अकोला ः कोरोनाच्या संकटात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या असून, आताही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. या समस्येचे निराकरण म्हणजे व्यवसाय. कौशल्य आहे परंतु, व्यवसायातून कौशल्य विकास साधायचा तर, पैसा, भांडवल, माहिती, बाजारपेठेचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, दुग्ध व्यवसाय हा या प्रश्नाचे उत्तम उत्तर असून, अर्थार्जनाचा शुभ्र मार्ग आहे. योग्य व्यवस्थापण आणि चिकाटीसह युवकांना भक्कम रोजगारांची शाश्वती यातून मिळू शकते.
आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे महत्त्व अधिक असल्याने, या पदार्थांची मागणीही प्रचंड आहे. परंतु, दूध निर्मिती व वितरण व्यवस्थेच्या कमतरतेमुळे आवश्यकतेनुसार मानसी दुधाची पुर्तता होत नाही. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा कौशल्यवर्धित व्यवसाय युवकांना खुनावतो आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत असून, इतर व्यवसाय, उद्योगांच्या तुलनेत या व्यवसायात कौशल्य विकासातून आर्थिक स्थैर्याची शाश्वती अधिक आहे. या व्यवसायासाठी शैक्षणिक, आर्थिक उपलब्धतेपेक्षा दृढ निश्चय, सातत्य, चिकाटी, योग्य माहिती, प्रामाणिकपणा व आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. दूध उत्पादनच नव्हे तर, केवळ दूध संकलन व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करून, युवकांना आर्थिक प्रगती साधता येऊ शकते. त्यासाठी शासनाच्या विविध योजना व अनुदान तत्वावर बँकांकडून कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
या बाबींची घ्यावी काळजी
दूग्ध व्यवसाय करताना, या व्यवसायातील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. जास्त दूध देणाऱ्या जातीवंत गाई, म्हशी, त्यांना लागणारे वातावरण, पोषण आहार, वर्षभर पुरेल अशी हिरवी वैरणीची उपलब्धता व साठवणूक, औषधोपचार, लसीकरण यासोबतच दूध व दुधाचे पदार्थ बनविण्याची पद्धत, साठवणुकीची माहिती, आवश्यक भांडवल, मनुष्यबळ, वाहन, दूध विक्रीची व्यवस्था याबाबत सर्व माहिती घेऊन नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
याठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी
शहरातील दाट वस्त्यामध्ये, हॉटेल्स्, बेकरी, चहा कॅन्टीन, आयस्क्रीम पार्लर, रस्त्यावरील ठेल्यांवर मोठ्या प्रमाणात दूध, तूप, लोणी, दही, ताक, पनीर इत्यादी पदार्थांची मागणी अधिक असते. या ठिकाणी स्वतः किंवा बेरोजगारांना काम देऊन दुग्ध पदार्थांची योग्य दरात विक्री करता येईल.
...तर मिळेल अधिक नफा
दूध विक्री नंतर शिल्लक उरलेल्या दुधावरील मलाई काढून तूप तयार करता येते आणि दुधाचे दही, पनीर, खवा करून त्याची विक्री करता येते. या पदार्थ विक्रीतून दुप्पट नफा तर मिळतोच, शिवाय दुधही शिल्लक राहत नाही.
नुकसानाचे मुख्य कारण
दूध टिकवणे हे या व्यवसायातील मुख्य आव्हान असून, याच कारणाने नुकसान होऊन, बहुतांश दुग्ध व्यवसाय बंद पडतात. त्यासाठी ४ अंश सेल्सिअस तापमान ठेवावे लागते. यापेक्षा अधिक तापमानात दुधातील बॅक्टेरीया वाढून लॅक्टोजचे लॅक्टीक ॲसिडमध्ये रुपांतर करतात आणि दूध फाटते. दुधामध्ये बॅक्टेरीया हे हवेतून, हाताच्या, भांड्याच्या संसर्गातून येतात. त्यामुळे दूध संकलन व साठणूक करताना योग्य निगा घेतल्यास नुकसान टाळता येते.
(संपादन - विवेक मेतकर)
|