शेवगाव (अहमदनगर) : येथील हरीभाऊ बडधे यांना मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मारेक-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात मृतदेह आणून ठेवला.
शेवगावमध्ये पाच जणांनी केलेल्या मारहाणीत हरीभाऊ पांडूरंग बडधे (वय-३८) राहणार ठाकुर पिंपळगाव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मारहाण केलेल्या सर्व पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी करीत नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवला. नातेवाईकांची आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी मयताचा भाऊ नारायण पांडुरंग बडधे यांच्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत बडधे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा भाऊ हरिभाऊ पांडुरंग बडधे हे शुक्रवार (ता.१९) रोजी बोधेगावला गेला होता. तो घरी येत असताना सिंदळीच्या ओढयात त्याची दुचाकी आडवून गावातील किशोर उध्दव दहिफळे, दिलीप महादेव दहिफळे, सुनिल दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे सर्व राहणार ठाकूर पिंपळगाव यांनी त्याला मारहाण केल्यांचे त्यांने घरी आल्यावर मला सांगितले. मी त्याला धीर देत उदया सकाळी बघू असे म्हणून मी बोधेगाव येथील साखर कारखान्यावर ड्युटीसाठी निघून गेलो. आठ दिवसापूर्वी ही वरील पाच जणांनी भाऊ, वडील व मला मारहाण केली होती. मात्र गावातील मध्यस्थींनी हा वाद मिटवला होता.
शनिवार (ता.२०) रोजी सकाळी घरी आल्यावर मी भावाला झोपेतून उठविण्यासाठी गेलो मात्र तो उठला नाही. त्यास शनिवारी सकाळी ८ वाजता शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना माहिती दिली. सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. मात्र पोलिसांनी दुपारपर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी सायंकाळी ४ वाजता मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यार नाही यावर नातेवाईक ठाम होते. रात्री ७.३० वाजता नारायण बडधे यांच्या फिर्यादीवरुन किशोर दहिफळे, दिलीप दहिफळे, सोमनाथ दहिफळे, सुनिल दहिफळे, अनिल दहिफळे या पाच जणांविरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर रात्री ८.४५ वाजता नातेवाईकांनी मुतदेह ताब्यात घेतला. रात्री उशीरा ठाकूर पिंपळगाव येथे शोकाकुल वातावरणात बडधे यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. बडधे यांच्यामागे आई, वडील भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.