Deep Amavasya 2023 sant namdev maharaj sharavn month adhik maas uhurat puja vidhi and significance of deep amavasya esakal
संस्कृती

Deep Amavasya: दीप अमावास्या आणि ज्ञान, परमार्थाचं कनेक्शन काय?

उपनिषदांमध्ये गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश आहे. अंधार हा असत्याचं, अज्ञानाचं प्रतीक आहे; तर ज्योती म्हणजे प्रकाश हे सत्याचं, ज्ञानाचं प्रतीक!

सकाळ वृत्तसेवा

डॉ. आर्या आ. जोशी

Deep Amavasya 2023 : नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी। असं म्हणत संत नामदेव महाराजांनी समाजप्रबोधन केलं. ज्ञानाचा दीप अखंड उजळत ठेवण्याचा संदेश देणाऱ्या संत नामदेवांची पुण्यतिथी आषाढ वद्य त्रयोदशी या दिवशी असते. आषाढ अमावास्या म्हणजे दिव्याची आवस. ही आपल्याला ज्ञान संपादनाचं महत्त्व सांगतच येते.

आषाढ महिना मोठ्या पावसाचा. भारतात कृषी संस्कृती असल्याने आषाढ महिन्यात शेतीची कामे जोरात सुरू असतात. याच महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावास्या. हा दिवस ‘दीप अमावास्या’ म्हणून ओळखला जातो.

आश्विन महिन्यातील अमावास्या म्हणजे दीपावली लक्ष्मीपूजनाची संध्याकाळ ही सुद्धा अंधःकाराचा नाश करून प्रकाश पसरवीतच आपल्या आयुष्यात येते. दीप अमावास्याही ज्ञानाचं आणि परमार्थाचं महत्त्व गात गातच येते.

आषाढ महिन्यानंतर येतो सणांचा, व्रतांचा राजा श्रावण. यावर्षी अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास आला आहे. परंतु दरवर्षी आषाढानंतर येणारा श्रावण म्हणजे पारमार्थिक अनुष्ठांनाची रेलचेलच असते. या प्रवासाची सुरुवात म्हणजे खरंतर आषाढ अमावास्या. सर्व विधी विधानांमध्ये दीपपूजनाचं विशेष महत्त्व भारतीय संस्कृतीत मानलं जातं.

दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति।

स्वतः प्रकाशतो किंवा दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दीप होय, असे शब्दकल्पद्रुम या ग्रंथात सांगितले आहे. आपल्या देवघरातले तसेच रोजच्या वापरातले दिवे घासून, उजळून लख्ख करायचे. त्यात नवी वात घालायची, जुनी काजळी काढून टाकायची आणि लखलखीत दिवे पुन्हा उजळून टाकायचे आणि त्यांचे मनोभावे पूजन करायचे असे हे व्रत.

दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्।

गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।

अशी या दिव्यांची प्रार्थनाही केली जाते. सूर्यरूप आणि अग्निरूप दिव्याचे हे उत्तम तेज पूजनीय आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. लोकसंस्कृतीत या व्रतामध्ये बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे तयार करून त्यांचीही पूजा केली जाते. असे दिवे नंतर प्रसाद म्हणून खाल्ले जातात.

स्वच्छता, सातत्याचे महत्त्व

पावसाळ्यात शरीराला येणारी मरगळ दूर सारून शरीरही लखलखीत करायचं आणि मन बुद्धी सतेज होण्यासाठी श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिकातली व्रत वैकल्ये साजरी करायला सज्ज व्हायचं.

ऐका दिव्यांनो तुमची कहाणी... असं सांगत जी कथा आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत, तिच्यातील अविश्वसनीय भाग किंवा कालोचित न वाटणारा भाग विचारात न घेता त्यातील सातत्याचे महत्त्व आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे.

ज्या काळात वीज उपलब्ध नव्हती त्या काळात घरात सतत तेवत्या राहणाऱ्‍या दिव्यांचं महत्त्व विशेष होतं. कुटुंबातील सदस्यांनी घरातले कंदील, दिवे यांची काजळी काढणे, त्याची काच स्वच्छ करणे अशा गोष्टी अपरिहार्यच असत.

आजही ग्रामीण भागात वीज गेल्यानंतर विजेरी वापरली जाते तरीही काही कुटुंबात आपल्याला कंदिलांचाही वापर दिसून येतो. त्यांची स्वच्छता, निगा ही पण एक जबाबदारी असते. त्याशिवाय लख्ख निर्मळ प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.

तमसो मा ज्योतिर्गमय। असं बृहदारण्यक उपनिषदात (१.३.८) प्राचीन ऋषींनी नोंदवून ठेवलं आहे. ज्ञानाचा कळसाध्याय असणारी उपनिषदे सांगतात की, आयुष्य जगताना अंधार नको, तर प्रकाश हवा आहे.

उपनिषदांमध्ये गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश आहे. अंधार हा असत्याचं, अज्ञानाचं प्रतीक आहे; तर ज्योती म्हणजे प्रकाश हे सत्याचं, ज्ञानाचं प्रतीक! त्यामुळे दीपपूजनाच्या निमित्ताने सत्याचा, ज्ञानाचा अंगीकार करण्याचा संकल्प करूया!

ज्यांच्या आयुष्यात दारिद्र्याचा, अज्ञानाचा अंधार आहे त्यांना मदत करण्याचा संकल्प कृतीरूप करूया. केवळ माणसेच नव्हे तर निराधार पशू, पक्षी आणि निसर्गातील सर्वच घटक यांचं आपल्या आयुष्यातील स्थान लक्षात घेता त्यांच्याही कल्याणाची कामना करूया!

(लेखिका धर्मशास्त्र अभ्यासक असून, मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT