अ‍ॅग्रो

युवकांनी घेतली ग्राम विकासाची जबाबदारी

गोपाल हागे

आजचा ग्रामीण युवक हा काळानुरूप बदल स्वीकारत आहे. अनेक जण विविध परीक्षांमध्ये चमकताना दिसतात. तरीही ग्रामीण भागात मार्गदर्शन, पायाभूत सुविधांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आहे. हीच दरी शेतकरी कुटुंबातील युवकांना सतावत होती. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या विचाराने अवघ्या २० ते २५ वर्षे वयोगटांतील तरुण-तरुणी २०१४ मध्ये एकत्र आले. त्यांनी विचारांती अकोला तालुक्‍यातील माझोड गावात ‘स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन' या स्वयंसेवी संस्थेची स्थापन केली. यासाठी पुढाकार होता तो राजेश ताले आणि त्यांच्या मित्रांचा. त्यांना नंतर सर्वांनी मिळून पाठबळ दिले आहे. आज जवळपास अकोला जिल्ह्यातील ७२० युवक, युवती या उपक्रमात सामील झाले आहेत.

‘स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन` ही एक संस्था नसून ते युवापिढीसाठी एक माध्यम बनले आहे. याद्वारे ग्रामीण भागातील गोरगरीब, सामान्य, शेतकरी कुटुंबातील शेकडो विद्यार्थी, तरुण सहभागी होऊन शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांसंदर्भातील माहिती घेत आहेत. या ग्रुपचे हे कार्य कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना जिल्हाभर विस्तारले आहे. स्वतःसाठी जगताना समाजासाठीही जगण्याच्या, काहीतरी परतफेड करण्याच्या हेतूने हे तरुण काम करीत आहेत.

स्पर्श वाचनालयाची साखळी 
ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी पिढी वाढत आहे. परंतु पाहिजे तितक्‍या सुविधा, साहित्य उपलब्ध नसते. अशा सुविधांअभावी माझोड गावातील मुलांना अकोला येथे जावे लागत होते. जाण्या-येण्यात त्यांचा बराचसा वेळ खर्ची व्हायचा. ही बाब ओळखत या गटाने माझोड गावात ‘स्पर्श' नावाने पहिले वाचनालय सुरू केले. सर्व सदस्यांनी मिळून वाचनालयासाठी पुस्तके व साहित्य लोकसहभागातून गोळा केले. माझोडनंतर मलकापूर गोंड, तांदळी, वाडेगाव, खिरपुरी, निंबी, खडकी आदी ठिकाणीसुद्धा अशी वाचनालये उभी करण्यात आली. यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याच गावात संदर्भीय पुस्तके उपलब्ध झाली. यातील पुढील टप्पा हा पुस्तक बॅंकेच्या रूपाने विकसित झाला. वाढदिवस, लग्नसमारंभ, घरातील मंगल प्रसंगी, स्मृतिप्रीत्यर्थ होणारा खर्च टाळत त्यातून पुस्तके द्या, असे आवाहन या ग्रुपने केले. त्यातून पुस्तक बॅंकेचा उदय झाला. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

व्यक्तिमत्त्व विकास शिबिर 
गटाच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व शिबिरे घेतली जातात. यामध्ये समाजातील आदर्शवत व्यक्ती, अधिकाऱ्यांना बोलावीत त्यांचे मार्गदर्शन ग्रामीण विद्यार्थी, युवकांना दिले जाते. तसेच दरवर्षी अकोट तालुक्‍यात असलेल्या आदिवासी गाव मलकापूर गोंड  तसेच धारूर, रहानापूर येथे स्पर्श प्रेरणा शिबिर घेतले जाते. महिलांचे सक्षमीकरण, युवकांचे संघटन, व्यसनमुक्ती, शैक्षणिक मार्गदर्शन असे याचे स्वरूप असते. आदिवासी मुलामुलींना शालेय साहित्य, कपडे वितरित केले जातात. या गावातील सरकारी शाळेत वाचनालयाची सोय या गटाच्या पुढाकाराने झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्यही देण्यात आले.
या गटातर्फे विविध गावांमध्ये योग शिबिर, महिलांचे सक्षमीकरण, जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा, दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार, व्यक्तिमत्त्व शिबिराचे आयोजन, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता अभियान, शेतकऱ्यांना मार्गदर्शन असे उपक्रम नियमितपणे राबवले जातात. 

माणुसकीची खिडकी उपक्रम 
समाजातील वंचितांना मदत करण्याच्या उद्देशाने या गटाने ‘माणुसकीची खिडकी' हा अभिनव उपक्रम सुरू केला. लोकांकडे असलेले जुने कपडे, शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, धान्य इत्यादी वस्तू माणुसकीच्या खिडकीमध्ये आणून ठेवायच्या. ज्याला ज्याची गरज असेल तो ती घेऊन जाईल. या उपक्रमातून जमा झालेले साहित्य अकोट तालुक्‍यातील धारूर, राहणापूर, मलकापूर गोंड या आदिवासी गावात गरजू व विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. माझोड येथील स्पर्श वाचनालय, पातूर येथे डॉ. एच. एन. सिन्हा कॉलेज आणि वाडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत ही ‘माणुसकीची खिडकी' सुरू करण्यात आली.

शेती विकासासाठी ‘कास्तकार प्रतिष्ठान' 
ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी, शेतमजूर अाहेत. अशा कुटुंबातील तरुण, तरुणींचे संघटन, विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन हे काम हा गट नियमितपणे करीत आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या विकासासाठीही या गटाने काम हाती घेतले. हंगामानुसार विविध पिकांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते. गटातर्फे माझोड, भरतपूर, गोरेगाव या गावातील १५० शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देण्यात आले. आगामी काळात शेतकऱ्यांचे संघटन करण्यासाठी गटाने पुढाकार घेतला आहे. माझोड परिसरातील बारा गावातील शेतकरी प्रतिनिधी एकत्र करून ‘कास्तकार प्रतिष्ठान' स्थापन केले जाणार आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी दुग्ध व्यवसायाला चालना देणे, पूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे काम पुढील काळात प्राधान्याने करणार असल्याचे गटाचे अध्यक्ष राजेश ताले यांनी सांगितले.

विद्यार्थी घेतात झाड दत्तक
सध्या पर्यावरण ढासळत असल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आपले योगदान असावे या हेतूने हा गट वृक्षसंवर्धनासाठी काम करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करणे, वृक्षांचे संवर्धन करणे याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते. झाड दत्तक योजना या गटाने राबविली आहे. माझोड येथे स्पर्श वाचनालयाच्या परिसरात लावलेली झाडे विद्यार्थ्यांना दत्तक देण्यात आली. त्या झाडांना पाणी देणे, झाडांची निगा राखण्याचे काम विद्यार्थी करतात. ज्या विद्यार्थ्यांचे झाड वर्षाअखेर सर्वोत्कृष्ट असेल त्याला बक्षीस देऊन सन्मानित केले जाते. दरवर्षी दहा गावात वृक्षारोपणाची मोहीम विद्यार्थांच्या माध्यमातून राबविली जाते.

राजेश ताले, ९१५८४०१२८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT