Tax
Tax sakal
अर्थविश्व

समान प्राप्तिकर विवरणपत्राच्या दिशेने...

डॉ. दिलीप सातभाई (आंतरराष्ट्रीय कर व कायदे सल्लागार)

सध्या, प्रत्येक करदात्याला भारतातील वास्तव्याच्या, प्रकाराच्या आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार क्रमांक १ ते ७ पैकी कोणतेही लागू प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. सद्य विवरणपत्र व त्यातील परीशिष्टांची रचना अशी आहे, की करदात्याला त्यातील काही परीशिष्टे लागू नसतील तरी प्रत्येक परिशिष्ट सक्तीने भरावे लागते.

त्यामुळे विवरणपत्र दाखल करण्यासाठी लागणारा वेळ वाढतो, तर लागू व माहिती नसलेली परीशिष्टे भरताना करदात्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. याखेरीज नक्की कोणते विवरणपत्र भरायचे याबद्दलही संदेह असतो. कारण पगाराचे उत्पन्न असणाऱ्याला एक दोन, किंवा चार क्रमांकाचे, तर विविध पद्धतींमार्फत केल्या जाणाऱ्या व्यवसायासाठी तीन, चार, पाच किंवा सहा क्रमांकाचे, नफा न मिळविणाऱ्यांना सात क्रमांक अशी विविध क्रमांकाची विवरणपत्रे भरावी लागतात. यातील संख्या दूर करून प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची क्लिष्ट पद्धती सुकर करण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) आयटीआर-सात वगळता सर्व विद्यमान फॉर्म विलीन करण्याचा प्रस्ताव देऊन सर्वांना एकच नमुन्यातील विवरणपत्राचा मसुदा देऊन सुखद धक्का दिला आहे.

त्यामुळे कोणताही करदाता आता या सर्वांसाठी समान असणाऱ्या एकाच फॉर्मच्या आधारे वार्षिक करपात्र उत्पन्नासाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकतो. प्रस्तावित ‘आयटीआर’चा मसुदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींच्या अनुषंगाने जगभर दाखल होत असलेल्या आदर्शवत प्रणालीवर आधारीत आहे. यामुळे वेळेत बचत होईल, विवरणपत्र भरणे व व्यवसाय करणे सुलभ होईल व योग्य विवरणपत्र न भरल्याने येणाऱ्या अडचणी दूर होतील. याखेरीज, करदात्याने करावयाच्या ऐच्छिक अनुपालनाच्या आचरणातील हे अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरेल

समान विवरणपत्राचे फायदे

नवीन प्राप्तिकर विवरणपत्रामुळे करदात्याचा प्रकार लक्षात न घेता निवासी वा अनिवासी व्यक्ती, भागीदारी, कंपनी, सहकारी सोसायटी किंवा इतर करदात्यांना आता एकच समान प्राप्तिकर विवरणपत्र वापरावे लागणार असल्याने माहिती भरण्याची सुलभता वाढणार आहे. या विवरणपत्रात करदात्याने भरलेला मजकूर व विभागाने दिलेली माहिती याची पडताळणी करणे शक्य होणार असलेल्या करदात्यावरील अनुपालनाचा भार कमी होणार आहे. विविध करदात्यांसाठी विवरणपत्र भरण्याच्या वेगळ्या तारखा होत्या.

आता समान विवरणपत्र झाल्याने एकाच अंतिम तारखेस ते दाखल करता येईल. विविध तारखांमुळे दाखल करताना येणारा व त्याचे करनिर्धारण होण्यास होणारा विलंब टाळता येऊ शकतो. पगारदार वा ज्येष्ठ निवृत्त करदाते व छोटे व्यावसायिक ज्यांचे वार्षिक ढोबळ उत्पन्न पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्यांना पूर्वीचे विवरणपत्र क्रमांक एक वा चारद्वारे उत्पन्न दाखल करण्याचा ऐच्छिक पर्याय कायम ठेवल्याने ‘सरल’ व ‘सुगम’ असणाऱ्या सूटसुटीत विवरणपत्राचे फायदे कायम ठेवता येतील.

समान विवरणपत्राची वैशिष्ट्ये

वैयक्तिक गटातील मोठे करदाते व इतर प्रकारातील छोटे-मोठे करदाते यांना मात्र हे सक्तीने विवरणपत्र भरावे लागणार आहे. या विवरणपत्रात करदात्याची स्थिर राहणारी माहिती म्हणजे आकारणी वर्ष, नाव, गाव, पत्ता, फोन, ईमेल इ. प्राप्तिकर विभाग सद्य विवरणपत्रासारखी मागितल्यानंतर भरून देणार आहे. तर उत्पन्न व इतर बाबींसाठी प्राप्तिकर विभागाने चाळीस प्रश्न तयार केले असून त्यातील ज्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील त्या प्रश्नांचीच माहिती व परिशिष्टे भरून विवरणपत्र दाखल करावयाचे आहे. त्यातील बहुतांश माहिती प्री-फिल्ड असणार आहे. करदात्याच्या माहितीसाठी विचारलेला प्रश्न कोणते उत्पन्न असणाऱ्या कारादात्यासाठी आहे याची दुसऱ्या रंगात टीप दिली आहे.

उदा. तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे उत्पन्न मिळाले आहे? तुम्हाला करमुक्त उत्पन्न मिळाले आहे काय? या दोन्ही प्रश्नानंतर जी टीप आहे त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरे सर्व करदात्यांनी द्यायची आहेत. ‘कलम ९०’ अंतर्गत दुहेरी कर टाळण्याच्या करार अंतर्गत काही सवलत हवी आहे काय? या प्रश्नाचे उत्तर फक्त अनिवासी लोकांनी द्यायचे आहे. तुम्हाला इतर व्यक्तीचे उत्पन्न तुमच्या उत्पन्नात समाविष्ट करावयाचे आहे काय? या प्रश्नाचे उत्तर फक्त ‘व्यक्ती’ करदात्याने द्यायचे आहे. ‘कलम ४४एए’ अंतर्गत तुम्ही हिशेबाची पुस्तके ठेवली आहेत काय? या प्रश्नाचे उत्तर फक्त व्यवसायाचे उत्पन्न असणाऱ्या करदात्याने द्यायचे आहे.

थोडक्यात हे विवरणपत्र भरणाऱ्यास वरील चाळीस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. हे अवघड नसले तरी जिकीरीचे आहे. अनुभवाच्या आधारे यात सुधारणा होऊ शकते. तथापि, सीए, करसल्लागाराच्या मदतीशिवाय हे विवरणपत्र भरू शकण्याची प्राप्तिकर विभागाची अपेक्षा मूर्त स्वरूपात येणे कठीण वाटते. सध्या मसुदा सादर केला आहे. प्रत्यक्षात अजून बदल होतील. असे असले तरी उपक्रम स्तुत्य आहे हे नक्की!

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT