Shamal Bhagat Esakal
Blog | ब्लॉग

Shamal Bhagat: कलेक्टर साहिबा...

UPSC: "'टॅव टॅव' करत लाल दिव्याच्या गाडीतून येणारे साहेब आमच्या कधी नजरेस पडले नाहीत, त्यामुळं त्या साहेबांना बघून मला अधिकारी व्हायचं लहानपणीचं 'सो कॉल्ड' स्वप्न आमच्या गावात कुणाला पडलं असावं, असं वाटत नाही."

सकाळ वृत्तसेवा

आशिष एन कदम

'अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है!'

शाहरुख खानचा हा डायलॉग सर्वांना माहीत आहे. या दोन ओळी तुमच्याबाबत कितपत खऱ्या ठरतात, हे त्या गोष्टीप्रति असलेली तुमची जिद्द, मेहनत, चिकाटी किती आहे, यावर ठरते. ध्येयानं झपाटलेली माणसं आपल्या आजूबाजूला असतात. कुणी तुमच्यापेक्षा वयानं लहान असतं, तर कुणी मोठं, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड ही विलक्षण असते. त्यांच्याकडं पाहिल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते, हुरुपही येतो.

निसर्गानं अशी स्पेशल माणसं तुमच्या अवतीभवती पेरलेली असतील, तर तुमच्याभोवतीचं वातावरण आल्हाददायक राहतं. अशा वातावरणात तुमची प्रगती लवकर होत जाते. महत्वाचं हे की अशी कायनात (सृष्टी)  लाभणं हेच तुमचं सर्वात मोठं भाग्य. अन त्याला मेहनतीची जोड मिळाली, तर तुम्ही नक्कीच एका रात्रीत यशस्वी होऊ शकता. 

१६ एप्रिल २०२४ चा दिवस... दुपारी दीडच्या सुमारास युपीएससीचा निकाल लागला अन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जल्लोषास सुरुवात झाली. त्यात आमचं गावही मागे राहीलं नव्हतं. कारण आमच्या गावातही पहिल्यांदा कुणीतरी युपीएससीचं चक्रव्यूह भेदलं होतं.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणं हेच यूपीएससी देणाऱ्यांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी अभिमानाची बाब असते. आणि हे शिवधनुष्य पेलण्यात एक २४ वर्षाची मुलगी यशस्वी ठरली होती.

नीरा नदीच्या काठी वसलेलं भगतवाडी हे छोटसं गाव. गावची लोकवस्ती दीडएक हजारच्या आसपास. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातलं हे शेवटचं गाव म्हणता येईल. कारण नदी ओलांडली की सोलापूर जिल्हा सुरू होतो.

गावात एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. तिथं चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. गावातले बहुतांश लोक हे शेती, पशुपालन, शेत मजुरी, रंगकाम या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. अशा गावात एमपीएससी, यूपीएससी हे शब्द मोजक्याच लोकांना माहीत आहेत. त्यामुळं या परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्याही एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी. जेव्हा युपीएससीचा रिझल्ट लागला, त्या दिवशी शामल कलेक्टर झाली, ही बातमी दिवस मावळेपर्यंत गावातल्या प्रत्येक घराघरात पोहोचली होती. 

Shamal Bhagat

'पोरगी कलेक्टर झाली' 

तहसिलदार, कलेक्टर यांनी भेट द्यावी, अशी कोणतीही गुणवैशिष्ट्ये आमच्या गावात नाहीत. पण याच गावानं कैक कृषी अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि आता कलेक्टरही घडवलेत, हे आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो.

'टॅव टॅव' करत लाल दिव्याच्या गाडीतून येणारे साहेब आमच्या कधी नजरेस पडले नाहीत, त्यामुळं त्या साहेबांना बघून मला अधिकारी व्हायचं आहे हे लहानपणीचं 'सो कॉल्ड' स्वप्न आमच्या गावात कुणाला पडलं असावं, असं वाटत नाही.

अशी परिस्थिती असणाऱ्या गावातल्या एका सामान्य कुटुंबातील मुलगी 'आयएएस' पदाला गवसणी घालू शकते, ही गोष्ट अभिमानास्पद आहे. 'क्वीन ऑफ हिल्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसूरीच्या 'लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी' म्हणजेच 'लबस्ना'त जायचं स्वप्न युपीएससीची तयारी करणारा प्रत्येक उमेदवार पाहत असतो. शामलनं ते स्वप्न पाहिलं अन आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात ते सत्यात उतरवलंही. पहिल्या प्रयत्नात ती पूर्व परीक्षा क्रॅक करू शकली नव्हती. 

टॉपर शामल

शामल एकत्र कुटुंबातच लहानाची मोठी झाली. तिचे वडील शेतीसह रंगकाम व्यवसायही करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच तिनं चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण शेजारच्या निरनिमगावमध्ये झालं. दहावीत शाळेत पहिला क्रमांक पटकावल्यानंतर अकरावी आणि बारावीचं शिक्षण तिनं सराटीमधील जिजामाता विद्यालयातून पूर्ण केलं आणि तिथंही बारावीत प्रथम क्रमांक मिळवत आपली यशस्वी मोहीम कायम राखली. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अॅग्रीची पदवी संपादन करताना तिनं विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पटकावलं होतं. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणारी ही पोरगी एक दिवस गावाचं नाव काढणार याची खात्री होती. युपीएससीच्या परीक्षेत देशात २५८ वी रँक मिळवत तिनं तिच्याबद्दल असणारा हा विश्वास सार्थ ठरवला.  

यूपीएससी मुलाखतीच्या तारखा जाहीर होण्यास काही दिवस बाकी असताना ८ नोव्हेंबर २०२३ रोजी तिच्या आईचं कर्करोगामुळं निधन झालं. ऐन मुलाखतीच्या तोंडावर देव जणू काही तिची परीक्षा पाहत होता. एकापाठोपाठ एक अडचणी डोकं वर काढत होत्या. पूर्व परीक्षेपासून ते मुलाखतीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत आपली शारीरिकपेक्षा मानसिक स्थिती शाबूत ठेवणं हे उमेदवारांच्या पुढचं मोठं आव्हान असतं. त्यासाठी लागतो तो पराकोटीचा संयम आणि धैर्य. अधिकारी होण्याचं स्वप्न जिनं दाखवलं, त्या आईच्या निधनामुळं तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. अशा खडतर परिस्थितीतही ती डगमगली नाही. स्वत:ला सावरत मुलाखतीसाठी तिनं एकटीनं दिल्ली गाठली. आणि १० जानेवारीला मुलाखतीचा अवघड टप्पाही पार केला. अखेर तिच्या जिद्दीपुढं नियतीलाही गुडघे टेकावे लागले. प्रतिष्ठेची समजली जाणारी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होत तिनं आईनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत तिला खरी श्रद्धांजली वाहिली. लेकीचा विजयोत्सव पाहायला आज त्या हव्या होत्या, असं तिच्या सत्काराला जमलेला प्रत्येकजण म्हणत होता. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तिच्या आसपासच्या लोकांनी अगदी जवळून पाहिल्या आहेत. पूर्व परीक्षेपासून मुलाखतीपर्यंतच्या नऊ-दहा महिन्यांच्या काळात झालेली तिची परवड सर्वांना माहीत आहे. त्यामुळं अशा प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणाऱ्या शामलचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. 

घरात सर्वात लहान असल्यामुळं तिला सगळेजण 'छोटी' या टोपण नावानही ओळखतात. आज त्याच छोटीनं गावाचंच नाही, तर तालुक्याचंही नाव देशभरात मोठं केलंय. या यशात तिच्या तीन मोठ्या भावंडांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील मुली कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणताही क्लास न लावता युपीएससीसारख्या अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात, हे तिनं दाखवून दिलंय.

Shamal Bhagat

'कुछ तो लोग कहेंगे'

शेवटी एक महत्वाचा किस्सा इथं आवर्जून नमूद करावासा वाटतो. दहावीत बोर्डाच्या परीक्षेत शामलनं शाळेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला लग्नासाठी स्थळ आलं होतं. त्यावेळी ती घरच्यांशी जोरदार भांडली होती. त्यामुळं गावातील लोकांच्या नजरेत ती 'आगाऊ कार्टी' बनली. लोअर मिडल क्लासमधील पोरांना नेहमी सतावणाऱ्या 'लोक काय म्हणतील?' या राष्ट्रीय प्रश्नाचा ती विचार करत बसली नाही. 'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना.' 

जर त्यावेळी शामलचं लग्न झालं असतं, तर कदाचित आज ती कलेक्टर बनली नसती. तिला डोक्यावर घेऊन नाचायला अख्खं गाव गोळा झालं नसतं. दीडएक हजार लोकसंख्या असलेल्या भगतवाडीला देशभरात ओळख मिळाली नसती. मुली स्वत:च्या पायावर उभं राहून आपल्या घरादाराचं नाव काढू शकतात, असा विश्वास तिच्या सत्काराला उपस्थित राहिलेल्या लोकांच्या मनात निर्माण झाला नसता. विशेषत: मुलींना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा मिळाली नसती. तिला पाहण्यासाठी जमलेल्या तरुण-तरुणींमध्ये आपणही शामलसारखं अधिकारी होऊ शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला नसता. आणि देशाला भविष्यातील एक चांगली महिला अधिकारी मिळाली नसती. शामलच्या एका निर्णयामुळं निदान आमच्या गावात तरी एक मोठा वैचारिक, सामाजिक बदल घडण्यास सुरुवात झाली आहे, हेच तिचं खरं यश आहे. 

भविष्यकाळात ती नक्कीच मुली आणि महिलाच्या सक्षमीकरणासाठी काम करेल, हा आजपर्यंतचा तिचा प्रवास सांगतो. महिला व बाल विकास क्षेत्रात भविष्यात ज्या काही सकारात्मक गोष्टी घडताना दिसून येतील, त्यात शामलचा खारीचा वाटा असेल, हे निश्चित. मसुरीत पार पडणाऱ्या प्रशिक्षणासाठी आणि प्रशासकीय क्षेत्रातील पुढील प्रवासासाठी 'कलेक्टर साहिबा'ना खूप साऱ्या शुभेच्छा-सदिच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT