Weaver lady 
अ‍ॅग्रो

विणकर महिलांच्या आयुष्याला पैठणीची भरजरी

संतोष मुंढे

स्वतःमधील क्षमतेची जाणीव झाल्याने ''आम्ही विणकर'' म्हणत एकत्र आलेल्या पैठण (जि. औरंगाबाद) येथील सावित्रीच्या साठ लेकींची रेशीम विभागाच्या आधारानं कंपनी स्थापन झाली. स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मजूर ते मालक असा प्रवास केलेल्या या महिलांना एकाच ठिकाणी पैठणीनिर्मिती ‘क्लस्टर’चा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून घरेही मंजूर झाल्यानं त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. प्रतिकूल परिस्‍थितीत स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या विणकर महिलांच्या आयुष्यात हास्य फुलणार आहे. पैठणीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उपसलेल्या कष्टातून उभी राहणारी प्रस्तावित वास्तू देशात एकमाद्वितीय ठरू शकणारी आहे. 

तळहातावरचं जीणं असलेल्या पैठण (जि. औरंगाबाद) परिसरातील महिलांना घरकाम करून पैठणीच्या विणकामासाठी जावे लागायचे. सकाळी दहा ते पाच अशा बांधलेल्या वेळात आपल्या जबाबदारीला न्याय द्यावा लागत होता. पैठणीची निर्मिती म्हणजे कला आणि तीक्ष्ण नजर आवश्‍यक असलेलं काम. कामाला न्याय देताना विणकर महिलांनी सहनशीलता, सक्षमतेचा सातत्याने परिचय दिला. या दरम्यान आलेल्या अनेक संकटांनंतही दुर्दम्य आत्मविश्‍वास व इच्छाशक्‍तीच्या बळावर त्यांची वाटचाल सुरूच राहिली.  

मजूर झाल्या मालकीण 
या पैठणी विणकर महिलांचे संघटन करण्याचे प्रयत्न रेशीम विभागावतीने सुरू झाले. पैठणीचं राजवैभव पुन्हा मिळवण्याचा हा भाग होता. सन २०१० च्या सुमारास राष्ट्रमाता इंदिरा गांधी हातमाग विणकर महिला संस्था स्थापन झाली. त्या माध्यमातून साठ विणकर महिला एकत्र आल्या. त्यांना ५५ हातमाग हे केंद्रीय रेशीम मंडळ व महाराष्ट्र  शासनाच्या अनुदान योजनेद्वारे उपलब्ध झाले. त्यामुळे मजुरीसाठी महिन्याला हजार ते दोन हजार रुपयांचा मेहनताना घेणाऱ्या महिलांना मालक होण्याची संधी प्राप्त झाली. त्या संधीचे सोने करताना आता महिन्याला किमान पाच ते दहा हजार व त्यापुढेही पैसे कमविण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली आहे. केवळ एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. सन २०१३ मध्ये पुष्पदीप पैठणी साडी क्‍लस्टर कंपनी स्थापन करून त्यांनी एकत्रितपणे जवळपास दोन एकर जागा औरंगाबाद -पैठण मार्गालगत खरेदी केली.

एकाच छताखाली सर्व काही 
पैठणी रेशीम धागानिर्मिती, धाग्याला पीळ देणे, धागा रंगविणे, जरनिर्मिती, पैठणीनिर्मिती व विक्री केंद्र, विणकरांची कुटुंबीयांसाठी निवास व्यवस्था आदी सर्व एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी पैठणी विणकर संस्थेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतून सर्वांसाठी घरे -२०२२ या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पैठण नगर परिषदेसह औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे तसेच नवनिर्माण संस्थेचेही सहकार्य मिळाले. ‘क्‍लस्टर’ उभारणीसाठी उद्योग विभागाचे सहसंचालक श्री. जोशी यांच्या प्रयत्नातून या विभागाकडून दोन कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली.

प्रस्तावित प्रकल्पाचे होणार असे फायदे 
  एकाच छताखाली साठ प्रकारच्या पैठणींचा कलाविष्कार. 
  ग्राहकांना थेट उत्पादकांकडूनच वाजवी दरात पैठणी खरेदी करण्याची संधी 
  खरेदी केलेली पैठणी नेमकी कशी तयार होते आहे हे पाहण्याची ग्राहकांना संधी 
  विणकरांच्या कलात्मकतेला वाव 
  मराठवाड्यातील उत्पादित रेशीम कोषांच्या प्रक्रियेची संधी 
  कमी प्रतिच्या कोषांपासूनही हार, बांगड्या, गुच्छ, वॉलपीस तयार करण्याची कला अवगत  
  माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राष्ट्रीय काॅँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोचली विणकरांची कला. 
  ग्राहकांच्या पसंतीनुसार पारंपरिक आसावरी, लोटस, मोरबांगडी, कुयरी मोर, स्वप्नवेल, मोरपोपट, कुयरी आदी विविध डिझाईन्स  
  पंचवीस हजार ते दोन लाख रुपये किमतीपर्यंतची पैठणी तयार करण्यापर्यंत महिलांची मजल  
  ''सीएमआयए’ द्वारा प्रकल्पासाठी सहा लाखांचे अर्थसाह्य. 

केंद्र व राज्य सरकारकडून आवास योजनेसाठी प्रत्येक विणकर महिलांना अडीच लाख रूपये अनुदान मिळणार आहे. विणकरांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘सीएसआर’ फंडातून घरं आणि पैठणी क्‍लस्टरसाठी मंजूर असलेल्या निधीतून देशातील एकमेवाद्वितीय प्रकल्पाला पूर्ण रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- दिलीप हाके, ९९६०३९१२७२ उपसंचालक, रेशीम नागपूर. 

पैठणीची विविध रूपं एकाच छताखाली थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. कोषांचे धाग्यात रूपांतर करून त्यापासून वैभवशाली पैठणी निर्माण होईल. ‘क्‍लस्टर’मुळे पैठणीचे पुनरूज्जीवन होईल. अन्य महिलांनाही प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीला वाव मिळेल. 
- बी. के. सातदिवे, ९४२०१९१०६७ जिल्हा रेशीम विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक संचालक,  प्रादेशिक रेशीम कार्यालय, औरंगाबाद. 

खूप कष्टात दिवस काढले, घर आणि उद्योग एका जागेवर असावा असा प्रयत्न आहे. आम्हा विणकर महिलांना एकमेकांना आधार मिळून जीवन आनंदानं जगण्याची धडपड आहे. 
- पुष्पा पोकळे, ९२७०९५७५९१  विणकर महिला.
 
पूर्वी दोन हजारांपुढे मिळकत नव्हती. आम्ही एकत्र आलो. घरीच हातमागावर काम करायला लागलो.  आता महिन्याचं उत्पन्न चांगलंच वाढलं आहे. स्वप्नपूर्तीतील वास्तू पाहायची. पैठणीला वैभव मिळवून द्यायचं आहे. 
 - लक्ष्मी गोर्डे, विणकर महिला
 
घरची कामं करताना कुटुंबाला आर्थिक आधार होत आहे. आम्ही विणकर महिलांनी घेतलेल्या जागेत घर आणि उद्योग उभा राहावा हे स्वप्न आहे. 
- शमिना हमीद शहा, विणकर महिला  

बारा वर्षांत घरकाम करून आजवर हातमागावर जवळपास तीस पैठणी तयार केल्या. हातमाग मिळाल्यानं मुलांची शिक्षणं करण्यासाठी हातभार लाभला. महिन्यातून त्यातून चांगली अर्थप्राप्ती होत आहे. 
- ज्योती महेश जालिंद्रे 
 
सहा वर्षांपासून घरी हातमागावर पैठणी तयार करते. दोन ते अडीच लाख रुपये किमतीची पैठणी तयार केली. आम्ही सारे ‘क्‍लस्टर’मुळे एका ठिकाणी आलो तर एकमेकांच्या सुख-दुखाचे सहभागी होऊच. शिवाय ग्राहकांना एकाच ठिकाणी पैठणीच्या किमान साठ प्रकारच्या डिझाईन्स पाहायला मिळतील. 
- नंदा जनार्दन जालिंद्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT