्तावही ठेवला. त्यानुसार खाशाबा व दादासो यांनी प्रत्येकी ५० हजार व दीपक यांनी १० हजार रुपये आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे दिले. 

अखेर शेळीपालनातून उभारले सुखदेव  
सुखदेव सांगतात की आमचा मूळचा व्यवसाय मेंढीपालन आहे. त्यामुळे शेळीपालन करणे अवघड नव्हते. त्याचप्रमाणे बाजारपेठही नवी नव्हती. केवळ मुंबईला वास्तव्य असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता नव्या उत्साहाने सुखदेव व्यवसायासाठी उभारले. एक बोकड व दहा शेळ्या विकत घेतल्या. पुढे २० पिल्ले तयार झाली. एका रोगामध्ये १६ पिल्लं दगावली. सुखदेव पुन्हा हताश झाले. काहीच करण्याची उमेद राहिली नाही. आहे त्या परिस्थितीत व्यवसाय थांबवण्याचे मन सांगू लागले. मित्रांकडून घेतलेले उधार पैसे देणे देखील शक्‍य नव्हते. पण पुन्हा प्रयत्नवादी सुखदेव यांच्या मदतीला तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. इनामदार धावून आले. त्यांनी धीर दिला. मित्रही सोबत होते. मुलींच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी मित्रांनी मदत केली. सुखदेव यांच्या पत्नी आशा देखील पाठीशी उभ्या राहिल्या. तेजस्वी, अभिजित, आणि काजल ही मुले देखील वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मदत करू लागली. सुखदेव पुन्हा नव्या उमेदीने उभे   राहिले. 
 
खंडाने शेती घेतली कसायला  
परिसरात चारा टंचाई सातत्याने भासते. त्यामुळे चारा विकत घेणे शक्‍य नव्हते. मग तीन एकर शेती वर्षाला १८ हजार रुपये खंडाने करण्यास घेतली. यात ज्वारी, मका, बाजरी, गाजर घेऊ लागले. चाऱ्याबरोबर घरी धान्यदेखील येऊ लागले. शिल्लक धान्याची विक्री करुन प्रपंचाला हातभार मिळू लागला. दरम्यान शेळीपालन व्यवसायात देखील तीन वर्षांत स्थिरता   आली. 

नव्या उमेदीने आज जो काही व्यवसायात उभा राहू शकलो तो केवळ मित्रांमुळेच. त्यांनी दिलेले पैसे फेडणे मला शक्य झाले. पण त्यांनी वेळेला केलेल्या मदतीचे मूल्य होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. 
 : सुखदेव पाटील, ९९७५८८३६१४ 


आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

मोठ्या शेळ्या (गावरान) - ३५ 
लहान पिल्ले - २० 
परिसरातीलच ग्राहकांकडून     नरांची जागेवरच खरेदी  
आटपाडी येथील शनिवारच्या     बाजारातही शेळ्यांची विक्री 
गेल्या पंधरा महिन्यांत ४० नर तर ८० शेळ्यांची विक्री 
नराची २७० रुपये प्रति     किलोप्रमाणे तर शेळीची तीन     हजार रुपये प्रति नगानुसार विक्री  
दर तीन महिन्यांतून आवश्यक     सर्व प्रकारचे लसीकरण 
दर दोन महिन्यांनी जंतासाठी     औषध, आठ दिवसांनी टॉनिक 
सकाळी सहा वाजता शेडची     स्वच्छता 
त्यानंतर खाद्य व्यवस्था. दुपारी     ११ ते तीन वाजेपर्यंत शेळ्यांना फिरवण्यास नेले जाते. यामुळे नख्या वाढत नाहीत. साहजिकच शेळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. 
वर्षातून सुमारे चार ते सहा ट्रॉली     लेंडी खत उपलब्ध  
प्रति ट्रेलर सरासरी पाच हजार     रुपये दराने त्याची विक्री  
वर्षाला त्यातून २० ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न 

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी  
गेल्या दोन वर्षांपासून गावात पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे परगावहून तज्ज्ञ बोलवावा लागतो ही मोठी अडचण आहे. संबंधित विभागाने तातडीने ही अडचण दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही गावकरी सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT