MP Pradnya Singh Thakur
MP Pradnya Singh Thakur  
Blog | ब्लॉग

Blog : अंधश्रद्धा, देश व कोरोना

विजय नाईक,दिल्ली

चार दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळ येथे त्यांच्या भक्तांना उद्देशून केलेल्या प्रवचनात सांगितले, की मी रोज गोमुत्र प्राशन करते, म्हणून मला करोना झाला नाही. त्या म्हणाल्या, देशी गायीचे गोमुत्र प्याल्यास फुफ्फुसांना विकार होत नाही. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र फिरतोय. त्यांच्या भक्तांपैकी किती जणांनी त्याचे अनुकरण केले असेल, ठाऊक नाही. परंतु, त्यांच्या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, हे खरे. इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे, की गाईचे शेण अथवा मूत्र हे करोनावर औषध नाही, की त्याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

बाबा रामदेव यांच्या पातंजली कंपनीच्या औषधातही गोमुत्र व हिरवा घास हे एक औषध आहे. या औषधामागे शास्त्र किती, हे त्यांना पुराव्यासह पटवून द्यावे लागेल. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे तर त्यापुढे गेले होते. ते शिवांबू (स्वमूत्र) प्राशन करीत होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची तब्येत खणखणीत होती. आयुर्वेद व इतर भारतीय औषधी, जडीबूटी (हर्बल मेडिसिन) बाबतही आपण बरेच काही ऐकले आहे. त्याही बाजारात मिळतात. पण, अलीकडे उत्तर प्रदेशात आणखी एक टूम निघाली, की शरिराला गोमुत्र व शेण लावल्याने कोरोना होत नाही. त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. या दाव्याला शास्त्रामध्ये काही आधार आहे काय, याची शहानिशा ज्यांनी ते लावले होते, त्यांनीही केली नाही. यावरून समाजात हर्ड मेन्टॅलिटी आहे, असे दिसते. कुण्या बाबा, गुरू, साध्वी वा माताजी यांनी कोणतीही गोष्ट सांगितली, की डोळे झाकून त्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे आहे.

आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे, हे स्पष्ट आहे. याच अंधश्रद्धेविरूद्ध महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी सारं जीवन लढण्यात व्यतीत केलं. अखेर, त्यांची विज्ञानाधिष्ठित विचारसरणी खपून न घेणाऱ्यांनी त्यांचा खून केला. त्यांचे खुनी अद्याप हाती लागलेले नाही. पोलीस खात्यासाठी अधिक नामुष्कीची बाब ती कोणती.

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात खुद्द माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, गणपतीची मूर्ती दुग्धप्राशन करते, असे सांगितले होते. त्यावरून महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. त्या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. तरीही त्यावर विश्वास ठेवणाऱ्याना ते खरेच वाटले व मूर्ती दूग्धप्राशन करते, असेही ते म्हणू लागले. 21 व्या शतकात या भोळसट कल्पनांना भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून जी चालना व प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे जगाच्या दृष्टीने भारताची केवढी मोठी पीछेहाट झाली आहे, याची कल्पना करता येणार नाही. आधीच आपल्याकडे अशिक्षितांची संख्या अफाट. त्यात शिकलेल्या राजकीय नेत्यांनी मनाला येईल, त्या भोळसट कल्पना पसरावयाच्या, यापेक्षा देशाला मागे खेचण्याचे काम ते कोणते.

देशाची प्रगती करायची असेल आधुनिकतेची कास धरायची असेल, प्रत्येकाने सायंटिफिक टेम्पर अंगी बाणवला पाहिजे, असे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहमी सांगत. विज्ञान व तंत्रज्ञान याला त्यांनी मोठे प्रोत्साहन दिले. या खात्याचे मंत्रीपद सध्या आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे आहे. त्यांनीच या विचाराला सुरुंग लावला. रामदेव यांच्या पातंजली उद्योगाने कोरनावर रामबाण उपाय म्हणून कोरोनील या औषधाची निर्मिती केली. त्याच्या विक्रीचा प्रारंभ करायला खुद्द हर्षवर्धन गेले होते. वस्तुतः या औषधाच्या कोणत्याही स्वतंत्र व अधिकृत शास्त्रीय चाचण्या झालेल्या नव्हत्या. ते औषध सुरक्षित आहे काय, याची शहानिशा झाली नव्हती. उलट, भाजप सरकराने बाबा रामदेव यांना डोक्यावर घेतल्याने व सवलती उपलब्ध करून दिल्याने आपण काहीही केले, तरी खपेल व मंत्री तर धावत येतील , या विचाराने त्यांनी कोरोनीलचे उत्पादन केले. परंतु, गेल्या मार्चपासून देशाला ग्रासलेल्या कोरोनाला हे औषध लागू पडल्याचे एकही उदाहरण समोर आले नाही. त्या निमित्ताने बाबा रामदेव यांनी मात्र लाखो रूपये कमावले असतील व गरीबांच्या घशात ते ओतले असेल. प्रत्येक वस्तूची विक्री व जाहिरात करण्यासाठी आज सोशल मिडियाचा उपयोग केला जातो, तसाच याबाबतही झाला.

दुर्देवाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंधश्रद्धेला थारा देऊ नका, असे कधी त्यांच्या मंत्र्यांना जाहीररित्या सांगितले नाही. उलट, पुराण काळात प्लास्टीक शस्त्रकिया केली जात होती, तसेच इन-व्हर्टो फर्टिलायझेशनचे तंत्रज्ञान ज्ञात होते, असे सांगून त्यात भर टाकली, असे दिल्ली विद्यापिठातील पदार्थ व अंतरिक्ष विज्ञान या विषयाचे प्रा. शोभित महाजन यांनी द इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, तीन वर्षांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी विश्वाच्या उत्क्रांतिच्या सिद्धांताला आक्षेप घेऊन तो विषय शाळेतून शिकवायला नको, असे मत व्यक्त केले होते. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या केंद्रीय मंत्र्याने दावा केला होता, की वेदविद्येमधील सिद्धांत आइऩस्टाईनच्या सिद्धांताना मागे टाकणारे आहेत. गेल्या वर्षी या मंत्रालयाने गोमूत्र व शेणाचे काय लाभ आहेत, यावर संशोधन करण्यासाठी अर्थसाह्य देऊ केले होते. त्यापुढेही जाऊऩ एका माजी मुख्यमंत्र्याने दावा केला, की गाय हा असा एकमेव प्राणी आहे, की जो श्वसन करताना प्राणवायू बाहेर टाकतो. भोळसट कल्पना रुजवायच्या, या मंत्र्यांच्या स्पर्धेकडे पाहिले, की हे असेच चालू राहिले आणि शालेय पुस्तकातही त्यांचा समावेश केला, तर भारताची पुढील पिढी पुराणकाळाच्या पुढे जाणार नाही. विज्ञानाची कास धरली नाही, तर देश कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकणार नाही.

चीनमध्ये आज इन्होवेशनचे युग सुरू आहे, नवनवीन प्रयोग सुरू आहेत. जपानमध्ये रोबोटिक्सचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. चीन व अमेरिकेत ड्रोन्सच्या वापराच्या तंत्रज्ञानाने आघाडी मारली आहे. महाभारतातील ब्रह्मास्त्र म्हणजेच आजचे अण्वस्त्र असे आपण भले म्हणोत, आपले तंत्रज्ञान महाभारताच्या काळात जगाच्या पुढे गेले होते, असा दावाही करो, तरी ते ब्रह्मास्त्र (अण्वस्त्र चाचण्या करण्यासाठी) तयार करण्यासाठी इंदिरा गांधी व अटल बिहारी वाजपेयी यांना आधुनिक तंत्रज्ञानाची, शास्त्रज्ञांची गरज भासली हे सत्य कसे नाकारणार. अंधश्रद्धा रूजविण्यालाही मर्यादा आहेत, हे विद्यमान सरकारला ध्यानात ठेवावे लागेल. माजी शिक्षण मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी काही वर्षापूर्वी संसदेत केलेल्या एका भाषणात पाणिनी, आर्यभट्ट, चार्वाक, भास्कर आदींचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांची महती सांगितली होती. याबाबत भारताने निश्चितच अभिमान बाळगला पाहिजे, असेही ते म्हणाले होते. तथापि, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचे अध्ययन व पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते. त्याची आठवण विद्यमान शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल व हर्षवर्धन यांना करून देण्याची गरज आज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT