Bonus-Share
Bonus-Share 
अर्थविश्व

बोनस शेअरविषयी बोलू काही...

डॉ. वीरेंद्र ताटके

काही दिवसांपूर्वी विप्रो लि. या कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली आणि हा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आला. विप्रोने १ः३ या प्रमाणात बोनस शेअर जाहीर केल्यामुळे ज्या शेअरधारकांकडे ‘विप्रो’चे तीन शेअर आहेत, त्यांना या कंपनीचा एक शेअर ‘फ्री’ म्हणजेच मोफत मिळणार आहे. यानिमित्ताने बोनस शेअरविषयी बोलू काही....

बोनस शेअर ही कंपनीने त्यांच्या शेअरधारकांना दिलेली विनामूल्य भेट असते. बोनस शेअरच्या ‘रेकॉर्ड डेट’च्या दिवशी डिमॅट खात्यात शेअर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असा बोनस शेअर मिळतो आणि यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही. कंपनीकडे साठलेल्या संचित नफ्यातून (रिझर्व्ह्‌ज) असे बोनस शेअर दिले जातात. ‘सेबी’च्या नियमांचे पालन करून कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस द्यायचे ठरविल्यानंतर एखादी तारीख निश्‍चित करुन त्या दिवशी शेअर वितरीत केले जातात. बोनस शेअर दिल्यामुळे शेअरधारकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होते, कारण दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बोनस शेअर म्हणजे नोकरदारवर्गाला दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनस प्रमाणे वाटतो. अर्थात बोनस शेअर मिळाल्याने ‘रेकॉर्ड डेट’च्या दिवशी आपल्या खात्यातील शेअरची संख्या एकदम वाढणार आणि आपण एक दिवसात मालामाल होणार, असा गैरसमज कोणाच्या मनात असेल तर पुढील माहिती वाचणे आवश्‍यक आहे. 

१) बोनस शेअरच्या ‘रेकॉर्ड डेट’नंतर लगेच अशा शेअरचा बाजारभाव अशा रीतीने ‘ॲडजेस्ट’ केला जातो, की त्याचे बाजारमूल्य तेवढेच राहते. उदाहरणार्थ, ‘रेकॉर्ड डेट’च्या आधी शेअरचा बाजारभाव १०० रुपये असेल आणि कंपनीने १ः१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली असेल तर ‘रेकॉर्ड डेट’नंतर त्या शेअरचा भाव आपोआप ५० रुपये होते. म्हणजेच बोनस शेअरआधी शेअरधारकाकडे १०० रुपयांचा एक शेअर होता, तर बोनस शेअर मिळाल्यानंतर ५० रुपयांचे २ शेअर झाले. म्हणजेच एका दिवसात बोनस शेअरमुळे कोणताही गुंतवणूकदार मालामाल होत नाही. विप्रो कंपनीच्या शेअरचा ‘रेकॉर्ड डेट’च्या वेळचा बाजारभाव ३६० असेल असे मानले तर (‘विप्रो’चा सध्याचा बाजारभाव (रु. ३७५) सुद्धा याच्या आसपासच आहे) १ः३ या प्रमाणातील बोनसमुळे प्रत्येकी ३६० रुपयांच्या तीन शेअरचे रुपांतर प्रत्येकी २७० रुपयांच्या चार शेअरमध्ये होईल. 

२) बोनस शेअर जाहीर केल्यामुळे कंपनीच्या ‘फंडामेंटल’मध्ये फारसा बदल होत नाही. कंपनीकडे साठलेल्या नफ्यातून बोनस शेअर दिला गेल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कंपनीच्या संचित नफ्याची रक्कम कमी होऊन भागभांडवलाची रक्कम वाढते आणि शेअरची संख्यादेखील वाढते. शेअर बाजारातील सर्व व्यवहार इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने होत असल्याने असे बदल करणे आणि शेअरधारकांच्या डिमॅट खात्यात बोनस शेअर जमा करणे खूप सोपे झाले आहे. 

३) बोनस शेअरनंतर एका बाजूला संबंधित कंपनीच्या बाजारातील शेअरची संख्या वाढते, तर दुसऱ्या बाजूला शेअरचा बाजारभाव सुद्धा कमी होतो. त्यामुळे त्या शेअरची उलाढाल वाढते आणि परिणामतः त्याचा बाजारभाव (कंपनी चांगली कामगिरी करीत असल्यास) भविष्यात वाढण्याची शक्‍यता अधिक राहते. याचा फायदा शेअरधारकाला निश्‍चितच होतो. त्यामुळेच बोनस शेअर मिळाल्यानंतर असे शेअर आपल्याकडे दीर्घकाळासाठी ठेवावेत, असे तज्ज्ञ सुचवितात. कंपनीचे ‘फंडामेंटल’ जर चांगले असतील, तर तो शेअर पुन्हा जुन्या भावापर्यंत सुद्धा पोचू शकतो. उदाहरणार्थ, १०० रुपये बाजारभाव असलेल्या कंपनीने १ः१ प्रमाणात बोनस शेअर दिल्यानंतर ५० रुपये बाजारभाव झालेला शेअर काही दिवसानंतर पुन्हा १०० रुपयांपर्यंत झेपावू शकतो. मात्र, शेअरधारकाने तोपर्यंत संयम बाळगणे आवश्‍यक असते. 

४) बोनस शेअरचा आणखी एक फायदा म्हणजे शेअरधारकाकडील शेअरची संख्या वाढल्यामुळे भविष्यात त्याला अधिक शेअरवर लाभांश मिळू शकतो. उदाहरणार्थ, बोनस शेअर मिळण्यापूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे १०० शेअर असतील आणि त्या कंपनीने १ः१ या प्रमाणात बोनस शेअर दिल्याने त्याच्याकडे एकूण २०० शेअर होतील. भविष्यात त्या कंपनीने लाभांश दिला तर संबंधित गुंतवणूकदाराला २०० शेअरवर लाभांश मिळेल. म्हणजेच कोणतेही मूल्य न देता मिळालेले बोनस शेअर आणि त्यावरील लाभांश असा गुंतवणूकदाराचा दुहेरी फायदा होतो. 

५) एखादा गुंतवणूकदार त्याला मिळालेले बोनस शेअर ज्या वेळी विकतो, तेव्हा त्यावर होणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर द्यावा लागतो. बोनस शेअर मोफत मिळाला असल्याने विक्री करून मिळणारा सर्व मोबदला हा नफा मानला जातो. म्हणूनच प्राप्तिकराच्या सध्याच्या नियमानुसार असा बोनस शेअर एक वर्षाच्या आत विकल्यास पूर्ण किंमतीवर अल्प मुदतीचा भांडवली नफा समजून १५ टक्के कर द्यावा लागतो. एक वर्षानंतर विकल्यास एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेवरील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर १० टक्के कर द्यावा लागतो. 

थोडक्‍यात, बोनस शेअरचा खरा फायदा करून घेण्यासाठी गुंतवणूकदाराने त्या संदर्भातील सर्व बाबी बारकाईने समजावून घेतल्या पाहिजेत.

‘विप्रो’ची बोनस भरारी
‘विप्रो’ने १९७१ पासून आतापर्यंत दिलेल्या बोनस शेअरची माहिती सोबतच्या तक्‍त्यात दिली आहे. ज्या गुंतवणूकदाराकडे १९७१ पासून या कंपनीचे शेअर असतील, त्यांना नक्कीच भरभरून फायदा झाला असणार, हे सहज लक्षात येते. भारतीय शेअर बाजारात अशा अनेक चांगल्या कंपन्या आहेत. आवश्‍यकता आहे ती गुंतवणूकदारांनी अशा चांगल्या कंपन्या निवडून त्यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याची!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT