समानतेचं तत्त्व रुजवणारी पंढरीची वारी म्हणजे वारकरी धर्माचा जीव की प्राण! आषाढी एकादशीला विठ्ठल भेटीची आस वारकऱ्याच्या मनात अखंड सुरू असते. याच भेटीच्या ओढीने त्यांचा प्राण तळमळत असतो. सबंध वर्षभर याच क्षणाची वाट पाहात आपले सांसारिक कर्म वारकरी नेटाने पार पाडत असतात. प्राचीन काळापासून सुरू असलेली वारीची परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे. आज कोरोना आणि संचारबंदीच्या काळातही त्यात खंड पडलेला नाही. ऊन्ह, वारा, पाऊस याची पर्वा न करता, अत्यंत हालअपेष्टा सोसत, भजन कीर्तनात तल्लीन होऊन, आपल्या वयाची, होणाऱ्या त्रासाची यत्किंचितही तमा न बाळगता विठ्ठल भेटीची आस डोळ्यात साठवून पायी निघणाऱ्या या वारकऱ्यांच्या उरात असं कोणतं चैतन्य निर्माण होतं? अशी कोणती शक्ती निर्माण होते? की त्यांना या जगाचा, या संसाराचा, होणाऱ्या शारीरिक त्रासाचा पूर्णपणे विसर पडतो आणि त्यांची पाउले अत्यंत उत्साहात पंढरीची वाट चालू लागतात!
या सर्व प्रश्नांची उत्तरं दडली आहेत त्याच प्राचीन काळात ज्या काळात ही वारीची परंपरा सुरू झाली आहे. संत नामदेव, संत ज्ञानदेव यांनी भागवत धर्माची पताका रोवली. धर्माच्या नावाखाली समाज चार वर्णात विभागला होता. शोषणवादी कर्मकांड आणि अंधश्रद्धेचे स्तोम माजले होते. दु:खी, गरीब जनता अन्यायाने त्रासली होती. कुणीही वाली उरला नव्हता. संत नामदेवांनी हे सगळं पाहिलं.
न देखवे डोळा ऐसा हा आकांत | परपीडे चित्त दुःख होते ||
असे म्हणत संत नामदेवांनी समाजाचे वैचारिक परिवर्तन करण्यासाठी पंढरपूरच्या वाळवंटात समाजातील संतांना हाक दिली. आणि मग संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत कर्ममेळा, संत नरहरी, संत गोरोबा, संत सावता, संत सेना महाराज असे सर्व जातिधर्माचे संत एकत्र आले. एवढेच नाही तर तत्कालीन समाजात ज्या स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आलं होतं, त्याच स्त्रियांना समानतेच्या तत्त्वावर उभ्या राहिलेल्या भागवत धर्माने संत जनाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई यांच्या रूपाने आपल्यात सामाऊन घेतलं. यावर खऱ्या अर्थाने कळस चढवण्याचं महान कार्य जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी केलं. त्यांनी आपल्या गाथेत सांगितलेलं तत्वज्ञान अखंड मानवजातीच्या कल्याणाचं साधन बनलंय. ही ज्ञानाची अनमोल शिदोरी आपल्यापर्यंत पोहचवण्याचं श्रेय संत संताजी यांच्या लेखणीला जातं. या सगळ्यांनी मिळून
समचरणदृष्टी विटेवरी साजिरी | तेथे माझे हरी वृत्ति राहो ||
असे म्हणत पंढरपूरची वाट धरली. सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहणाऱ्या या पांडुरंगाच्या मूर्तीत त्यांना खरा देव दिसला. याच खऱ्या देवाच्या दर्शनाने वारकऱ्याचं चित्त शांत होतं आणि जन्माचं सुख लाभल्याची त्याची भावना होते.
असंच जन्माचं सुख अनुभवण्याचा योग सतराव्या शतकात आला. दिवस होता ६ जून १६७४! स्वराज्याचे पहिले छत्रपती, अखंड भारताचं आराध्य दैवत, लोककल्याणकारी स्वराज्याचं धगधगतं अग्निकुंड, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा सुवर्णदिन! वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा करणाऱ्या सरदारपुत्र बाल शिवबाच्या काळातली तत्कालीन परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. वडील शहाजीराजे पातशहाच्या दरबारात शूर सरदार होते. त्यांच्याही मनात स्वराज्याचं स्वप्न होतंच. जे त्यांनी जिजाऊच्या जोडीने शिवरायांच्या मनात रुजवलं. आणि सुरू झाली शिवबाची स्वराज्यस्थापनेची वारी!
त्या काळात सत्तेत कोण आहे याचा रयतेला काहीच फायदा नव्हता. रयतेचा संबंध यायचा तो त्या राजांच्या पदरी असणाऱ्या वतनदारांसोबत. हे वतनदार रयतेकडून जबर वसुली करायचे. मनमानी कारभार करायचे. राजांना फक्त आपल्याकडे येणाऱ्या वसुलीचा मतलब! त्यांना रयतेच्या सुखदुःखाचं काही देणघेणं नसायचं. याचा गैरफायदा या वतनदारांनी घेतला. रयतेला लुबाडलं आणि स्वतः गब्बर झाले. कुणाकडे दाद मागता येत नव्हती. लढाई झाली की शिपाई शेतीची नासधूस करायचे. माल कापून न्यायचे. कुणाकडे दाद मागता येत नव्हती. आर्थिक पिळवणूक होतीच सोबत सामाजिक अन्यायाची जोडही होती. वर्णाश्रम, जातीची उतरंड, कर्मठ कर्मकांड याचेही स्तोम कमी झालेले नव्हते. जिथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे या अन्यायातून वाचू शकले नाही तिथे सामन्यांची काय व्यथा?
याच सामान्य रयतेच्या सुखाचा ध्यास उरात बाळगून शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोककल्याणकारी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं. आणि दिली हाक मावळ्यांना! वीर बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, प्रतापजी गुजर अशी सर्व जातीधर्माची, एका विचाराची, एका विचारासाठी प्राणाचीही पर्वा न करणारी मंडळी एकत्र आली आणि हा विचार होता समानतेचा. हाच विचार होता शिवाजी महाराजांचा! खंडीभर परकीयांसमोर मुठभर मावळे! सुरू झाला प्रवास!
शिवाजी महाराजांनी वतनदारी बंद केली आणि वेतनदारी सुरू केली. जनतेचा संबंध कारभाऱ्यांशी आला. त्यांच्या मनातील भीती दूर झाली. शेती सुधारली, नुकसान होणे बंद झालं. रयत सुखावली. आदिलशाह, निजामशाह, प्रबळ मुघल, अफझलखान, शाहिस्ताखान, पुरंदरचा तह, आग्रा भेट. अनंत अडचणी आल्या. प्रचंड संकटं उभी राहिली. प्रसंगी जीवाशी दोन हात करावे लागले. पण, मागे हटले नाही शिवाजी महाराज! अजिबात खचले नाहीत. प्रसंगी दोन पावलं मागे सरले पण संधी मिळताच दुप्पट ताकतीने झेपावले. आणि नामोरण केलं सगळ्यांना. अशक्य वाटणारं, सर्वांना समानतेनं वागवणारं, स्त्रियांना समान न्यायानं वागवणारं रयतेच स्वराज्य उभं राहिलं.
ज्याप्रमाणे वारकरी प्रचंड त्रास सहन करून पंढरीला पोचतो, बारीत चार चार दिवस उभा राहतो आणि मग जवळ येतो त्याच्या प्रवासातील परमोच्च क्षण! त्याला त्याच्या देवाचं, पांडुरंगाचं दर्शन घडतं. अगदी त्याचप्रमाणे ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी म्हणजेच ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर सगळी रयत जमा झाली होती. बत्तीस मनाच्या सिंहासनावर बसलेली, शिरावर प्रधानांनी छत्रचामर धरलेली, डोळ्यात समाधान झळकणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मंगलमय मूर्ती पाहून रयतेला पंढरीच्या पांडुरंगाचीच मूर्ती पहिल्याचा भास झाला असणार!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.