Avegen
Avegen sakal
अर्थविश्व

गरोदर महिलांना योग्य माहिती देणारी अ‍ॅविजेन स्टार्टअप

- सलील उरुणकर

गरोदर महिलांना, प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्याच्या काळात, त्यांच्या स्वतःच्या आहारासह गर्भातील बाळाच्या वाढीसाठी योग्य माहिती मिळणे गरजेचे असते. कित्येक प्रश्न असे असतात की ते डाॅक्टरांना, तज्ज्ञांना विचारण्यासाठी महिलांना संधी किंवा वेळ मिळत नाही. त्यावर उपाय म्हणून अ‍ॅविजेन (Avegen) स्टार्टअपने 'टुगेदर फाॅर हर' (टीएफएच) हा उपक्रम राबविला आहे.

पुणे व लंडनमधून कार्यरत असलेल्या अ‍ॅविजेन या हेल्थ-टेक (healthtech) स्टार्टअपची स्थापना 2015 मध्ये झाली. रुग्ण-केंद्रित, शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आणि वैयक्तिक पातळीवर भावणारे असे डिजिटल प्रोग्रॅम अ‍ॅविजेन विकसित करत आहे. हे प्रोग्रॅम राबविण्यासाठी त्यांनी हेल्थमशीन प्लॅटफाॅर्म हा साॅफ्टवेअर-अ‍ॅज-ए-सर्व्हिस प्लॅटफाॅर्म विकसित केला आहे. (Avegen health tech startup together for her aims to streamline maternity care in India)

अ‍ॅविजेनची स्थापना डाॅ. नयनअभिराम कलनाड आणि नीरज आपटे यांनी केली. डाॅ नयनअभिराम हे डिजिटल हेल्थ क्षेत्रात 2008 पासून काम करत आहेत. एमबीबीएसनंतर त्यांनी 2012 मध्ये लंडन बिझनेस स्कूल येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. फायजर, जाॅन्सन अँड जाॅन्सन युके अशा बड्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. नीरज आपटे यांना डिजिटल टेक्नाॅलाॅजी क्षेत्रातला तब्बल 20 वर्षांचा अनुभव आहे. टुगेदर फाॅर हर यासारख्या उपक्रमांसाठी चांगला तंत्रज्ञानाधारित प्लॅटफाॅर्म विकसित करण्याचे श्रेय त्यांना जाते.

अ‍ॅविजेनच्या टीममध्ये आणखी एक महत्त्वाची सदस्य म्हणजे डाॅ सुमिती सहारन. डाॅ सुमिती या न्यूरोसायन्टिस्ट असून या क्षेत्रामध्ये त्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे. टुगेदर फाॅर हर या उपक्रमाचे नेतृत्व डाॅ सुमिती करतात.

हेल्थमशीन या मूळ प्लॅटफाॅर्मवर अ‍ॅविजेनचे सध्या तीन प्रोग्रॅम सुरू आहेत. 1. कार्डिअ‍ॅक रिहॅबिलिटेशन, 2. मॅटेर्नल हेल्थ आणि 3. एचआयव्ही. या प्लॅटफाॅर्मच्या आधारे प्रत्येक रुग्ण त्यांच्या आरोग्याची काळजी स्वतःच व्यवस्थितपणे घेऊ शकतो. तसेच आरोग्यात झालेली सुधारणाही तो किंवा ती ट्रॅक करू शकते आणि त्यामुळे मिळणारे रिझल्टही चांगले असतात.

टुगेदर फाॅर हर उपक्रमाविषयी बोलताना डाॅ. नयनअभिराम म्हणाले, "आजच्या घडीला टीएफएच उपक्रमाचा लाभ 30 हजार महिला घेत आहेत. गरोदरपणाच्या कालावधीतील प्रत्येक आठवड्यानुसार योग्य माहिती, आरोग्याच्या दृष्टीने करावयाच्या गोष्टी आणि आहाराविषयीचा डेटा-आधारित फिडबॅक अशा सुविधा या अ‍ॅप्लिकेशनमध्ये देण्यात आल्या आहेत. मशीन लर्निंग आणि प्रेडिक्टीव्ह अ‍ॅनॅलिसिस तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक महिलेला पर्सनलाईज्ड मॅटेर्नल हेल्थ इन्फोर्मेशन पुरविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमामुळे गरोदरपणात मृत्यू होण्याचे महिलांमधील प्रमाण कमी करणे, अशक्तपणामुळे (अ‍ॅनेमिया) होणारे त्राससुद्धा कमी करण्यासाठीचे प्रयत्न आम्ही या तंत्रज्ञानाधारित माहिती प्रसारणाद्वारे करीत आहोत. पुढील पाच वर्षात टीएफएच प्रोग्रॅमचा लाभ 25 लाख महिलांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. (Avegen health tech startup together for her aims to streamline maternity care in India)

अ‍ॅविजेनच्या हेल्थमशीन प्लॅटफाॅर्मचा वापर युकेमधील बड्या फार्मास्युटिकल कंपन्या करीत आहेत. तसेच भारतामध्ये अनेक डाॅक्टर, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून या प्लॅटफाॅर्मचा वापर होत आहे. भारतातील मुंबई, पुणे, आग्रा, इंदूर अशा शहरांमध्ये या अ‍ॅपचा वापर अधिक होत आहे. अ‍ॅविजेनने आतापर्यंत बीएसई इम्पॅक्ट अवार्ड 2019 तसेच काॅमनवेल्थ डिजिटल हेल्थ अवाॅर्ड्स 2020 हे पुरस्कार जिंकले आहेत.

टुगेदर फाॅर हर या उपक्रमासाठी मर्क फाॅर मदर्स (एमएफएम) यांच्याकडून 2017 मध्ये फंडिंग मिळाले आहे. अ‍ॅविजेन स्टार्टअप ही बूटस्ट्रॅप्ड कंपनी आहे म्हणजे त्यांनी संस्थात्मक वा कोणत्याही गुंतवणुकदाराकडून आतापर्यंत भांडवल निधी घेतलेला नाही. डाॅ नयनअभिराम आणि नीरज यांनी त्यांच्या बचतीमधून तसेच मित्र व नातेवाईकांकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी बीजभांडवल म्हणून 2016 मध्ये उभा केला होता. मात्र आता व्यवसाय विस्तारासाठी ते सुमारे 30 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अ‍ॅविजेन स्टार्टअपचे उत्पन्न 2020 मध्ये सुमारे साडेसात कोटी रुपये होते तर, यंदा 2021 मध्ये ते 16 कोटी रुपये असेल असा अंदाज कंपनीने दिला आहे. हेल्थमशीन प्लॅटफाॅर्म वापरण्याचे शुल्क आणि टुगेदर फाॅर हर यासारख्या उपक्रमांमध्ये प्रत्येक ग्राहकाने भरलेले शुल्क यातून कंपनीला उत्पन्न मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT