sangamner aajibai 
अहिल्यानगर

Video : या नववारीतील आजीबाईला तुम्हीही कराल सॅल्यूट... कारणही आहे तसंच

आनंद गायकवाड

संगमनेर ः हल्लीच्या मुली दुचाकीच काय पण विमान चालवतात. त्या कितीही पुरषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या तरी ग्रामीण भागात हे अजूनही रूचत नाही. मुलींनी जिन्स घातली तरी चार लोकं नावं ठेवतात. मग घरातील सुनेने असं केलं तर तिचं आणि त्या कुटुंबाचं जगणं मुश्कील होईल. एकंदरीत काय तर बाईची कामं बाईनेच करायची, असाच शिरस्ता चालत आहे. परंतु एक आजीबाई आहेत त्या चक्क मोटारसायकल चालवतात, त्यावरून शेतमालही विकायला नेतात. त्यांनी केव्हाच लोक काय म्हणतील, या विचाराला किक मारलीय. फेसबुक आणि िट्वटर, इस्टाग्रामवर या आजीने खूप लाईक्स मिळवल्यात. परंतु तिच्या या मोटारसायकल चालविण्याची कहाणी काही अौरच आहे. ते वाचून कोणीही म्हणेल...आजी असावी तर अशी, आमच्या या आजीचा नाद नाय करायचा. 

दोन लहान मुली पदरात टाकून पतीने वार्‍यावर सोडल्यामुळे वास्तविक एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या खचली असती. मात्र, या आजी त्यात मोडणाऱ्या नव्हत्या, त्यांनी अशा प्रतिकूल अवस्थेत कंबर कसली आणि जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशस्वी संसार उभारला.

नाव इंदुबाई ढेंबरे. वय वर्ष अवघे 75. कुठल्या म्हणून विचाराल तर संगमनेर (जि.अहमदनगर) तालुक्यातील साकूरच्या. इंदूबाईंचे माहेर संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातील साकूरजवळच्या बिरेवाडीचे. शेतकरी कुटुंबातील इंदुबाई यांनी 1972 मध्ये वडिलांच्या दुचाकीवर स्वार होण्याचा सराव केला.

कालांतराने त्यांचा विवाह झाला. संसाराला सुरूवात झाली. दोन लहान मुली पदरात टाकून पतीने संसार मोडला. अशा नाजूक क्षणी विचारांच्या गर्तेत सापडलेल्या इंदुबाई यांनी लहान मुलींसह माहेर गाठले. मात्र, वडिलांच्या घरी राहत असताना कोणावर ओझे बनण्याची त्यांची तयारी नव्हती. वडिलांच्या शेतीत त्यांनी कष्ट करायला सुरुवात केली. शेत नांगरणीपासून सर्व मशागत करून त्यांनी भाजीपाला पिकवायला सुरुवात केली.

आठवडेबाजारातून भाजीविक्री

हा भाजीपाला मजुरांच्या साह्याने तोडून त्या स्वतः संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील आठवडे बाजारामध्ये जाऊन विकू लागल्या. यासाठी ही कुणाची मदत नको या भावनेतून त्यांनी पुन्हा कंबर कसली. आणि स्वतः दुचाकीवरून बाजार करायला सुरुवात केली. नऊवारी साडी घातलेली एक महिला ग्रामीण भागातील असूनही, सराईतपणे दुचाकी चालवते. 

हे पस्तीस वर्षांपासून सुरूय...

इतकेच नव्हे तर त्यावरून भाजीपाला विक्री करतात. हे दृश्य पस्तीस वर्षांपूर्वी अत्यंत नवखे होते. या कृत्याचा अनेकांनी नाके मुरडून विरोधही केला. मात्र, खमक्या स्वभावाच्या इंदूबाईंनी कोणालाही न जुमानता प्रामाणिकपणे कष्ट करण्याचा सिलसिला चालू ठेवला. यातून मुलींना मोठे करण्याचे, वडिलांची कमी जाणवू न देण्याचे काम त्यांनी मनोभावे केले.

सुरू केला शेतीला जोडधंदा

शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी साकूर गावाजवळ ओमकार या नावाने हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. त्यातून अर्थार्जनाला सुरुवात केली. शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, असे सांगत शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या यशस्वी कृतीतून चपराक दिली आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी स्प्लेंडर ही दुचाकी विकत घेतली. त्यावरून भावजयीसह डबलसीट एका विवाह समारंभासाठी जात असताना काही तरुणांनी त्यांचा दुचाकी चालवतानाचा फोटो काढला. त्यांनी नंतर तो समाज माध्यमांवर व्हायरल केला.

नांगरे पाटलही आजीचे फॅन

या फोटोला लाखो शेअरिंग व लाईक्स मिळाले. तो फोटो इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबूकसारख्या सर्व माध्यमात प्रचंड व्हायरल झाला. इतकेच नव्हे  तर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे यांनीही इंस्टाग्राम वर शेअर केला होता. यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी त्यांची दखल घेऊन त्यांना जोरदार प्रसिद्धी दिली.

नातवंडांना घेऊन चक्कर

आता वयाच्या 75 व्या वर्षी त्या तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. त्यांची लहान मुलगी, जावई व नातवंडे त्यांना या कामी मदत करतात. आजीच्या गाडीवर नातवंडे मोठ्या हौसेने बसायचे. दररोज किमान एक चक्कर असे. या व्यवसायातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. साकूरमध्ये स्वतःचे मोठे घर आहे. जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा, खंबीर होण्याचा सल्ला त्या महिलांना देतात. त्यांच्या स्वतःच्या कृतीतून शिकवलेले स्वावलंबनाचे धडे त्यांची नातवंडेही गिरवीत आहेत. आयुष्यात काहीच अवघड नाही. मात्र, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, हा त्यांचा मंत्र बरेच काही शिकवून जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT