Students, teachers and parents
Students, teachers and parents esakal
Blog | ब्लॉग

शालेय चिमुरडे, शिक्षक आणि पालक

डॉ.राहुल रनाळकर

कोरोनाच्या सावटानंतर रडतकढत अखेर शाळा सुरू झाल्या. सहामाही परीक्षांचा सोपस्कार संपून पूर्वीसारख्या सुट्या लगेचच मिळणार आहेत. पण, या दोन वर्षांच्या काळात शालेय मुलांनी खूप गोष्टी गमावल्या आहेत, त्या आयुष्यात पुन्हा आणण्यासाठी शिक्षक आणि पालक या दोन घटकांना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत; अन्यथा या पिढ्यांचे अतोनात नुकसान होईल, ही काळ्या दगडावरची रेघ. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे मुलांनी काय गमावलं, याची यादी करायची झाल्यास ती एवढी मोठी आहे, की या यादीचं दडपण संवेदनशील शिक्षक आणि पालकांवर नक्कीच येईल. किंबहुना हे मुद्दे या दोन्ही घटकांच्या मनात आधीपासून रुंजी घालत असतील... त्यावर फक्त एक प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न आहे...

ऑनलाइन शाळेच्या या कालखंडात मुलांचं वाचन कमी झालं, लिखाणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचणं आणि परिणामकारक प्रत्यक्ष लिखाण अत्यंत कमी झालंय. काहीतरी रेघोट्या ओढायच्या आणि त्याचे पीडीएफ करून मोबाईलद्वारे सबमिट करण्याची अत्यंत चुकीची सवय या काळात मुलांना लागली. शिक्षकांनादेखील एकेक पीडीएफ डाउनलोड करून, प्रिंट काढून तपासणे अत्यंत कष्टाचे ठरले. यामुळे घडले असे, की नेमकेपणाने, काटेकोरपणे अक्षर आणि उत्तर तपासणे शिक्षक वर्गाला अशक्य होते. सध्या जेव्हा मुलं परीक्षांसाठी शाळेत पोचली, तेव्हा अनेकांना आपलं नाव व्यवस्थितपणं लिहिणं, आसन क्रमांक लिहिणं जमत नसल्याचं समोर आलं. अनेक मुलांना आपले संपूर्ण नाव स्पष्टपणे सांगता येत नसल्याचेही शिक्षकांच्या लक्षात आले. काही मुलं राष्ट्रगीत, वंदे मातरम् विसरल्याचे कळून आले. अनेक मुलांचं अक्षरवळण इतकं खराब झालंय, की ते सुधारण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. सध्याच्या अभ्यासक्रमातील मोजक्या कविता पाठ नसल्याचं वास्तव समोर आलंय. जे ज्येष्ठ नागरिक आता पंच्याहत्तरीच्या घरात आहेत, त्यांना त्यांच्या ६५ वर्षांपूर्वीच्या शाळेतील शिकलेल्या कविता अजूनही पाठ आहेत. पण, या मुलांना अलीकडेच ऑनलाइन पाठ करून घेतलेल्या कविता पाठ नाहीत, ही वस्तुस्थिती चिंताग्रस्त करणारी आहे. यात बदल करायचा झाल्यास मुलं, शिक्षक आणि पालक यांना भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत.

अभ्यासाचा मूलमंत्र जसा या चिमुरड्यांनी गमावलाय, तसंच आरोग्य गमावण्याचा मोठा धोका या पिढीसमोर आहे. ऑनलाइनमुळे डोळ्यांचे आणि मणक्यांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेत. कानांचे विकारही समोर येत आहेत. सगळ्यात धोकादायक म्हणजे मनोविकारांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना आखाव्या लागतील. ऑनलाइनमुळे मुलांमध्ये वाढलेला चिडचिडेपणा, शीघ्रकोपीपणा आणि उतावीळपणा रोखण्याचे आव्हान पालकांसमोर आहे. ग्रामीण भागात तर भीषण स्थिती आहे. एका मोबाईलवर दोन किंवा तीन मुलांनी ऑनलाइन शाळांत हजेरी लावली. मोबाईल उपलब्ध नसणे, मोबाईल असल्यास रेंज नसणे, रेंज असल्यास बॅलन्स नसणे या गोष्टींनी या चिमुरड्यांमध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणात निर्माण केली. भावंडांमध्ये भांडणे नित्याची झाली. भांडणांपेक्षा या मुलांना मजुरीवर नेणे अनेक ग्रामीण भागातील पालकांनी पसंत केले. पोषण आहार स्वीकारण्यासाठी पालक शाळेत आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मुलं मजुरीवर हे अनेक गावांतील विदारक चित्र होते. मोबाईल अभावग्रस्तेतून एका विद्यार्थिनीने केलेली आत्महत्या चिंताजनक आहे.
पाचवीतील मुलं आता ऑफलाइन परीक्षांशिवाय सातवीत आहेत. शाळेत पहिल्या तासाला ‘गुड मॉर्निंग सर’ म्हणणं अनेक मुलं विसरली आहेत. ग्रंथालय काय असतं, आपले ग्रंथपाल कोण, हे मुलांना माहीत नाही. ग्रंथालयात जाऊन वर्तमानपत्रांचं वाचन दुर्मिळ झालं आहे. सूचना का दिल्या जातात आणि त्या लक्षात ठेवण्यासाठी असतात, हे मुलांच्या मनातूनच पुसलं गेलंय. शिक्षकांनी एखादी शिक्षा करायची आणि मुलांनी ती पाळून त्यातून काहीतरी शिकत पुढे ती चूक होणार नाही, याची काळजी घ्यायची, हा आता इतिहास झाला आहे. मुलं शिक्षा स्वीकारून काही शिकतील, याची शाश्‍वती शिक्षकांना आता उरलेली नाही. त्यात सर्वशिक्षा अभियानातील श्रेणी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान होत आहे. कोरोनाच्या दणक्यानं उरलंसुरलं शिक्षण गुंडाळलं गेलंय. आठवीपर्यंत मुलांना पास करण्याच्या धोरणामुळे मुलांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न अत्यंत बिकट आणि क्लिष्ट बनत जाणारा आहे.

ऑनलाइन शिक्षण सुरू असताना समोर येणाऱ्या उणिवा भरून काढण्यासाठी पालकांकडून फारसे प्रयत्न झालेले नाहीत, हे आता मुलं ऑफलाइनसमोर आल्यानंतर स्पष्ट होत आहे. पालक स्वतःच्या समस्यांमध्ये अडकून राहिल्याने मुलांकडे लक्ष देणं त्यांना शक्य झालं नसावं. आदिवासी भागातील शाळांची स्थिती ग्रामीण भागाहून अधिक बिकट आहे. अनेक आदिवासी मुलांनी शाळा सोडली ती कायमचीच. अनेक मुलं शाळाबाह्य बनली. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. कोरोनापूर्वीच्या काळाप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेतल्यास सध्याची दहा टक्केही मुलं पास होणार नाहीत, अशी स्थिती आहे. हे सगळं चित्र नकारात्मक असलं तरी आपल्याकडचे शिक्षक आणि पालक हा सगळा धोका वेळीच ओळखून सकारात्मक रीतीने कोरोना गॅप भरून काढतील, अशी आशा ठेवायलाच हवी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT