Language And AI : भाषा म्हणजे केवळ शब्दांची मालिका नाही. ती आपलं मन, आपले संस्कार, आपलं अस्तित्व आहे. आईचं “बाळा” म्हणणं, शिक्षकाचं “पुन्हा सांगतो बघ”, किंवा मित्राचं “अरे जाऊ दे ना” — यामागचं अर्थविश्व केवळ शब्दांपुरतं मर्यादित नाही. भाषेत भावना असतात, गंध असतो, नात्यांची गुंफण असते. पण आज, या भाषेचं स्वरूप झपाट्याने बदलतं आहे. कारण आपल्या दैनंदिन आयुष्यात एक नवं पात्र सामील झालं आहे – कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच AI.
आज ChatGPT तुमच्याशी गप्पा मारतो, Google Translate एका भाषेचं दुसऱ्या भाषेत रूपांतर करतो, Siri तुमच्या प्रश्नांना तत्काळ उत्तरं देतं. हे सगळं फारच अद्भुत वाटतं. पण यामागे एक मोठा प्रश्नही उभा राहतो – मानवाच्या भाषेचं भवितव्य आता यंत्राच्या हाती तर जात नाही ना?
AI च्या आगमनाने भाषेच्या वापरात क्रांती घडली आहे, हे नक्कीच. एक काळ असा होता की एका भाषेचा अर्थ समजण्यासाठी शब्दकोश लागे, आता काही सेकंदांत भाषांतर होतं. AI मुळे एक कोरियन युवक मराठीतलं गाणं समजू शकतो, आणि एक मराठी विद्यार्थी जर्मनमध्ये प्रेझेंटेशन देऊ शकतो.
भाषा शिकण्यासाठी Duolingo, Elsa, YouTube यासारखी साधनं ग्रामीण भागात पोहोचली. केवळ मोबाईलमधून भाषा शिकता येऊ लागली. AI ने संवाद अधिक खुला, वेगवान आणि सहज केला. दृष्टिहीन किंवा शिकता न येणाऱ्या व्यक्तींना संवादासाठी मदतीचं माध्यम मिळालं. Text-to-speech आणि Speech-to-text प्रणालींमुळे भाषा आता सर्वांसाठी खुली झाली आहे.
AIला भाषा समजते, पण भाषेचं मन नाही समजू शकत. एक माणूस जेव्हा “आई” म्हणतो, तेव्हा त्याच्या आवाजात एक आठवण असते, एक नातं असतं. AI देखील तोच शब्द बोलेल, पण त्याच्या आवाजात ते भावविश्व नसेल.
AI द्वारे लिहिलेली कविता, भाषण, किंवा संवाद – हे आपण करतोच , पण खोलवर गेलं की एक रिक्तता जाणवते. कारण भावना, संदर्भ, नजाकत – हे AI शिकलेलं नसतं.
AI प्रणाली मुख्यतः इंग्रजी, चिनी, फ्रेंच यांसारख्या भाषांवर प्रशिक्षित होतात. आपल्या देशातल्या कोकणी, गोंडी, अहिराणी, तुळू, मागधी अशा अनेक भाषांना AI च्या विश्वात फारसं स्थान नाही.
UNESCO च्या अहवालानुसार, दर 14 दिवसांनी एक भाषा नामशेष होते. AI चा प्रभाव अशा भाषांच्या अस्तित्वावर अजूनच संकट निर्माण करू शकतो.
एकदा का संवादाची मुख्य भाषा AI द्वारे ठरवली गेली, तर त्यामध्ये स्थानिक भाषांचं अदृश्य होणं स्वाभाविक ठरेल. आणि मग भाषा उरेल, पण भाषिक अस्मिता हरवेल.
AI चा वापर थांबवता येणार नाही. पण त्याचा वापर करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
1. स्थानीय भाषांचा डेटा संकलित करून AI मॉडेल्स तयार करणं — IIT मद्रासचा AI4Bharat यासंदर्भात महत्त्वाचं काम करत आहे. अशा उपक्रमांना लोकसहभागातून चालना देणं आवश्यक आहे.
2. भाषाशास्त्रज्ञ, शिक्षक, लोककवी, अनुवादक यांचा सक्रिय सहभाग – AI प्रणाली केवळ संगणक अभियंते बनवू शकत नाहीत, त्यांना माणसाच्या भाषेचं खोल आकलन असणारे तज्ज्ञ हवेत.
3. AI ला ‘सहाय्यक’ म्हणून वापरणं – संवादात AI ची मदत घ्या, पण निर्णय, भावना, आणि दिशा माणसानेच ठरवावी.
भाषा ही केवळ माहिती देण्यासाठी नसते, ती माणसाला माणसाशी जोडणारी भावनात्मक दोरी असते. AI ही दोरी बांधू शकतो, पण त्यात गाठी घालू शकत नाही.
AI ने "तू मला आवडतेस" हे वाक्य कितीही सुंदरपणे सांगितलं, तरी त्यामागे लाजणारा चेहरा, हलकं हसू आणि हळवा स्पर्श – हे फक्त माणूसच देऊ शकतो. म्हणून AI चा स्वीकार करायचा, पण आपल्या भाषेच्या मुळाशी घट्ट धरून.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.