तेल्हारा (अकोला) : खरीप हंगाम अवघ्या अडीच महिन्यावर आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. प्रमुख रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत; पण शेतमालाला मिळणारा भाव बघता हा भाव शेतकऱ्यांना परवडणार नाही. यावर्षी पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
तेल्हारा तालुक्यात खरिपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील काड्या, फने, नांगरणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची वेळेवर धांदल होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात. यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केला जात आहे.
३०० रुपये अधिक मोजावे लागणार
गतवर्षी डीएपी खताच्या किंमती १२०० रुपये प्रति बॅग होती. यावर्षी एक हजार पाचशे रुपये झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिबॅग तीनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. डीएपी सोबत इतर सर्वच मिश्र खतांची किंमती वाढल्या आहेत. सुपर फास्फेट पोटॅश आदी खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. वर्षभरात कपाशी पिकाला-तीन वेळा खत द्यावे लागते. सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्यकता असते. खताच्या किंमतीत सरासरी १५ ते १७ टक्के वाढ झालेली आहे. या भाववाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
खतासोबत कीटकनाशकांचीही दरवाढ
खताच्या किंमतीसोबतच तन नाशक, कीटकनाशक यांच्या भावात देखील वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेत मालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहे. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले
गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर देखील वाढवले आहेत. अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीड पटीने वाढला आहे. बहुतेक शेतकरी आता आंतर मशागत नांगरणी, फंटण, रोटावेटर, पणजी तीनफाळ वाही आदी कामे ट्रॅक्टरने करतात. पण आता भाव वाढल्याने शेतकऱ्यांची बजेट कोलमडणार आहे.
इंधनाचे भाव वाढल्याने जुन्या भावात शेतीची कामे करायला परवडत नाही. आम्हाला नाईलाजाने भाव वाढवावा लागला. शिल्लक पैसे उरत नाहीत. पूर्वी जेवढे उरायचे तेवढेच उरतात.
- संजय अरुळकर, ट्रॅक्टर मालक, बेलखेडदरवर्षी शेतीचा खर्च वाढत आहे. शेतमालाला मिळणारे भाव मात्र कमी असतात. नैसर्गिक संकटांमुळे कोणतेच पीक पूर्णपणे हाती येत नाही. यामुळे शेती कसणे कठीण झाले आहे. त्यातच खतांचा आणि आंतर मशागतीचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्याचे जीवन कठीण झाले आहे.
- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.