Chandrakant Patil
Chandrakant Patil Google
Blog | ब्लॉग

चंद्रकांत पाटलांना झालं तरी काय ?

दिग्विजय जिरगे

सत्तेवर असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकारच्या हाती नाही, असे म्हणणारे चंद्रकांत पाटील विरोधी पक्षात बसल्यानंतर राज्य सरकारला दोष देत आहेत.

सध्याची प्रक्षोभक वक्तव्यं पाहता चंद्रकांत पाटील यांना झालं तरी काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे. भाजपसारख्या सुसंस्कृत पक्षाचे अभ्यासू आणि संयमी नेते अशी ओळख चंद्रकांत पाटलांची आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन केलेली वक्तव्ये पाहता हा प्रश्न लवकर मार्गी लागण्याऐवजी चिघळण्याचीच चिन्हे दिसत आहेत. सत्तेवर असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकारच्या हाती नाही, असे म्हणणारे चंद्रकांत पाटील विरोधी पक्षात बसल्यानंतर राज्य सरकारला दोष देत आहेत. आरक्षणप्रश्नी सध्या मराठा समाज अस्वस्थ आहे. अशावेळी संयमाने एकमेकांशी सवतासुभा सोडून हा प्रश्न लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. यासाठी एकीकडे खासदार छत्रपती संभाजी महाराज मोट जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाकाळात आक्रमक न होता ते सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करू नका, अशी भूमिका संभाजीराजे सातत्याने मांडत आहेत. पण कदाचित भाजपला छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका पसंत पडली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली खासदारकी आणि इतर गोष्टींचा हिशोब मांडला जात आहे.

सत्तेवर असताना आंदोलकांना संयम बाळगण्याचा सल्ला देणारे चंद्रकांत पाटील आता आंदोलकांना हीच रस्त्यावर येण्याची वेळ असल्याचे सांगत आहेत. याच चंद्रकांत पाटलांनी महसूल मंत्री असताना आंदोलकांना चिथावणी दिली जात असल्याचा आरोप केला होता. आता विरोधात बसल्यानंतर त्यांची भाषा बदलल्याचे दिसत आहे. सध्या सर्वच पक्षांनी राजकीय शहाणपण दाखवण्याची गरज आहे. पण हेच होताना दिसत नाही.

गेल्या वर्षभरापासून खासदार संभाजी महाराज हे आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदींनी त्यांना एकदाही वेळ दिली नाही. यावरुन भाजपवर टीका होऊ लागली. पंतप्रधान चित्रपटातील अभिनेत्रींना भेटतात. पण समाजाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या संभाजीराजेंना ते भेटत नाहीत, याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये होऊ लागली. त्यातच खासदार संभाजी राजेंनी सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट सुरु केल्यामुळे भाजपकडून आता त्यांच्याविरोधात वक्तव्ये केली जात आहेत. संभाजीराजेंना भाजपच्या कार्यालयात येऊ लागू नये म्हणून त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. भाजपने त्यांना किती सन्मान दिला हे संभाजीराजेंनी सांगावे, असे आवाहनही पाटील यांनी केले. म्हणजेच एका अर्थाने संभाजीराजेंसाठी भाजपने काय-काय केले याची यादी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर वाचली. हे भाजपकडून आत्ताच का केलं जात आहे ?, हा प्रश्न आहेच आणि याचं उत्तर ही सर्वांना आता माहीत आहे. मराठा आरक्षणाबाबत जे जे संघर्ष करतील, त्यांच्यासोबत भाजप असेल. पण कोरोनाचे नाव पुढे करुन संघर्ष टाळला जात असेल तर हा प्रश्न सुटणार नाही. छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका सरकारच्या बाजूची असेल तर ती आम्हाला मान्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

सध्याची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा समाजाला संयम दाखवण्याचे आवाहन केले आहे. परंतु, अगदी त्याच्या उलट भाजपकडून आक्रमक होण्याचं आवाहन केलं जात आहे. यात चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जाऊ नये, असे जुनेजाणते नेते म्हणत असत. कितीही परस्पर टोकाची मते असली, राजकीय मतभेद असले तरीही पूर्वी सर्व पक्षाचे नेते आणीबाणीच्या क्षणी एकत्रित येत असत. राजकारणातील जोडे बाहेर ठेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात असत. परंतु, सध्याचे राजकारण अगदी उलट्या पद्धतीने सुरु असल्याचं दिसतं. यात सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातील नेते, प्रत्येकात तत्त्वांना तिलांजली देण्याची स्पर्धा सुरु आहे.

संघाच्या मुशीत तयार होणारा कार्यकर्ता हा अत्यंत संयमी, कुशाग्र आणि बुद्धिमान असतो, असे म्हणतात. चंद्रकांत पाटील हेही यातूनच तयार झालेले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची वक्तव्ये पाहता ते हेच चंद्रकांत पाटील आहेत का हा प्रश्न पडतो. कदाचित पक्षाच्या आदेशानुसारच ते असे करत असतील. पण हे बुमरँग होऊ शकतं, हे त्यांच्या लक्षात आलं नसेल का ? संघात अनेक वर्षे काम केल्यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील हे राजकारणात सक्रिय झाले. संयमी नेता अशीच त्यांची ओळख होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची शेरेबाजी पक्षाला अडचणीत आणू शकते, असे बोलले जात आहे.

दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा...हे 'अशी ही बनवाबनवी' या मराठी चित्रपटातील गाणं सध्याच्या राजकीय वातावरणासाठी योग्य ठरत आहे. चित्रपटांनांही लाजवतील असे घटनाक्रम सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत. याचे सूत्रधार बेमालूमपणे वक्तव्यं करत सुटले आहेत. यात केवळ सामान्य जनता भरडली जाणार, हे निश्चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT