अ‍ॅग्रो

कापसासाठी पुढील हंगामात तेजीचे संकेत

राजेंद्र जाधव

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांपुढे खरीप हंगामात कुठल्या पिकांची निवड करावी हा यक्षप्रश्न असतो. कारण पेरणीच्या वेळी बाजारात असलेला दर काढणीच्या वेळी मिळेलच याची काही शाश्वती नसते. उदाहरण म्हणून तुरीकडं पाहता येईल. जून २०१६ मध्ये तुरीची लागवड करताना दर होता १०,५०० रुपये क्विंटल. शेतकऱ्यांनी तुरीची काढणी करून माल बाजारात आणला तेव्हा म्हणजे फेब्रुवारी २०१७ मध्ये दर आला ३४०० रुपयांवर. राज्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा कापसाचा असतो. पण यंदा गुलाबी बोंड अळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणल्यानं ते येत्या हंगामात कापसाची लागवड करावी की नाही या संभ्रमात आहेत. परंतु जागतिक परिस्थिती पाहता येत्या हंगामात कापसाला चांगले दर मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशेचा किरण दिसत आहे.

 कापसाच्या आयातीवर आणि निर्यातीवर कुठलंही शुल्क नसल्यानं कापूस हे खऱ्या अर्थानं जागतिक बाजाराशी जोडलं गेललं पीक आहे. सध्या जागतिक बाजारातून कापसामध्ये तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्तांमध्ये तणाव वाढला असून त्यांच्यात व्यापार युद्धाची (ट्रेड वॉर) ठिणगी पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर मागच्या महिन्यात आयात कर लागून करण्याचा सपाटा लावला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेतून येणा-या कापूस, सोयाबीन अशा शेतमालावर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश आहे, तर भारत कापसाच्या उत्पादनात अव्वल आहे. कापसाचा सर्वाधिक वापर चीनमध्ये होतो. अमेरिकेतून येणाऱ्या कापसावर २५ टक्के आयात शुल्क असल्याने चीनमधील कापड उद्योगाला इतर देशांतून कापूस आयात करण्याशिवाय पर्याय नाही. आयात शुल्क जाहीर झाल्यानंतर केवळ एका आठवड्यात चीनने भारतातून दोन लाख गाठी कापूस खरेदी केला. एकंदर अमेरिका आणि चीन या देशांतील व्यापार युद्धामुळे भारतातील कापूस उत्पादकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

 अमेरिकेच्या खालोखाल भारत, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील हे देश महत्त्वाचे कापूस निर्यातदार आहेत. मात्र भारतातून चीनला कापूस निर्यात करताना वाहतूक खर्चात मोठी बचत होते. भारतातील कापूस केवळ दोन आठवड्यात चीनला पोचतो, तर ब्राझीलमधून चीनला कापूस पोचण्यास जवळपास दीड महिना लागतो. त्यामुळे चीनमधील वस्त्रोद्योगाची पहिली पसंती भारतीय कापसाला आहे.

चीनची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. चार वर्षांपूर्वीपर्यंत चीन हा जगातील सर्वात मोठा कापूस आयातदार देश होता. परंतु मागील काही वर्षांत चीनने देशातील कापसाचा साठा कमी करण्यासाठी कापसाच्या आयातीवर बंधनं घातली. त्यामुळे चीनमधील कापसाचा साठा जवळपास निम्म्याने कमी झाला आहे. जो माल शिल्लक आहे त्यातील बराचसा साठा चांगल्या प्रतीचा नाही. त्यामुळे चीनला २०१८/१९ च्या हंगामात कापूस आयात वाढवण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसावर २५ टक्के आयात शुल्क असल्याने अमेरिकेच्या पर्यायावर फुली मारावी लागणार.  याचा परिणाम म्हणून भारताची चीनला होणारी कापसाची निर्यात आठ लाख गाठींवरून पुढील वर्षी २५ लाख गाठींवर जाऊ शकते. त्यामुळे देशातील एकूण कापूस निर्यातीला चांगले दिवस येणार असून ती ७० लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. 

अमेरिकेत सर्वाधिक कापूस टेक्सास या प्रांतात होतो. तिथं नेहमीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा कापसाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कापसाचे दर आणखी वधारून भारतीय कापसाच्या मागणीत वाढ होईल.

कापसाची निर्यात पुढील वर्षी वाढण्याची शक्‍यता असताना दुसऱ्या बाजूला देशातील कापसाचा साठा कमी होत आहे. या हंगामाच्या शेवटी देशातील कापसाचा साठा मागील हंगामाच्या तुलनेत निम्मा होण्याची शक्यता आहे. त्यातच गुलाबी बोंड अळीमुळे मागील वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने कापसाच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी कापसाचे मोठे उत्पादन अपेक्षित नाही. त्याचाही परिणाम कापसाच्या दरावर होईल आणि तेजीला हातभार लागेल, असे सध्याचे चित्र आहे. 

कापसाला दर चांगले राहतील, असे स्पष्ट संकेत मिळत असले तरी बोंड अळी ही शेतकऱ्यांपुढची सगळ्यात मोठी धोंड आहे. ज्यांना बोंड अळीचं नियंत्रण करून कापूस उत्पादन घेणं शक्य आहे त्यांनी कापसाला प्राधान्य देण्यास हरकत नाही. जे शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिकं घेतात त्यांनी मागील वर्षी सोयाबीन ची लागवड केली होती त्या क्षेत्रात येत्या हंगामात कापसाची लागवड करावी; तर कापसाची लागवड केलेल्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. बाजारपेठेत केवळ चांगला दर मिळून फायदा नाही तर त्यासोबत उत्पादनातही वाढ झाली तरच शेतकऱ्यांना खरा फायदा होईल. त्यामुळे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळवण्यात किती यश येते यावरच कापसाचा पुढचा हंगाम शेतकऱ्यांसाठी किती दिलासा देणारा ठरतो, याचं उत्तर अवलंबून आहे. 

(लेखक वरिष्ठ पत्रकार व शेतमाल बाजार अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागले, इंग्रज परवडले : उद्धव ठाकरे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT