dadaji-khobragade
dadaji-khobragade 
अ‍ॅग्रो

भातवाणातील संशोधकाला शासनाने सोडले वाऱ्यावर

विनोद इंगोले

चंद्रपूर : ‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ दुर्धर आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेले शेतकरी कृषी संशोधक दादाराव खोब्रागडेदेखील जिवंतपणातील मरणयातनांचा अनुभव आज घेत आहेत. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत असते, त्या दादाजींना अजारपणात राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. 

नागभीड तालुक्‍यातील नांदेड हे दादाजी खोब्रागडे यांचे गाव. जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण झालेले दादाजी १९८३ मध्ये तांदळाचे संशोधक म्हणून नावारूपास आले. परिस्थितीमुळे त्या वेळी त्यांना शिक्षण घेता आले नव्हते; परंतु त्यांनी कल्पकतेने आपले तांदूळ क्षेत्रातील संशोधन कार्य सुरू ठेवले. एच.एम.टी.सारखा शेतकरीभिमुख वाण त्यांनी विकसित केला. त्यानंतर आजवर त्यांच्या नावे नऊ वाण संशोधनाची नोंद आहे.  याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ते तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यापर्यंत साऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांनी केलेल्या संशोधनावर अनेकजण श्रीमंत झाले. परंतु या संशोधकालाच शेवटच्या दिवसांत पैशासाठी इतरांसमोर हात पसरविण्याची वेळ आली आहे. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. परंतु अंथरुणाला खिळलेल्या या संशोधकांची उपेक्षा मात्र उभ्या आयुष्यात संपली नाही. ८९ वर्षांच्या दादाजींना २०१५ मध्ये अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांनी आता खाणेपिणेही बंद केले आहे. त्यांना उपचारासाठी मदत मिळावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांची आहे. या कृषितज्ज्ञांचे कुटुंबीय आज मोलमजुरी करून आर्थिक विवंचनांची भगदाडे बुजवीत आहेत. सरकार आणि समाजालाही आज या संशोधकाची आठवण राहिली नाही. 

फोर्ब्जने घेतली दखल
दीड एकर शेतीत संशोधनकार्य करणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेत २०१० मध्ये फोर्ब्जने जगातील सर्वोतम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना स्थान दिले होते. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ५० हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविले, तर राज्य सरकारने देखील त्यांचा कृषिभूषण पुरस्काराने सन्मान केला. 

राष्ट्रवादीने दिली पाच एकर शेती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संशोधकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने त्यांच्या संशोधनकार्यासाठी पाच एकर शेती विकत घेऊन दिली. ही शेतीच त्यांच्या उपजीविकेचे साधन आजवर होती. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी नापिकीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांचा मुलगा मित्रदीप खोब्रागडे यांनी सांगितले. 

हे वाण केले विकसित
एच.एम.टी., विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एच.एम.टी. आणि डीआरके-२ अशाप्रकारचे नऊ तांदूळ वाण त्यांनी विकसित केले आहेत. 

कृषी विद्यापीठाकडून विश्‍वासघात 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या कार्यक्षेत्रात विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश होतो. असे असताना पूर्व विदर्भातील धानपट्ट्याकडे मात्र विद्यापीठाने दुर्लक्ष केले. कुलगुरूंच्या मर्जीत नसलेल्यांची आणि शिक्षेवर म्हणूनच अनेकांची नेमणूक पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये केली गेली. परिणामी या भागात पूरक संशोधनाला चालनाच मिळाली नाही. दादाजी खोब्रागडे यांनी मात्र आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी एच.एम.टी. हे वाण विकसित केले. १९९४ मध्ये हे वाण कृषी विद्यापीठाने अभ्यासासाठी घेतले आणि चार वर्षांनंतर कृषी विद्यापीठाच्या अखत्यारितील सिंदेवाही केंद्राने हे वाण  पीकेव्ही एच.एम.टी. म्हणून आपल्या नावावर खपवीत, खोब्रागडे यांचा विश्‍वासघात केला.


राज्य सरकारने कृषी संशोधकाला वाऱ्यावर सोडले आहे. आम्ही चंद्रपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मदतीसाठी निवेदन दिले होते. परंतु त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. महसूलचे अधिकारी घरी आले होते; शासकीय दवाखान्यात भरतीचा सल्ला देऊन गेले. परंतु त्या ठिकाणी पुरेशा सुविधा नसून खासगी रुग्णालयातच दाखल करावे लागते.
- मित्रदीप खोब्रागडे, दादाजींचा मुलगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT