ग्रंथालयांच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन यांनीच देशात रुजविला.
'ग्रंथालय' ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. या दोन्हीचा समन्वय राखण्यासाठी ग्रंथपालाला नेहमी प्रयत्नशील राहावे लागते. सार्वजनिक वाचनालयांचा ग्रामीण महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. वाचक ग्रंथालयाभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग हाती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. धावपळीच्या जीवनात इच्छा असूनही ग्रंथालयात जाणे शक्य होत नाही. यामुळे ऑनलाइन ग्रंथालयांचे महत्त्व वाढत आहे. त्यादृष्टीनेही नव ग्रंथपालांना ई -लायब्ररीची देखील नवी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर्स उपलब्ध झाले आहे. त्यामुळे वाचकांसाठी ग्रंथालयात विविध प्रकारची ग्रंथ-संपदा उपलब्ध झाली आहे. अलिकडे ग्रंथालयांना व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्हटले जाते. मनोरंजक आणि वैचारिक असे साधारणपणे पुस्तकांचे दोन प्रकार करता येऊ शकतात. मनोरंजनातून संदेश देणारी, वाचकांच्या भावनेला हात घालणारी पुस्तके ही लोकप्रिय असतात. या उलट बुध्दीला आव्हान देणारी, वाचकाच्या तर्कशक्तीला जोखणारी पुस्तके चोखंदळ वाचकांमध्ये लोकप्रिय ठरु शकतात. मोबाईल आणि इंटरनेटच्या सध्याच्या जमान्यात वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर केवळ नकारात्मक सूर लावत बसण्यापेक्षा सकारात्मक पावले टाकून वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
नवी पिढी वाचनापासून दूर
'वाचाल तर वाचाल असा मंत्र सांगितला जातो, ते उगीच नाही. बौध्दीक आणि सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्व आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा केवळ उक्तीतून उद्घोष न होता ती कृतीतून प्रत्ययास आणण्याचे कार्य पुस्तकांच्या रुपाने होऊ शकते. आजच्या पिढीवर असे संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. रेडिओ, टीव्ही, मोबाईल, इंटरनेटच्या काळात नवी पिढी वाचनापासून दूर जात असल्याचे चित्र दिसते. त्यांच्यावर सुसंस्कार करण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तके पुरेशी नाहीत. नव्या पिढीची मानसिकता ओळखून त्यांच्या सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागेल.
वाचनसंस्कृतीला धक्का बसतो, असं मुळीच नाही!
पुस्तक वाचण्याची माध्यमं कितीही बदलली तरी पुस्तकं आणि वाचकांमधला संवाद कधीच संपणार नाही. हल्लीच्या अत्याधुनिक काळात पुस्तक तुमच्यासमोर येण्याचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. त्यात ई-बुक्स, डिजिटल बुक्स इत्यादी अनेक प्रकार आहेत, यामध्ये तंत्रज्ञानाची भर पडतच राहील. अर्थातच हे सर्व तंत्रज्ञान सोयीस्करच आहे. वाचक इतर माध्यमांतून पुस्तक वाचत आहेत याचा अर्थ त्यांची आवड कमी झाली असा होत नाही. उलट मी म्हणेन की, या सर्व माध्यमांनी वाचन संस्कृतीला पुढं नेण्यात हातभारच लावला आहे. आपण फक्त पुस्तक या बाह्यरूपाचा विचार करतो; पण पुस्तकांमधला जो आशय असतो तो कोणत्याही माध्यमात कायमच राहतो, त्यामुळे कागदाखेरीज इतर माध्यमांतून पुस्तक वाचल्यास किंवा ऐकल्यास वाचनसंस्कृतीला धक्का बसतो असं मुळीच नाही. आपला कोणत्याही कारणानं पुस्तकांशी संपर्क येणं हे महत्त्वाचं.
- प्रा. डॉ. उदय लोखंडे, कला वाणिज्य महाविद्यालय, सातारा.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.