Namdeo Dhasal sakal
Blog | ब्लॉग

भाषण पूर्ण झाल्याशिवाय जाऊ देणार नाही, हट्टी ढसाळांनी उपमुख्यमंत्र्यांना दीड तास रोखून धरलेलं

नामदेव ढसाळ म्हणजे या शतकातला अग्रगण्य महाकवी. मराठी आणि भारतीय कवितेला नवी उंची प्राप्त करून देणारा अफाट प्रतिभावंत.

हरी नरके

Namdeo Dhasal Birth Anniversary : नामदेव ढसाळ म्हणजे या शतकातला अग्रगण्य महाकवी. मराठी आणि भारतीय कवितेला नवी उंची प्राप्त करून देणारा अफाट प्रतिभावंत. खरंतर नामदेवला ज्ञानपीठ किंवा सरस्वती सन्मान सहज मिळायला हवा होता. ज्याला पद्मविभूषण मिळायला हवे होते त्याची बोळवण पद्मश्रीवर करण्यात आली.

नामदेव कवी, वक्ता, नेता आणि मित्र म्हणून अतिशय जिंदादिल होता. माणूस म्हणून मात्र उन्निसबिस होता. अतिशय फटकळ, बेभरवशाचा आणि अघळपघळ.

नामदेवच्या हातात पैसा टिकत नसे. त्याची कमाई मुबलक असूनही तडकाफडकी खर्च करण्याची सवय हाडीमासी मुरलेली. त्यामुळे आता खिश्यात लाख दोन लाख रुपये असलेला नामदेव दुसऱ्या मिनिटाला कफल्लक असायचा.

मग पैसे मिळवण्यासाठी तो कोणत्याही तडजोडी करायचा. उचापती करायचा. बरं एव्हढ करून मिळवलेला पैसा कुटुंबीय, मित्र, व्यसनं यावर पुन्हा उधळून क्षणार्धात मोकळा व्हायचा.

नामदेवचे लेखन मला खूप प्रिय. पण त्याचा हा उधळ्या स्वभाव मला आवडत नसे. पण तो नामदेव होता. त्याची बायको मल्लिका ही शाहीर अमर शेख यांची मुलगी. पण तीही ऐशोआरामात राहणारी. तिच्या आत्मचरित्रात तिने नामदेवची झाडाझडती घेतलेली. त्याला खूप ठोकून काढलेले.

पण नामदेव त्यावर ब्र शब्द काढत नसे. तुला हे मान्य आहे का असे मी त्याला थेट विचारले असता, नामदेवांनी काय सांगावे? हरी, तो मजकूर मीच लिहिला आहे असे समज. यावर काय बोलणार? माझी बोलती बंद. त्याच्या साप्ताहिकातून तो वाट्टेल ते गॉसिप छापायचा. मित्र, नातेवाईक, राजकारणी यांना सोलवटून काढायचा. वर भेटीत हसून म्हणायचा, मनावर घेऊ नका रे!

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सन्मित्र जयराम जाधव यांनी नामदेव व निळू फुले यांना मोठे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम ठेवलेला. प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री श्री. छगन भुजबळ हे विधिमंडळ अधिवेशनात व्यग्र होते. कामकाज चालू असल्याने ते येऊच शकत नव्हते. मी त्यांना आग्रह केला फक्त १० मिनिटांसाठी येऊन जा. पुरस्कार प्रदान करून दोन शब्द बोलुन लगेच जा.

त्यानुसार भुजबळ आले. नामदेवचा गौरव करणारे बोलले आणि निघाले.तर नामदेव चिडला. भुजबळ तुम्हाला मी माझे भाषण ऐकल्याशिवाय जाऊ देणार नाही. माईक हातात घेऊन तो लाह्या फुटाव्यात तसा बोलू लागला. तुफान बरसला.

विधिमंडळातून निरोप येत होते. भुजबळांना तिकडे पोचण्याचा CMचा अर्जंट निरोप आला पण नामदेव काही सोडेना. त्यादिवशी तो दीड तास बरसला. सुंदर बोलला. चळवळीबद्दलची आरपार निष्ठा असल्याने आतून बोलला.

तो म्हणाला, रिडल्स मोर्चातील काही संतप्त तरुणांनी हुतात्मा स्मारकाची नासधूस केली होती. अनेक हुतात्मे हे वंचित बहुजन समाजातले होते. त्यांचा अजाणता अवमान झाला झाला होता.नामदेव म्हणाला, मी स्वतः तिथे पडलेला पायतनांचा खच बघितला होता.

नामदेवने जनमताची भीती न बाळगता वस्तुस्थिती जाहीरपणे मांडली. आणि भुजबळ यांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून झोडणारांना प्रखर उत्तर दिले.

पुण्यातील सम्यक साहित्य संमेलनात नामदेव अध्यक्ष होता. उदय प्रकाश हे ख्यातनाम हिंदी साहित्यिक व इतर अनेक मान्यवर यावेळी हजर होते. बालगंधर्वमधील त्या कार्यक्रमाला डॉ. आ. ह. साळुंखे, दत्ता भगत व मीही उपस्थित होतो. नामदेव घणाघाती बोलला. त्यावेळी नामदेव व्हीलचेअरवर असल्याने त्याने बसून महापुरुषांच्या प्रतिमांना हार घातले.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

वामन मेश्राम यांच्या मूलनिवासी नायकचा मनोरुग्ण संपादक विलास खरात याने त्याची खोडसाळ आणि प्रक्षोभक बातमी दिली. नामदेववर आंबेडकरी जनतेचा अपार विश्वास असल्याने तो बाबासाहेबांचा अपमान करील यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. नाहीतर त्या दिवशी दंगल होऊन रक्तपात झाला असता असे खोडसाळ खरात नी मेश्राम.

पु. ल. देशपांडे यांनी नामदेव व मल्लिकाच्या अनेक करामती मला सांगितल्या होत्या. त्या यथावकाश नंतर कधीतरी..... नामदेवची कविता अतोनात अस्सल आणि मोक्कार दणकट होती.

त्याचे सदर लेखनही मोहरदार होते. नामदेव या शतकातला सर्वात मोठा कवी होता. तुकोबांचा कवितेचा वारसा पुढे नेणारा होता. मल्लिकाने त्याच्या समग्र साहित्याचे २ खंड प्रकाशित करून मोठे काम केले आहे.

- प्रा. हरी नरके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT