Prashant-Latpate
Prashant-Latpate 
अ‍ॅग्रो

आडसाली उसाचे एकरी १२९ टन उत्पादन

अभिजित डाके

सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर व मातीची जडणघडण याद्वारे एकेकाळी एकरी ३६ टनाची ऊस उत्पादकता त्यांनी १२० टनांपर्यंत नेली आहे. यंदा आडसाली हंगामात ७७ गुंठ्यांत २४९ टन म्हणजे एकरी १२९ टन उत्पादनापर्यंत मजल मारत राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे.

सांगली हा द्राक्ष, भाजीपाला यांच्याबरोबर उसाचा जिल्हा म्हणूनही प्रसिद्ध आहे. सांगलीपासून सुमारे  वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर मिरज तालुक्यात सावळवाडी गाव लागते. गावालगत वारणा नदी वाहते. या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गावातील प्रशांत लटपटे यांची दोन एकर दहा गुंठे शेती आहे. जमीन मुरमाड, काळी मध्यम प्रतीची आहे. सातवी उत्तीर्ण असलेल्या प्रशांत यांच्यावरील वडिलांचे छत्र १९८८ मध्ये हरपले. साहजिकच घरची व शेतीची जबाबदारी अंगावर पडली. त्या वेळी आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असायची. मग प्रशांत दुसऱ्याच्या शेतात काम करू लागले. घरची शेती कसणेही सुरू होते. त्यातच मूळ गावठाणातून वारणा नदी गेली असल्याने जागा अधिग्रहित झाली. त्यात घरं गेलं. खरं तर सावळवाडी गावाचंच पुनर्वसन झालं आहे. 

संघर्षातून शेती 
प्रशांत मोठ्या जिद्दीचे. जागा गेली तरी जिद्दीने नवे घर बांधले. उसाची शेती सुरू होती. को- ८६०३२ वाण होता. पण शेती व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर होत नव्हती. अभ्यास केला तर बदल घडू शकतो असे प्रशांत यांना वाटले. सन २००० मध्ये थेट कृषी विभाग गाठून सुधारीत ऊस लागवड पद्धतीची माहिती घेतली. त्यानुसार व्यवस्थापन सुरू केले. यश मिळू लागले. पुढे आत्मविश्‍वास वाढला. भावाची एक एकर शेतीदेखील भाडेतत्त्वावर कसायला घेतली.  

सल्ला ठरला महत्त्वाचा 
 केवळ सल्ला घेऊन उपयोग होत नाही. तो अमलात आणला तरच यशस्वी होता येतं हे वेळीच उमगलं. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रात सन २००७ च्या दरम्यान डॉ. धर्मेंद्र फाळके कार्यरत होते. प्रशांत यांची कलिंगडाची शेती पाहण्याचा योग त्यांना आला. त्या वेळी उसाचा पाला जाळू नका असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर पाचट व्यवस्थापन म्हणजे काय? त्याचा फायदा काय हे उमगू लागलं. तेव्हापासून आत्तापर्यंत उसाचा पाला न जाळण्याची पद्धत कायम ठेवली आहे. 

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 
  दहा महिने वयाच्या बेण्याची निवड 
  वाण- को ८६०३२  
  व्हीएसआय किंवा पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील बेण्याचा वापर  
  एकरी ४ हजार डोळा वापर, ५०० डोळे अधिक आणण्यात येतात.  
  एकरी डीएपी एक पोते, युरीया दोन पोती, पोटॅश एक पोते, गंधक १० किलो यांचा बेसल डोस 
  लागवड करते वेळी सरीच्या बाजूला जादा आणलेल्या डोळ्यांची लागवड. मर झालेल्या ठिकाणी किंवा उगवण न झालेल्या ठिकाणी त्यांची लागवड शक्य.   
  कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या द्रावणाची बेणेप्रक्रिया  
  रासायिक आणि सेंद्रिय खतांचे डोस दोन्ही बाजूला टाकून कोळप्याच्या साहाय्याने माती आड  
  हिरवळीच्या पिकांची दोन वेळा लागवड 
उसात कलिंगड 
उसात कलिंगडाचे आंतरपीक घेतले जाते. यंदा उसानंतर दोन एकरांत घेतलेल्या कलिंगडाचे एकरी ३२ टन  उत्पादन मिळाले आहे. कमाल दर ११ रुपये प्रति किलो मिळाला आहे. कलिंगडातून आलेल्या पैशातून उसाचा खर्च कमी होऊन उसाचे येणारे पैसे शिल्लक राहतात. 
उसाची संख्या 
प्रशांत म्हणाले की, वरिष्ठ ऊसशास्त्रज्ञ ज्ञानदेव हापसे माझी शेती पाहण्यासाठी आले. फुटवे, गाळपायोग्य ऊस यांची संख्या संतुलित ठेवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार यंदा ४४ गुंठ्यात पाच हजार ६०० डोळे लावले आहेत. एकरी दरवर्षी ३५ ते ३७ हजार ऊससंख्या ठेवण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येकाचे वजन सरासरी ३ किलो व त्याहून अधिक असते. 

मिळणारे एकरी उत्पादन व उत्पन्न (लागवडीचा ऊस) 
  सन २०१६-१७- ११० टन    
  २०१७-१८- १२० टन- खर्च   
  २०१८-१९ मध्ये ७७ गुंठे- २४९ टन. म्हणजेच एकरी १२९ टन उत्पादन
  उत्पादन खर्च- एकरी- एक लाख ते एक लाख १० हजार रु.
  राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला ऊस दिला जातो. 
  खोडवा ऊस उत्पादन एकरी ८० टन.
  मिळणारा दर - २८०० ते २९०० रुपये प्रति टन 

पूर्वीची ऊस शेती 
  सन १९९९ च्या दरम्यान अडीच फूट सरी पद्धतीचा अवलंब 
  दोन डोळ्यांच्या कांडीचा वापर 
  एकरी उत्पादन ३६ ते ३८ टन 
  पुढे २००६ नंतर साडेतीन, साडेचार फूट सरी अवलंब 
  सरासरी एकरी उत्पादन ८० ते ९० टनांपर्यंत  

आजची शेती
  दरवर्षी माती परिक्षण. त्यानुसार अन्नघटकांची मात्रा.  
  ७० टक्के सेंद्रिय खतांचा तर ३० टक्के रासायनिक खतांचा वापर 
  शक्यतो खोडवा घेतला जात नाही. 
  दरवर्षी पाचटाचा वापर तसेच एकरी पाच ट्रेलर शेणखत 
  कंपोष्ट खत १५ टन- बाहेरून विकत घेतले जाते. 
  दरवर्षी शेतात ८ ते १० दिवस शेतात मेंढ्याही बसवण्यात येतात. 
  पाच फुटी सरीचा अवलंब 
  एक डोळा पद्धतीचा वापर 
  दोन डोळ्यांतील अंतर दोन फूट. त्यामुळे फुटवा चांगला येतो. ठिबकद्वारे दिलेली अन्नद्रव्येही नेटक्या पद्धतीने मिळतात. सूर्यप्रकाश जमिनीला मिळतो. उसाची जाडी, उंची वाढते.
- प्रशांत लटपटे, ९१७५४१२३०७, ८३२९७६०६८६

शेतीमुळेच आर्थिक संपन्नता आली. माझ्या जमिनीचे परीक्षण पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने केले आहे. त्यात सेंद्रिय कर्ब १.५३ टक्के इतक्या अधिक प्रमाणात आढळल्याचे तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले. मी जमीन अत्यंत सुपीक व कसदार बनवली आहे. पत्नी सौ. अश्विनी आणि आई श्रीदेवी यांची समर्थ साथ आहे.
- प्रशांत लटपटे

प्रशांत हे अभ्यासू आणि नवीन तंत्राचा वापर करणारे शेतकरी आहेत. प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा  त्यांचा प्रयत्न असतो. सर्वसाधारण शेतीत सेंद्रिय कर्ब ०.३ ते ०.६ टक्के पाहावयास मिळतो. पण प्रशांत यांनी सेंद्रिय घटकांच्या योग्य वापरातून सेंद्रिय कर्ब वाढवला आहे. तोच उसाच्या उत्पादन वाढीचे प्रमुख सूत्र आहे. 
- डॉ. ज्ञानदेव हापसे, वरिष्ठ ऊसशास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT