अ‍ॅग्रो

चिंब पावसानं रान झालं...

सकाळवृत्तसेवा

या  वर्षी मॉन्सूनने केरळमध्ये दोन दिवस अगोदरच हजेरी लावली  होती. त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक, गोवा अशा ठराविक मार्गे तो राज्यातही नियोजित वेळेपूर्वीच पोचेल, असे संकेत मिळत होते. परंतु कर्नाटकात तीन दिवस मॉन्सूनची स्थिती ‘जैसे थे’ होती. त्यामुळे राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबते की काय, असे वाटत असतानाच त्याच्या पुढील प्रगतीस लगेच पोषक वातावरण तयार झाले. आणि मृग नक्षत्राच्या शुभ मुहुर्तावर (८ जून) तो राज्यात अगदी वेळेवर दाखल झाला. कोकणच्या वेशीवर पाऊल ठेवलेल्या मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भापर्यंत एकाच दिवशी मजल मारली. राज्याच्या बहुतांश भागात जोरदार मॉन्सून पावसाच्या सरीने भेगाळलेल्या भुईबरोबर शेतकऱ्यांची मनंही भिजून चिंब झाली. शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झालं. राज्यात मॉन्सूनपूर्व पाऊसही चांगला कोसळल्याने मॉन्सूनच्या दमदार हजेरीने कापूस लागवडीपासून इतर खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून मॉन्सूनचे आगमनच थोडे उशिरा होत होते. मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली, तरी त्याची गती संथ राहत होती. त्यामुळे राज्य व्यापण्यास त्यास उशीर होत होता. या वर्षी मात्र दमदार आगमनानंतर मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे खरीप पेरण्या साधण्याच्या दृष्टीने शुभ संकेत म्हणावा लागेल. 

पाऊस म्हणजे उत्साह, पाऊस म्हणजे ऊर्जा, पाऊस म्हणजे आनंद, समृद्धी अन् भरभराटही. राज्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने या सर्वांचा प्रत्यय आपल्याला आला असेल, येत आहे. कडक उन्हाने जमिनीची धूप झाली होती. नद्या, नाले कोरडे पडले होते. पावसामुळे नद्या, नाले खळखळून वाहत आहेत. धरणीमायने पोटभरून पाणी पिल्याने ती हसून आनंद व्यक्त करीत आहे. आता लवकरच शेतात पेरलेले बियाणे अंकुरेल, हिरवीगार पिके शेतात डोलू लागतील. उजाड माळराने बहरून येतील आणि सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरेल. शेतीचे तिन्ही हंगामाचे गणित तर मॉन्सूनच्या पावसावरच अवलंबून आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या देशात शेतीची भरभराट म्हणजे बहुतांश उद्योग-व्यवसायाचीही भरभराट, असे सूत्र ठरलेले आहे. चांगल्या पावसाने या देशातील बहुतांश लोकसंख्येची क्रयशक्ती वाढते, हे त्यामागचे मुख्य कारण आहे. त्यामुळे मॉन्सूनची प्रतीक्षा ही सर्वांनाच असते. असे म्हटले जाते लवकर आलेला आणि सक्रिय मॉन्सून देशासाठी, शेतीसाठी चांगला असतो, तर उशिरा आलेला आणि दुर्बल मॉन्सून शेतकऱ्यांसाठी समस्या घेऊन येतो. या वर्षी सुरवात चांगली झाली असली आणि तो सध्या सक्रिय असला, तरी मॉन्सूनला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. राज्यात भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस कमी-अधिक पडतो. तसेच, पावसाच्या वाटचालीत व्यत्यय आणणारे अनेक स्थानिक घटकसुद्धा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तरी प्रत्येक टप्प्यावर सावधानता बाळगायला हवी. पावसाचे मोठे खंड, अवर्षण अथवा अतिवृष्टी अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची शासनाचीही तयारी पाहिजे. अनेक वेळा शेतकरी आणि शासनाच्या नियोजनाअभावी अनुकूल मॉन्सून परिस्थितीचा लाभ घेता आलेला नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत तर मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. तसे या वर्षी होता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT