Bhondubaba sakal
Blog | ब्लॉग

या भोंदूबाबांचं करायचं काय?

तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो, अशी बतावणी करत पाटण तालुक्यातील भोंदूबाबासह तिघांनी गरीब महिलेची फसवणूक केली.

संजय शिंदे

तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो, अशी बतावणी करत पाटण तालुक्यातील भोंदूबाबासह तिघांनी गरीब महिलेची फसवणूक केली.

काहीही श्रम न करता कोणत्या तरी अज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीतजास्त पैसे मिळवता येतील, या विचारातून गुप्तधनाच्या गोष्टी जन्माला येतात. एकीकडे आपण चंद्रावर पाऊल ठेवत आहोत आणि दुसरीकडे अंधश्रद्धांच्याही आहारी जात आहोत. एकविसाव्या शतकात आपण आहोत; पण मनाने किती मागच्या काळातच रेंगाळत आहोत, याचेच हे पुरावे. याला पायबंद घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी रुजली पाहिजे.

गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने भरणे (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील महिलेची ४० लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूगिरी करणाऱ्या पाटण तालुक्यातील गिरेवाडी व करंजवडे येथील तिघांना अटक करण्यात आली.

मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत खेड पोलिस ठाणे हद्दीमध्ये तीन भोंदूबाबांनी ‘माझ्याकडे दैवीशक्ती असून, तुमच्या घरात गुप्तधन आहे. ते मी तुम्हाला काढून देतो आणि कोट्यवधी रुपये मिळवून देतो,’ असे सांगून खेड येथील एका गरीब व कष्टकरी महिलेला विश्वासात घेतले व तिच्या घरी तंत्र-मंत्र वाचण्यात आले. पूजापाठ करण्यात आली व होमहवनही करण्यात आले. या सर्व गोष्टी केल्यावर कोट्यवधी रुपये मिळतील, असे त्या भोंदूबाबाने सांगितले.

या आमिषाला बळी पडलेल्या महिलेकडून आपण स्वतः कष्ट करून जमवलेले पैसे, तसेच आपल्या अन्य नातेवाइकांकडून जमा केलेले पैसे असे सर्व मिळून एकूण ४० लाख ९० हजार रुपये या भोंदूबाबांना देण्यात आले होते. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने कायद्याची पावले उचलूनही समाजातून अद्याप बुवाबाजीचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. त्या उलट त्यांचे प्रस्थ वाढतानाच दिसते. त्यामुळे आता भोंदूबाबांना ठेचून काढण्याची जरुरी आहे. बुवाबाजी, भानामती, चमत्कार, अंगात येणं या अंधश्रद्धांना थेट विरोध केला पाहिजे.

हे केवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून अपेक्षित न ठेवता सर्व समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे. राज्य शासनाकडूनही जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा केला.

मात्र, अद्यापही या कायद्याची नियमावली तयार करण्यात आली नाही. त्यामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणीअभावी होत नसल्याने दाखल गुन्ह्यांमध्येही हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच शिक्षा झाल्याची स्थिती आहे.

बुवाबाजीचे प्रकार अनेक गावांत उघडकीस आलेत. मात्र, त्यापासून बोध न घेता अजूनही भोंदूबाबांकडून पैशाची लूट, महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडताना दिसतात. विशेषतः ग्रामीण भागांत भोळ्या भाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक भोंदूंनी आपले प्रस्थ वाढवले आहे.

यापूर्वी भोंदूबाबांनी फसवणूक केल्याचे प्रकार घडूनही त्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांमुळे शहरात त्यांना त्यांचा ‘धंदा’ चालवताना मर्यादा येतात. त्यामुळे बहुतांश भोंदूबाबांनी खेड्याकडे प्रस्थ वाढविण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यांचे काही हस्तक भोंदूबाबांविषयी खोट्या अफवा पसरवितात.

जेणेकरून या बाबांकडे लोक आकर्षित व्हावेत, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. सध्याच्या धकाधकीच्या युगात सुख, शांतता मिळवण्यासह आपली समस्या दूर व्हावी, म्हणून बरेच जण अशा भोंदूगिरीवर विश्‍वास ठेवतात. काही गावांमध्ये त्यांना भेटण्यासाठी ठराविक वार ठरलेले आहेत. त्याच दिवशी दूरचे लोक समस्या घेऊन जातात. हजारो रुपये त्यांच्या पायावर ठेवतात.

फसवणूक होऊन लुबाडणूक झाली, तरी अशा भोंदूंविरुद्ध पोलिसांत जाण्याचे धाडस फारच कमी लोक दाखवतात. समाजात आपली नाचक्की होईल, पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीपोटी काही जण गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांचे फावते. त्यातूनच त्यांचे धाडस वाढून पुन्हा फसवणुकीचे प्रकार वाढतात.

बुवा- बाबांकडून लैंगिक, शारीरिक, आर्थिक शोषण होऊनही अनेकदा महिला गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांवर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यादृष्टीने गरीब महिलेने दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळे असे अनेक गुन्हे उघड झाले. सातारा जिल्ह्यात असे प्रकार घडले आहेत.

पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाच्या टोळीचा पर्दाफाश कऱ्हाड पोलिसांनी केला होता. भोंदूबाबांकडून फसवणुकीचे प्रकार सातत्याने उघड होत असूनही त्यापासून बोध न घेतल्याने पुन्हा-पुन्हा असे प्रकार उघड होत आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे अशा भोंदूबाबांना पकडण्यासाठी सकारात्मक काम करत आहे. त्याला समाजाने पाठबळ दिले पाहिजे, तरच अशा प्रकारांना पायबंद बसेल; अन्यथा आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात कारवाई झाली, तरी उद्या दुसऱ्या गावांत भोंदूबाबांचे फसवणुकीचे प्रकार सुरूच राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT