अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहण्यास आतापर्यंत परवानगी दिली होती. घरी राहणारे रुग्ण समाजात मिसळत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित सर्व रुग्णांना आता कोविड केअर सेंटरमध्ये राहणे सक्तीचे केले आहे. हॉटेलमधून रात्रीच्या वेळी पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. एसटी बसमध्ये प्रवाशांची तपासणी बंधनकारक राहणार आहे,' अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
डॉ. भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत तयारीची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार 121 रुग्णांवर विविध रुग्णालयांत आंतररुग्ण म्हणून उपचार सुरू आहेत. चार एप्रिलपर्यंत ही संख्या सहा हजार 370 वर जाण्याचा अंदाज आहे. त्यानुसार आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
ग्रामीण भागात तीन हजार 820 (60टक्के), तर शहरी भागात दोन हजार 550 (40 टक्के) रुग्ण असतील. ग्रामीण भागासाठी 22 कोविड सेंटर उपलब्ध केली आहेत. त्यांमध्ये एक हजार 736 रुग्णांची क्षमता आहे. नगर शहरात एक हजार 265 रुग्णांसाठी बूथ हॉस्पिटल, नटराज, पितळे, आनंद आणि शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था राहील. खासगी 56 रुग्णालयांत एक हजार 658 ऑक्सिजन बेड आहेत. रुग्णांसाठी 320 अतिदक्षता बेड आहेत. शासकीय रुग्णालयात 55, तर खासगीमध्ये 864 ऑक्सिजन बेड आहेत.
रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर त्याचा अहवाल येण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ लागत आहे. तोपर्यंत त्या रुग्णांनी घरातच राहिले पाहिजे. संबंधितांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पथक कार्यरत राहील. तो घरी आढळून न आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. हॉटेलमध्ये रात्री गर्दी होत आहे. रात्रीच्या वेळी फक्त पार्सल सुविधा सुरू राहील. शिवभोजनमध्येही आता पार्सल सुविधाच राहील.
व्यावसायिकांनी मास्क न वापरणे, गर्दी असल्यास, तसेच सॅनिटायझरचा वापर करत नसल्यास संबंधित दुकान सात दिवसांसाठी 'सील' केले जाणार आहे. मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. 19 मार्चपासून आतापर्यंत 23 हजार 564 नागरिकांकडून, मास्क न वापरल्याबद्दल 46 लाख 38 हजारांचा दंड वसूल केला आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहतील. इतर वर्गांबाबत शिक्षण विभाग आणि संस्थाचालकांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. कोरोना लसीकरण 1 लाख 71 हजार 623 व्यक्तींचे झाले आहे, दोन्ही डोस दिलेल्या 21 हजार 692 व्यक्ती आहेत, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.