फ्रेनी नोशीर जिनवाला  sakal
Blog | ब्लॉग

मंडेला सरकारच्या पहिल्या महिला सभापती फ्रेनी जिनवाला कालवश

फ्रेनी नोशीर जिनवाला यांचे 12 जानेवारी रोजी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.

विजय नाईक,दिल्ली

दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवाद संपुष्टात आल्यावर पहिले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पहिल्या लोकशाही संसदेतील पहिल्या महिला सभापती श्रीमती फ्रेनी नोशीर जिनवाला यांचे 12 जानेवारी रोजी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निधन क्वाझुलू नातळची राजधानी डर्बन येथे राहत्या निवासस्थानी झाले. 

त्या मूळच्या मुंबईच्या पारशी कुटुंबातील. व्यवसायाने वकील. त्यांनी लंडनहून बॅरिस्टर ही पदवी संपादन केली होती. पण, बव्हंशी आयुष्य दक्षिण आफ्रिकेच्या वसाहतवादाविरूदधच्या संग्रामात व्यतीत केलं.   

`सकाळ’च्या वतीने दक्षिण आफ्रिकेतील राजकीय परिवर्तनाचे अध्ययन व वार्तांकन करण्याठी 1994 मध्ये मी प्रेटोरिया, जोहासबर्ग, डर्बन आदी शहरांना भेटी दिल्या. त्या दरम्यान जिनवाला यांची भेट झाली होती. मंडेला यांचे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी), झुलुंच्या इंकाथा फ्रीडम पार्टी (आयएफपी) व गौरवर्णीयांच्या नॅशनल कांग्रेसचे संयुक्त सरकार आले.

त्याचे नाव `गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल युनिटी’ असे ठेवण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष मंडेला व्यतिरिक्त उपाध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष एफ ब्ल्यु डी क्लर्क (नॅशनल काँग्रेस) व आयएफपीचे अध्यक्ष मांगोसुथू बुथलेझी यांचा गृहमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.

मंडेला यांच्या नेतृत्वाखाली संसदीय लोकशाहीचे सरकार तेथे येण्यापूर्वी तेथील घटना तज्ञांनी भारताच्या राज्यघटनेचे अध्यय़न केले होते. त्यानुसार, तेथील कारभार चालणार होता. फ्रेनी जिनवाला या मंडेला यांच्या निकटवर्तीय बंडखोर सहकारी. कृष्णवर्णीयाविरूध तेथे झालेल्या प्रथम अहिंसात्मक व नंतर सशस्त्र क्रांतिमध्ये जिनवाला यांनी महत्वाची भूमिका बजावली.

तेथे जाण्यापूर्वी मी त्यावेळचे लोकसभेचे सभापती शिवराज पाटील यांना भेटलो व सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी जे नियम असतात, त्याबाबतच्या दोन पुस्तिका जिनवाला यांना देण्याबाबत बोललो होतो. तेव्हा पाटील यांनी पुस्तिका देऊन, ``माझ्यावतीने त्यांना भारताला भेट देण्याचे आमंत्रण द्या,’’ असे सुचविले होते. त्यानुसार काही प्रयासानंतर जिनवाला यांची भेट झाली. दक्षिण आफ्रिकेच्या माझ्या दौर्यात त्यांना 28 जुलै 1994 रोजी प्रेटोरियाहून मी फोन केला, तेव्हा काहीशा त्रासिक स्वरात त्यांनी विचारलं, ``तुम्हाला माझा फोन दिला कुणी?’’ त्यावर मी सांगितलं, की तुमचे भारतातील मित्र छाब्रा यांनी दिला. त्यावर काहीशा सौम्य स्वरात त्यांनी दुसऱ्या दिवशी जोहान्सबर्गमधील हॉटेल प्रोशिया येथे येण्यास सांगितलं.

आपण भारतीय वंशाचे आहोत, यांचा त्यांना अभिमान असला तरी सभापतीपद मिळताच भारतीय वृत्तपत्रातून त्यांचा गौरव करणारे जे वृत्त आले, त्याने त्या सुखावल्या नाही, उलट काहीशा नाराज झाल्या. नाराजीचं कारण विचारता, जिनवाला म्हणाल्या, ``मी दक्षिण आफ्रिकेची नागरीक आहे. तेव्हा वारंवार कुणी मला भारतीय वंशाचं म्हटलं, की खटकतं. मी भारतीय वंशाची होते म्हणून सभापती झाले, असं नाही. पण, एक गोष्ट मान्य करावी लागेल, की डॉ नेल्सन मंडेला यांनी भारतीय वंशाच्या नेत्यांना सर्वत्र प्रतिनिधित्व दिले.’’

आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमधील महिला चळवळीतील त्या खंद्या वक्त्या तर होत्याच, पक्षाच्या महिला उद्धार विषयक आयोगाच्या उपाध्यक्षा होत्या. महिलांना एएनसी व राष्ट्रीय राजकारणात महत्वाचे स्थान मिळावे, म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. त्या उत्तम वकील, पक्षाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख होत्या. 1970 पासून एएनसीच्या तांझानिया, झांबिया, मोझांबिक व लंडन येथील कार्यालयात प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केले. तसेच, एएनसीच्या च्या सेनादलाची सशस्त्र नीती व वसाहतवादाविरूद्धची भूमिका, याबाबत त्यांनी अनेक वर्ष अधिकारपूर्वक भाष्य केले.

या भेटीत मी त्यांना शिवराज पाटील यांनी दिलेली सभापतींचे आदेश व लोकसभेच्या कामकाजाचे नियम ही दोन पुस्तके त्यांना दिली. त्यावर त्या म्हणाल्या, ``पुस्तके अगदी वेळेवर आणलीस. सभापतीच्या आदेशांच्या संदर्भात गेले काही दिवस सदस्य माझ्याकडे चौकशी करीत होते. भारतीय घटनेच्या प्रतीही निश्चित उपयोगी पडतील. कारण, घटनात्मक विधिमंडळाची बैठक लौकरच सुरू होत आहे.

’’ श्रीमती जिनवाला यांनी शिवराज पाटील यांनी दिलेले भारत भेटीचे आमंत्रणही स्वीकारले. तेवढ्यात एएनसीचे दोन तरुण कार्यकर्ते . दालनात आले, आणि त्यांच्याकडे पाहाता म्हणाले, ``मम्मी, कॅन वी डिस्टर्ब यू?’’ त्यावर माझ्याकडे पाहात जिनवाला उद्गरल्या,`` सी, दे कॉल मी मम्मी, वी आर ए क्लोज निट फॅमिली.’’

दक्षिण आफ्रिकेच्या संसदेचे एक आगळे वेगळे वैशिष्ठ्य सांगताना त्या म्हणाल्या, ``अनेक महिला संसद सदस्य तरूण आहेत. त्यांची लहान लहान मुले आहेत. त्या जेव्हा सभागृहात कामकाजासाठी येतात, तेव्हा मुलांना ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न होता, म्हणून, आम्ही संसदेच्या परिसरात त्यांच्यासाठी पाळणाघर (क्रेच) सुरू केलय.

ते व संसदेचे अधिवॆशन पाहाण्यास तू जरूर केपटाऊनला ये. येणार असल्याचं कळव, म्हणजे संसदेचा पासही काढून ठेवते,’’ असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यानंतर काही दिवसातच मी केप टाऊनला जाऊन संसदेचे कामकाज पाहिलं व तेथील अनोख्या पाळणाघरालाही भेट दिली. त्या म्हणाल्या होत्या, ``इव्हन मेल मेंबर्स हॅव स्टार्टेड कीपिंग देअर चिल्ड्रन इन द क्रेच.’’ संसदगृहानजिक अशा प्रकारची सोय असलेली दक्षिण आफ्रिकेची संसद ही जगातील एकमेव असावी.

1932 मध्ये जन्मलेल्या जिनवाला यांचे आजोबा व आजी 1800 च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेत गेले. उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षणानंतर जिनवाला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेल्या व तेथून त्यांनी पदवी घेतली. लंडनच्या इनर टेम्पलमध्ये त्या बॅरिस्टर झाल्या. त्यावेळी त्यांचे आईवडिल मोझांबिक (राजधानी - मापुतो) मध्ये स्थायिक होण्यासाठी गेले.

तथापि, फ्रेनी जिनवाला डर्बन येथे डॉक्टर असलेल्या बहिणीकडे राहाण्यास गेल्या. त्या दरम्यान, त्यांना एएनसीचे ज्येष्ठ नेते वॉल्टर सिसिलू यांनी मोझांबिक मधील एएनसीच्या  हद्दपार नेत्यांच्या कामकाजात साह्य करण्यास सांगितले. तेव्हापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिका आजही `लोकशाहीवादी झुंझार नेत्या’ म्हणून पाहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT