upsc result vinayak narwade scored 37th rank in 2nd attempt in upsc  Sakal
अहिल्यानगर

अमेरिकेची नोकरी सोडून आला; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC मध्ये यश

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) देशात ३७ वा व महाराष्ट्रात दुसरा आलेल्या विनायक नरवडे (Vinayak Narawade) याने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली. इच्छाशक्तीला अभ्यासाची जोड दिल्यास स्वप्न पूर्ण होते, हे त्याने दाखवून दिले. मनमोकळ्या गप्पा मारताना त्याने यशाचे गुपित उलगडले.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल (शुक्रवारी) जाहीर झाला. नरवडे याचे नाव ३७ व्या रँकवर झळकले. आज (शनिवारी) त्याने ‘सकाळ’च्या संपादकीय टीमशी संवाद साधत आपल्या यशाबाबत माहिती दिली. ‘सकाळ’चे आवृत्ती प्रमुख प्रकाश पाटील यांनी नरवडे याचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. या वेळी विनायकचे वडील डॉ. कारभारी नरवडेही उपस्थित होते.

विनायकने २०१५ मध्येच लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा विचार केला. या परीक्षेत यश मिळेलच; परंतु नाही मिळाले तरी दुसरा पर्यायही मनात ठेवला. त्याने डॉक्टर व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होते, मात्र मला डॉक्टर व्हायचे नाही, अधिकारी व्हायचे, हे त्याने आधीच सांगून ठेवले. विनायकचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण नगरच्या आठरे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पेमराज सारडा महाविद्यालय, अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यातील महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्याला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिक्षणाची संधी मिळाली. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तेथेच एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली; मात्र अधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देईना. तेथेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. खासगी शिकवणीतून दिशा मिळते, पण त्यावर खूप अवलंबून राहता येत नाही. खूप पैसे खर्च करण्यापेक्षा यू-ट्यूब, वेगवेगळ्या वेबसाइटच्या माध्यमातूनही चांगला अभ्यास करता येतो, हे त्याने अवगत केले. त्याचा प्रभावी वापर करून घेतला. २०१८ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. अवघ्या दोन वर्षांत यश मिळू शकले, याचे नरवडे कुटुंबीयांना मोठे समाधान आहे. विनायकने आठ तास नोकरी केली. त्याचबरोबर रोज सहा ते सात तास अभ्यास केला. या यशात वडील डॉ. कारभारी, आई पुष्पा, बहीण ऋतुजा तसेच राहुल पठाडे व मित्रांचा मोलाचा वाटा असल्याचे तो आवर्जून सांगतो. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपले लक्ष्य निश्चित करावे. ते गाठताना यश-अपयश येऊ शकते, हे गृहीत धरून प्लॅन ए व बी तयार ठेवावेत, जेणेकरून अपयशाने खचून जाण्याची गरज पडणार नाही, असा संदेश तो अभ्यास करणाऱ्या युवकांना देतो.

गणेशभक्त विनायक

विनायक नरवडे याचा जन्म गणेशचतुर्थीच्या दिवशी झाला. त्यामुळेच नाव विनायक ठेवले. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची मुलाखतही याच तिथीला झाली. शुक्रवारी निकाल लागला त्या दिवशीही चतुर्थीच होती. हा योगायोग असला, तरी श्रीगणेशावरची त्याची श्रद्धा अपार आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना आर्थिक स्थितीचा विचार करायलाच हवा. प्रसंगी एखादी नोकरी करून अभ्यास करावा. सरकारच्या बार्टी, सारथी यांसारख्या अनेक योजना असतात. त्याचा फायदा घ्यावा. खासगी शिकवण्याही लावाव्यात; परंतु स्वयंअध्ययन आवश्यक आहे. अशा परीक्षांसाठी इंग्रजीवर प्रभुत्व असावे लागते. त्यासाठी आवर्जून प्रयत्न करावा.

- विनायक नरवडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT