Modernized fisheries in Four-acre farm  
अ‍ॅग्रो

चार एकर शेततळ्यात आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन  

मुकुंद पिंगळे

नाशिक जिल्ह्यातील पुतळेवाडी येथील धारणकर कुटुंबाने २६ एकरांत डाळिंब बागेचा विस्तार केला आहे. दोघा चुलतबंधूंचे मिळून चार एकरांत आठ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे. त्यात विविध जातींच्या माशांचे संगोपन, विविध तंत्र व व्यवस्थापनाची जोड देत डाळिंब शेतीबरोबरच पूरक उद्योगातूनही अर्थकारण सक्षम केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणग्रस्त भाग आहे. तालुक्यातील पुतळेवाडी येथील बबनराव धामणकर यांची सुमारे २८ एकर शेती आहे. पूर्वी पारंपरिक असलेल्या शेतीला त्यांनी फलोत्पादनात रुपांतरित केले. यातूनच २२ एकरांत द्राक्षाची लागवड करण्यात आली. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने सिंचनासाठी अडचणी येऊ लागल्या. त्यातच सतत जाणवणाऱ्या मजूरटंचाईला कंटाळून द्राक्षबाग काढावी लागली. पुढे पर्यायी फळपीक म्हणून २००९ मध्ये १५ एकरांत डाळिंब बाग लावली. पुढे टप्प्याटप्प्याने २०१२ मध्ये पाच एकर व पुन्हा २०१७ मध्ये सात एकरांत त्याचा विस्तार करण्यात आला. आज सुमारे २६ एकरांत डाळिंब बाग उभी आहे. 

शेततळ्यात यशस्वी जलसंधारण 
डाळिंबाचे क्षेत्र अधिक असल्याने पाण्याची शाश्‍वती होण्याची गरज होती. त्यादृष्टीने २०१३ मध्ये दोन एकरांत शेततळे उभारले. त्याच्याच बाजूला चुलतभावाचेही दोन एकर शेततळे आहे. विहीर व बोअरवेल्सच्या माध्यमातून या शेततळ्यांमध्ये पाणी साठविले जाते. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा संचय केला जातो. प्रत्येकी चार कोटी यानुसार दोन्ही शेततळ्यांची मिळून आठ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता तयार झाली.  

तीन बहारांत डाळिंबाचे व्यवस्थापन
डाळिंबाचे दर बेभरवशाचे असतात. त्यामुळे एका बहारात दर कमी मिळाल्यास दुसऱ्या बहारात ते समाधानकारक राहावेत यासाठी लागवड हस्त, मृग व आंबिया अशा तीन बहारांत केली जाते.  जैविक खते व कीडनाशकांचा वापर अधिक प्रमाणावर केला जातो. संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. टाकाऊ घटकांचा वापर करून उन्हाळ्यात झाडांना सेंद्रिय पद्धतीचे मल्चिंग करण्यात येते. मुरमाड जमीन असल्याने जलव्यवस्थापन काटेकोर करण्यात येते.

काढणी व विक्री नियोजन 
हाताळणी व प्रतवारी करून माल बाजारात पाठविला जातो. डागी फळे प्रामुख्याने बाजूला काढली जातात. वीस किलो वजनाच्या क्रेटमधून माल नाशिकमध्ये पाठवण्यात येतो. हा माल पुढे प्रामुख्याने निर्यातीसाठी जातो. भगवा वाण असून एकरी चार ते पाच टन उत्पादन दरवर्षी मिळते. 

मत्स्यपालनाचा अनुभव 
शेततळ्याच्या माध्यमातून पिकाची गरज पूर्ण होऊन उन्हाळ्यात १५ फुटापर्यंत पाणी शिल्लक राहत असे. त्याचा पर्यायी वापर व्हावा म्हणून मत्स्यपालन व्यवसाय करण्याचे ठरविले. सन २०१४ पासून ते आजगायत हा पूरक व्यवसाय धामणकर चिकाटीने करताहेत. सुरुवातीला आपल्या दोन एकरांतच ते मत्स्यपालन करायचे. आता संपूर्ण चार एकर शेततळ्यात ते होते. आपल्या अनुभवातून व सातत्यातून नऊ किलो वजनापर्यंतचा मासा तयार करण्याचे कसब धारणकर यांनी आत्मसात केले आहे.

सुरुवातीचे अपयश   
सुरुवातीला राहू, कटला, कोंबडा आदी जातींचे ३५ हजार बीज पाण्यात सोडले होते. मात्र तांत्रिक अडचणी व मार्गदर्शनाचा अभाव असल्याने पहिल्या वर्षी अपयश आले. सन २०१५ मध्ये घराजवळ १० बाय १५ बाय पाच फूट खोलीच्या तळ्याची निर्मिती केली. यातील मत्स्यपालनातही अपयश आले. ऑक्सिजन, पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे न झाल्याने मत्स्य बीजांची ८० टक्के मरतुक झाली. तरीही हार न मानता मत्स्यशेतीचा ध्यास काही सोडला नाही. 

प्रशिक्षणातून अवगत केले तंत्र 
कुटुंबातील संदीप यांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत पदविका घेतली आहे. त्यांच्या पत्नी राजश्री कृषी पदवीधर आहेत. मत्स्यपालनात सलग दोन वर्षे नुकसान सहन करावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून २०१७ मध्ये बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात चार दिवसांचे मत्स्यपालन विषयातील व्यावसायिक प्रमाणपत्र प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातही या विषयातील प्रशिक्षण घेतले. यासह पुणे, हैदराबाद येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात मत्स्यशेतीबाबत माहिती मिळविली. त्यातून खाद्य, औषध व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाय, काढणी व विक्री याबाबत अधिक माहिती घेतली. 

मत्स्यबिजांची उपलब्धता 
आत्तापर्यंत कोलकता व हैदराबाद येथून मत्स्यबीज उपलब्ध केले आहे. मत्स्यबीज ऑर्डर केल्यानंतर पुणे विमानतळावरून ते घेऊन जावे लागते. रोहू, कटला या माशांबाबत अनुभव सांगताना संदीप म्हणाले की, या माशांचे वजन साधारण अडीच किलोपर्यंत झाल्याशिवाय त्यांना चांगली किंमत येत नाही. तेवढी वाढ होण्यासाठी किमान पावणेदोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. त्यांना किलोला ८० ते १०० रुपये दर मिळतो. सुरुवातीची दोन वर्षे फार समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही. दोन्ही शेततळ्यांत मिळून चार ते पाच टन एवढेच उत्पादन मिळाले. पण त्यापुढील वर्षी एकूण १६ टन उत्पादन मिळाले. त्या वेळी खर्च वजा  जाता ११ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती आले. मत्स्यशेती करणाऱ्या व्यक्ती ठराविकच असल्याने त्याची माहिती संबंधित व्यापाऱ्यांना असते. ते स्वतः संपर्क करून खरेदीविषयी चौकशी करतात. जागेवरच खरेदी होत असल्याचा फायदा होतो. कोपरगाव, कोळपेवाडी, चासनळी, श्रीरामपूर, सिन्नर, निफाड, नाशिक या बाजारांत विक्री होते.  

रुपचंद व तिलापिया
यंदा माशांच्या संगोपनात बदल केला आहे. रुपचंद, तिलापिया या माशांचे दोन शेततळ्यात अनुक्रमे एक लाख व सत्तर हजार या प्रमाणात बीज सोडले. आता त्यांची मध्यम प्रमाणात वाढ झाली आहे. यंदाचा तपशील सांगायचा तर खाद्य ८.५ लाख रुपये, औषधे ३५ हजार रुपये, भौतिक व्यवस्था दीड लाख रुपये, मजुरी, अन्य किरकोळ असा वर्षभरातील एकूण खर्च १२ लाख रुपयांपर्यंत गेला आहे. हे मासे वर्षभराच्या काळात वजनाला सुमारे सातशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत भरतात. रोहू, कटला यांच्या तुलनेत त्यांच्या संगोपनाचा हा फायदा असल्याचे संदीप सांगतात. या माशांना किलोला ८० ते १०० रुपये दर अपेक्षित आहे. यंदा ३५ ते ४० टन उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.   

डाळिंब गुणवत्तेत वाढ 
निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्याचा धामणकर यांचा प्रयत्न असतो. मत्स्यशेती केलेल्या तळ्यात शेवाळ वाढण्यासाठी युरिया आणि शेणाचा वापर केला जातो. त्याचे खत तयार होते. माशांची विष्ठाही पाण्यातच सोडली जाते. यामुळे पाण्यात नैसर्गिक खताची निर्मिती होते. हेच पाणी पिकांना देण्यात येते. त्याचा फायदा डाळिंबाच्या उत्पादनात झाला आहे. रंग, आकार व चकाकी आल्याने व्यापाऱ्यांकडून चांगला दर मिळतो. अलीकडील काळात किलोला ७० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे संदीप यांनी सांगितले. 

कौटुंबिक पातळीवर शेतीकामांचे व्यवस्थापन 
वडील बबनराव आर्थिक व्यवस्थापन बघतात. त्यानंतर शेतीची मुख्य जबाबदारी संदीप यांच्यावर आहे. डाळिंब बाग व मत्स्यपालन यांचे हंगामनिहाय व्यवस्थापन, कीडनाशक फवारण्या, शेतमाल काढणी, हाताळणी व प्रतवारी ही कामे ते पाहतात. मजूर उपलब्धता, निविष्ठा खरेदी या जबाबदाऱ्या जयंत पाहतात. त्यांच्या आई व पत्नी राजश्री या मजूर व्यवस्थापनावर अधिक लक्ष देतात. मर्यादित वेळेत अधिक काम, त्यासाठी खर्चाचे नियोजन, कमी खर्चात अधिक उत्पादन अशी धामणकर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत. 

सामाजिक व ग्रामविकास कार्यात सहभाग 
बबनराव रामपूर पुतळेवाडी गावाचे माजी सरपंच आहेत. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. संदीप स्वतः पोलिस पाटील म्हणून गावाचा कारभार पाहतात. आपल्या शेतीला भेट देणाऱ्या प्रत्येकाला ते डाळिंब व मत्स्यशेतीबाबत मार्गदर्शन करतात. 

मत्स्यपालन ठळक बाबी  
    नवीन हंगामासाठी मस्त्यबीज आणल्यानंतर सूर्योदयापूर्वी ते शेततळ्यात सोडण्यात येते.
    या वेळी पाण्याबरोबर खेकडे, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी शेततळ्यात जाणार नाहीत याकडे विशेष लक्ष देण्यात येते.
    माशांच्या खाद्य व्यवस्थापनासाठी मजूर तैनात केले आहेत. शेततळ्यात माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यांसारख्या सेंद्रिय पदार्थांचे मातीतील जिवाणूंमुळे विघटन करण्याची व्यवस्था करण्यात येते.
    शेततळ्यातील पाण्याची प्रत मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची शक्‍यता असते. अशावेळी शेततळ्यातील पाणी शेतीला पाणी देऊन नवीन पाणी शेततळ्यात भरण्याकडे विशेष लक्ष देण्यात येते.
    तळ्यात हिरवे किंवा निळसर प्लवंग किंवा शेवाळ वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. हंगामनिहाय नियोजन केल्याने बिजांच्या मरतुकीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वाढ होण्यासह चांगल्या वजनाचे मासे तयार होतात. दरवर्षी साधारण १५ टक्के मरतुकीचे प्रमाण असते. 
    योग्य आकार व वजन आल्यानंतर ओढजाळीच्या साहाय्याने मासे पाण्याबाहेर काढण्यात येतात.
    बाजारातून प्रथिने, जीवनसत्त्वे, फॅटस यांचा समावेश असलेले खाद्य दिले जाते. 
    मका, सोयाबीन व फिश ऑइल यांचा समावेश असलेले खाद्यही दिले जाते. माशांना या खाद्याकडे आकर्षित करण्यासाठी या ऑइलचा वापर होतो.  
    ऑक्सिजनची पातळी टिकविण्यासाठी त्याच्या गोळ्या शेततळ्यात गरजेनुसार टाकण्यात येतात.
    दर आठवड्याला अमोनिया तपासणी व त्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी औषधोपचार करण्यात येतात. 
    दररोज सकाळ व सायंकाळी असे दोन वेळा खाद्य देण्यात येते.
    प्रत्येक आठवड्यात ठराविक जाळीद्वारे मासे वरती काढून त्यांचे वजन तपासले जाते.
    माशांचे पोषण व वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही याचा अचूक अंदाज त्यातून घेण्यात येतो.
विशेष वापरलेली तंत्रे
    साप, बेडूक, खेकडे आदी जीव शेततळ्यात जाऊ नयेत यासाठी ॲंटीस्नेक नेट (साप प्रतिबंधात्मक जाळी) बसवण्यात आली आहे.
    त्याचबरोबर पाणकोंबडी व अन्य पक्ष्यांकडूनही नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण शेततळ्यावर ॲंटी बर्ड नेटची (पक्षी प्रतिबंधात्मक जाळी) सुविधा केली आहे.
    पाणी शुद्धीकरण करण्यासाठी शेततळ्याच्या बाजूला फिल्टर यंत्रणा बसविली आहे. या माध्यमातून विद्युतपंप तळाशी सोडण्यात येतो. त्याद्वारे माशांची विष्ठा व टाकाऊ घटक ओढून घेतले जातात. सॅण्ड फिल्टर असल्याने पाण्याची गाळणी चांगल्या प्रकारे होते. योग्य पाणी शेतीसाठी वापरण्यात येते.  
 संदीप धारणकर- ९६८९९२३११८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT