cows
cows 
अ‍ॅग्रो

साठ देशी गायींच्या संवर्धनाचा आदर्श

अमोल कुटे

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील सोनेचांदीचे पारंपरिक व्यावसायिक असलेले नितीन ज्ञानेश्वर काजळे यांनी शेतीकडेही तितक्याच आस्थेने लक्ष देत देशी गोसंवर्धनाचा वसा उचलला आहे. विविध जातींच्या सुमारे ६० देशी गायी व दर्जेदार १४ वळूंचे ते उत्तमप्रकारे संगोपन करताहेत. देशी दुधाच्या विक्रीची माफक दरात विक्री करून त्यांनी ग्राहक मिळवले आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापनातून त्यांनी हा व्यवसाय आकारास आणला आहे.  

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर हा भाजीपाला, बटाटा आदी पिकांसाठी प्रसिद्ध असलेला परिसर आहे. याच गावातील बीएस्सी एलएलबी पर्यंत शिक्षण घेतलेल्या नितीन काजळे यांचा सोनेचांदीचा पारंपरिक व्यवसाय आहे. घरची सुमारे २६ एकर शेतीही आहे. व्यवसाय करताना त्यांनी शेतीकडेही तितकेच लक्ष दिले.  

देशी गोसंगोपनाची दिशा
सात वर्षांपूर्वी चाळीस म्हशींच्या साह्याने स्वामीराज दुग्धालय नावाने दुग्धव्यवसाय केला. पुढे मजूर व अन्य समस्या भेडसावू लागल्या. दरम्यान कुटुंबातील लहान मुलीला देशी गायीचे दूध देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्या वेळी परिसरात देशी गायींची संख्या खूपच कमी आढळली. एका शेतकऱ्याकडील गाय उपलब्ध झाली. ती एकच लिटर दूध द्यायची. तरीही निर्भेळ दुधाची व्यवस्था झाली. हृदयविकार असलेल्या वडिलांसाठी दुधाची गरज म्हणून खिलार गाय घेतली. त्यातूनच मग देशी गोवंशाची वृद्धी व संगोपन आपणच का करू नये असा विचार पुढे आला. म्हशी विकून मग देशी गायी घेण्यास सुरुवात केली.

चोख व्यवस्थापन 
  मुक्त गोठा पद्धती. त्यामुळे मुक्तपणे वावर. हवा तेव्हा चारा खाणे, पाणी पिण्याची व्यवस्था 
  गोठ्याची देखभाल, चारा देणे, दूध काढणे आदी कामांसाठी सहा मजूर 
  सलिम शेख यांच्या कुटुंबाकडे गोसंगोपनची जबाबदारी. संतोष शेवाळे, श्री. तळेकर गोठा व्यवस्थापन पाहतात. गोशाळा आणि व्यवसाय कामात बंधू सचिन, आई, वडिलांची मदत
  पंचवीस एकरांपैकी सहा एकरांवर लसूण घास, संकरित गवत, मका. आवश्यकतेनुसार चारा, पशुखाद्य खरेदी
  तीन एकरांवरील नर्सरी भाडेतत्त्वावर. गोशाळेच्या जागेव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रावर ऊस, फळझाडे, ऊस  
  महिन्याला सुमारे १० ट्रॉलीपर्यंत शेणखत उपलब्ध. त्याचा आपल्या शेतासाठी वापर. उर्वरित विक्री 

दैनंदिन कामकाज
गोठ्यात भल्या पहाटे चार वाजता आंबवण खाऊ घालून दूध काढण्यात येते. त्यानंतर गोठ्याची व गायींची साफसफाई केली जाते. गायींना खाद्य देऊन नऊ वाजता पाणी दिले की गोठ्याचा दरवाजा बंद करून जनावरांना आराम करण्यासाठी वेळ दिला जातो. दुपारी तीन वाजता पुन्हा खाण्यास देऊन चार वाजता दूध काढण्यास सुरवात होते. संध्याकाळी सात वाजता दरवाजा बंद करून दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा तो उघडला जातो. 

बैलांमुळे पंचक्रोशीत मान
गोशाळेत लीलडी (गीर), लालकंधार, थारपारकर, साहिवाल आदी मिळून १४ वळू पैदाशीसाठी सांभाळले आहेत. ‘क्रॉस ब्रिडिंग’ कटाक्षाने टाळण्यात येते. बैलगाडा शर्यतीचाही काजळे यांना छंद होता. मात्र, आता शर्यतींवर बंदी आली आहे. तरीही त्यांच्याकडे शर्यतीसाठी पळणारे बैल पाहण्यास मिळतात. साहजिकच काजळे यांचा पंचक्रोशीत मान वाढला आहे. बैलगाडा शर्यतीचे अनेक घाट या बैलांनी गाजवले आहेत.

बंगल्यातील जागेतही गोपालन 
मंचर शहरातील आपल्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेतही मुक्त गोठा आहे. तेथे दहा गायींची सांभाळ केला जातो. समोरच्या भागात असलेल्या लॉनवर वासरांना मुक्तपणे फिरू दिले जाते. आजूबाजूच्या लोकांना त्यामुळे थारपारकर, साहिवाल, हरियाणी, काळी कपिला पाहण्याची संधी मिळते. गायींचे दर्शन घेण्यासाठी, त्यांना नैवेद्य देण्यासाठीही अनेकजण येतात. या गायी- वासरांना घरातील सदस्यांप्रमाणे प्रेम दिले जाते. गंगा, जमुना, बेला, सुरभी, नंदिनी, रघू, भोला, बंडू अशी नावे त्यांना देण्यात आली आहेत. या भागात पक्ष्यांचाही अधिवास वाढला आहे.

दुधाची थेट विक्री
दूध केवळ दोनच सडांचेच काढले जाते, उर्वरित दोन सड वासरांसाठी असतात. वासराला सुरुवातीचे एक सडाचे दूध पाजले जाते. पचनशक्ती आणि शरीराची गरज पाहून मग दोन सडांचे दूध देण्यास सुरुवात होते. हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. दररोज एकूण ४० लिटर दुधाचे संकलन होते. नेहमीचे ग्राहक तयार केले आहेत. त्यामध्ये वृद्ध मंडळी, लहान मुले, रुग्ण आदी असल्याने दुधाचा दर आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिलिटर ७० रुपये त्याचा दर आहे. सकाळी व सायंकाळी ७ ते ९ या काळात विक्री होते. दुधाच्या उत्पन्नाचा वाटा गोठ्यातील गरजांसाठी वापरण्यात येतो. पशुखाद्य, वैद्यकीय उपचार, वीजबिल, मजुरी असा मिळून महिन्याला सुमारे ६० हजार रुपये खर्च होतो.

शेणापासून मूर्ती तयार करणार
ग्राहकांकडून असलेली मागणी लक्षात घेऊन देशी गोमूत्र व शेणापासून साबण, शाम्पू, फेसपॅक, गोमूत्र अर्क, गोमूत्र घनवटी, धूप, उदबत्ती आदी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात शेणापासून विविध मूर्ती, दिवाळीसाठी पणत्या तयार करण्याचे नियोजन आहे. 

विविध वाणांच्या गायींची विविधता  
  सुरुवातीला स्थानिक जातीच्या गायींना प्राधान्य 
  पंजाबहून साहीवाल गाय आणली. राठी, खिलार, गीर, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, काळी तसेच सोनेरी कपिला, थारपारकर, हरियाणी अशी गायींची साधली विविधता
  इतरांच्या गोठ्याला भेट देताना आवडलेली गाय किंवा बैल मागेल त्या किमतीस मोजून खरेदी 
  सध्या लहान-मोठ्या मिळून सुमारे ६० गायी. पैकी ७० टक्के पैदास गोठ्यात. 

  नितीन काजळे, ९६८९७८२४३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT