कोकोपीट व ट्रेमध्ये कलिंगड रोपवाटिका. 
अ‍ॅग्रो

कलिंगड पिकाची सुधारित लागवड

डॉ. पी. ए. साबळे, सुषमा साबळे

कलिंगड लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा योग्य निचरा होणारी, उदासीन सामूची (६.५-७.० सामू) जमीन योग्य ठरते. आठपेक्षा जास्त सामू, जास्त चुनखडीचे प्रमाण कलिंगड लागवडीसाठी योग्य ठरत नाही. जमिनीत कार्बोनेट व बायकार्बोनेट विद्राव्य क्षार कलिंगड लागवडीसाठी योग्य ठरत नाही. सर्वसाधारणपणे नदीकाठची पोयटा रेतीमिश्रित जमीन या पिकास योग्य ठरते. 

उन्हाळा हंगामासाठी साधारणतः थंडी कमी झाल्यावर लागवड योग्य ठरते. उन्हाळ्यात कलिंगड फळास चांगली मागणी राहते. या पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. फळाच्या वाढ आणि विकास काळाच्या दरम्यान फळाच्या गराची गोडी वाढण्यासाठी प्रामुख्याने उष्ण दिवस (तापमान ३० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त) व थंड रात्र हवामान योग्य ठरते. 

सरी किंवा आळे पद्धतीने लागवड  
लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून प्रति हेक्टरी १५-२० टन कुजलेले शेणखत खत जमिनीत मिसळून दोन वखर पाळ्या द्याव्यात. लागवड साधारणतः सरी पद्धतीने, आळे पद्धतीने किंवा गादी वाफा पद्धतीने करू शकतो. सरी पद्धतीने लागवड केल्यास १८०-२०० सेंमी x ५०-६० सेंमी अंतरावर लागवड करावी. सरीच्या दोन्ही बाजूस ५०-६० सेमी अंतरावर लहान आळी करून एका आळ्यामध्ये सरळ वाणाच्या ४ किंवा संकरित जातींचे २ बिया टोकाव्यात. प्रती हेक्टरी साधारणत: सरळ वाणाचे २.५-३ किलो, तर संकरित जातींचे ७५०-८७५ ग्रॅम बी पुरेसे होते. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बिया कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लीटर पाणी या द्रावणात ३ तास भिजवून घ्याव्यात. बियांचे आवरण टणक असल्यामुळे उगवण क्षमता वाढवण्यासाठी त्याच बिया नंतर ओलसर पोत्याच्या गुंडाळीत १२ तास ठेऊन नंतर लागवडीसाठी वापराव्यात.    

गादीवाफे पद्धतीने लागवड  
गादी वाफ्यावर लागवडीसाठी मशागतीनंतर ६० सेमी रुंद व १५-२० सेमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये १८०-२०० सेंमी अंतर ठेवावे. गादीवाफा तयार करत असताना साधारणतः युरिया १०९ किलो (नत्र ५० किलो), सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो (स्फुरद ५० किलो) आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो (पालाश ५० किलो) रासायनिक खतांची मात्रा प्रती हेक्टरी पायाभूत स्वरूपात द्यावी. गादीवाफ्यावर मधोमध ठिबकची लॅटरल पसरावी. त्यानंतर १२० सेंमी (४ फूट) रुंदीचा २५-३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर पसरावा. मल्चिंग पेपर लावताना तो गादीवाफ्याला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी. मल्चिंग पेपरला रोपे लागवडीपूर्वी किमान एक दिवस आधी बाजूस ५०-६० सेंमी अंतरावर छिद्रे करून घ्यावीत. त्यामुळे आत तयार झालेली उष्ण हवा निघून जाईल. रोपे तयार करून किंवा थेट गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करू शकतो. 

टोकण पद्धतीऐवजी रोपवाटिका  
टोकण पद्धतीमध्ये उगवणक्षमता कमी राहते. न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकावे लागते. पर्यायाने खर्चात वाढ होते. शक्यतो रोपे कोकोपीट ट्रेमध्ये तयार करून लागवड करावी. रोपे तयार होण्यासाठी २०-२५ दिवसांचा कालावधी लागतो. लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत. गादीवाफ्यात वापसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करावी. 

अन्नद्रव्य व्यवस्थापन 
वर नमूद केल्याप्रमाणे प्रती हेक्टरी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश रासायनिक खतांची मात्रा लागवडीच्या अगोदर वाफे बनवताना पायाभूत स्वरूपात द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा (५० किलो नत्र / युरिया १०९ किलो) लागवडीनंतर १, १.५  आणि २ महिन्याने प्रति हेक्टरी तीन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. वेलींना भर द्यावी.  उत्पादन वाढीसाठी विद्राव्य खते फवारणीद्वारे देता येतात. त्याचे नियोजन साधारणपणे खालील प्रमाणे करावे. 

  • पीक १५ दिवसाचे झाले असता १९:१९:१९ ची २-३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी. 
  • पहिल्या फवारणीनंतर ३० दिवसांनी सूक्ष्मअन्नद्रव्ये (ग्रेड नं. २ - फेरस २.५%,  झिंक ३%, मँगेनीज १%, कॉपर १% मॉलिब्डेनम १%, बोरॉन ०.५%)  २.५- ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • पीक फुलोरा आणि फळ धारणा अवस्थेत असताना ००:५२:३४ ची ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करू शकतो. 
  • फुलोरा अवस्थेत ०:५२:३४ सोबत सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी केल्यास बोरॉनची उपलब्धता होऊ शकते. बोरॉनच्या कमतरतेमुळे फळांचे तडकण्याचे प्रमाण वाढते. 
  • फळ पोसत असताना १३:००:४५ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

फूल आणि फळ व्यवस्थापन 
पाण्याच्या अनियमित वेळ व मात्रेमुळे फूल व फळांची गळ होऊ शकते, तसेच फळे तडकण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याची मात्रा व वेळ निश्चित करावी. फळ लागण्यास सुरवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नये. पाणी दुपारच्या वेळी देऊ नये.   
- डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ 
(उद्यानविद्या विभाग, के. व्ही. के, सरदारकृिषनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, खेडब्राह्मा, गुजरात.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT