Dear Corona
Dear Corona 
Blog | ब्लॉग

प्रिय कोरोनास अनावृत पत्र... 

शीतल पटवर्धन

प्रिय कोरोना,

दचकलास ना प्रिय म्हणाले म्हणून? गेले दोन महिने तू ठाण मांडून बसलायस बघ. सर्वांच्या आयुष्यात आलास तोच मुळात हलकल्लोळ माजवत. कुण्णा-कुण्णाला सोडलं नाहीस. आपपरभाव नाही, उच्च-नीच नाही, देश-परदेश नाही, गरीब-श्रीमंत नाही. तुझ्यापुढे सर्व सीमा गळून पडल्या. मला माहित नाही तू कुठून आलास! तू मानवनिर्मित आहेस की निसर्गातून उद्भवला आहेस. पण असं तरी कसं म्हणू? शेवटी मानव देखील विलीनच व्हायचाय. अर्थात विलीन होतं ते शरीर. असो.

प्रत्येक युगात वेगवेगळं शरीर घेऊन अवतार येतो आणि  त्याच्याच हाती त्या युगाचे सूत्रं असतात, असं म्हणतात. त्याच्याच इच्छेप्रमाणे निसर्गचक्र चालतं. तू तोच तर नव्हेस? उत्पत्ती, वाढ आणि लय हा तर सृष्टीचा नियम आहे. दर पाच हजार वर्षांनी युगान्त होतो. ५११२ वर्षांपूर्वी असाच एक प्रलय आला. यादवी माजली, महाभारत घडले, अन युगचक्र पालटले. प्राप्त परिस्थितीत तीच वेळ आलीय का रे? कदाचित त्याचसाठी तू येथे ठाण मांडून बसला असशील!!

अकराव्या वर्षी आई गेली. कळण्याचं वयच नव्हतं. आता अचानक हे सर्व कालच घडल्यासारखं का वाटतंय? आज कित्येक वर्षांनी मंदिरातला घंटानाद, मशिदीतली बांग, चर्चमधील जीझसची करूणामयी नजर, बुद्धांची शांतमूर्ती, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी का हवीहवीशी वाटतेय? इतक्या वर्षांत का नाही आठवलं सारं? कश्यामागे इतकी उरस्फोड होईतो धावत होते? पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब, भौतिक सुखं.. याचसाठी केला का हा अट्टाहास? 'नाही' असं म्हटलं तर मीच माझ्याशी प्रतारणा करतेय असं वाटतंय.

तुझ्या नुसत्या येण्यानं पाय जमिनीवर आले. पन्नास-साठ दिवसांत कसलाच मोह उरला नाही. ना कधी कपाटं उघडली गेली, ना पर्स. लौकिक अर्थानं सारी भौतिक सुखं पायाशी आली. सुखसमृद्धी आली, पण छोट्या छोट्या आनंदाला मुकले.. उसवलेली नाती घट्ट व्हायला सुरूवात झाली, तर काही नवीन नाती जोडली गेली. खऱ्या अर्थाने जीवनाच्या कक्षा विस्तारल्या. 'मी पण माझे गळले गं...' असं झालं खरं!

मी खूप आशावादी आहे. सारखं वाटतं, येणारं युग हे खूप सुंदर असेल, आनंदमयी. तेजोमयी असेल. विश्वात पुन्हा नवचैतन्य येईल. आमची पिढी कदाचित नसेलही; परंतु खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरांनी ज्या पसायदानाची याचना केली, अगदी तस्संच घडेल.
दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।।
जो जे वांच्छील तो ते पावो। प्राणिजात।।

आता तुला कळले असेलच की मी तुला 'प्रिय कोरोना' का म्हटले ते!

(लेखिका पुणे येथील सेवानिवृत्त बँक प्रबंधक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT