चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी! या दिवशी श्रीरामांच्या जन्माचा उत्सव भारतभर, किंबहुना जगातील अनेक देशांत साजरा केला जातो.
- डॉ. गिरीश आफळे
चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी! या दिवशी श्रीरामांच्या जन्माचा उत्सव भारतभर, किंबहुना जगातील अनेक देशांत साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीत असलेल्या सद्गुणांच्या सर्वोच्च मर्यादा काय असू शकते? याचे उत्तर हवे असल्यास केवळ श्रीरामच डोळ्यांसमोर येतात. म्हणूनच त्यांना ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम’ म्हटले आहे. त्यांचे आचरण समस्त मानवजातीला सदैव मार्गदर्शन करणारे आहे. मुनीवर वाल्मीकी यांनी रचलेले रामायण हे नुसते काव्य नाही, तर तो इतिहास आहे.
एकवचनी श्रीराम
श्रीराम आदर्श कुटुंबव्यवस्थेचे निर्माते आहेत. सत्तेच्या मोहाने भल्या भल्यांना ग्रासले आहे. श्रीरामचंद्रांच्या जीवनात सत्तेलाच स्थान नाही, तर सत्तेचा मोह कुठून येणार! सत्तेमुळे अनेक पराक्रमी माणसांना मद म्हणजे माज चढतो. रावण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वडिलांना दिलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे श्रीराम वनवासात जातात. वाटेत शृंगवेरपूर हे गुह नावाच्या राजाचे राज्य लागते. हा गुह तर श्रीरामांचा प्राणासमान प्रिय मित्र असतो. अर्थातच, तो श्रीरामांना नगरीत बोलावून उत्तमोत्तम भोजन व विश्रांतीला गाद्या देऊ करतो. श्रीराम ते नाकारतात. का? तर, फळे आणि कंदमुळे खाऊन वनात राहण्याची प्रतिज्ञा असते! श्रीरामांनी अयोध्येला परत यावे व सिंहासनावर बसावे, असा आग्रह वास्तविक भरतच करत असतो. परंतु, श्रीराम आपल्या निर्धारापासून ढळत नाहीत. पुढे वालीचा वध केल्यावर श्रीरामांनी किष्किंधेचे राज्य सुग्रीवालाच दिले. स्वत: बळकावले नाही. लंकेवर विजय मिळविल्यावर ते राज्य वास्तविक श्रीरामांचेच होते. पण नाही! त्यांनी बिभीषणालाच राज्याभिषेक केला. असेच पुढे किष्किंधा नगरीत व लंकेच्या नगरीत जायचा प्रसंग येतो तेव्हा घडले. वालीवधानंतर सुग्रीवाला आणि रावणवधानंतर बिभीषणाला राज्याभिषेक करण्यासाठीही श्रीराम स्वत: राजधानीच्या नगरीत गेले नाहीत. या दोन्हीही राज्याभिषेकांना उपस्थित राहण्यासाठी श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणालाच राजधानीच्या नगरात पाठवले आहे. राज्याभिषेकांच्या या सर्व प्रसंगी श्रीरामांचा किती आदर सत्कार झाला असता बरे! पण नाही, वनवास म्हणजे वनवास!
एकबाणी श्रीराम
श्रीरामांच्या पराक्रमाचेच हे वर्णन आहे. पराक्रम हा सज्जनशक्तीचे रक्षण व दुर्जनशक्तींचा नाश करण्यासाठी उपयोगात आणायचा असतो. श्रीरामांच्या तारुण्याची सुरुवात विश्वामित्र ऋषींबरोबर यज्ञरक्षणासाठी ताटकावनात जाण्यापासून होते. त्राटिका (ताटका) ही स्त्री होती. तिला कसे मारू? हा प्रश्न सहाजिकच श्रीराम विचारतात. मात्र, ‘‘ताटका महापापिणी आहे. तिच्यात उत्तम धर्माचा लेशही नाही, दुष्टशक्तींचा नाश हा राजाचा धर्मच आहे. म्हणून तिला मारून टाक,’’ असे विश्वामित्रांनी सांगितल्यावर श्रीराम तिला ठार मारतात. त्याचप्रमाणे सुबाहू या बलाढ्य राक्षसालाही ठार मारतात; तर मारीच या राक्षसाला शंभर योजने दूर समुद्रात फेकून देतात. राज्यत्याग करून वनवासात गेल्यावरही हे कार्य सुरूच राहते. दंडकारण्यात दूषण, खर आणि त्रिशिरा या राक्षसांसह चौदा हजार राक्षसांना मृत्यूच्या स्वाधीन केले. पुढे सीतेला खायला निघालेल्या शूर्पणखेला विद्रूप करून त्यांनी सोडून दिले. याच शूर्पणखेने रावणाला सीतेचे अपहरण करण्यास उद्युक्त केले. पुढील रामायण त्यामुळेच घडले. रावण मारीचाकडे जाऊन त्याला सोन्याच्या हरिणाचे रूप देऊन सीतेचे अपहरण करण्याच्या कामी साहाय्य करायला सांगतो. तेव्हाही मारीच रामाच्या पराक्रमाचे वर्णन करून रावणाला या वाईट कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. तो अयशस्वी झाल्यामुळेच रावण पुढे सीतेचे अपहरण करतो.
षड्रिपूंवर मात
काम (लैंगिक अथवा अन्य कोणतीही इच्छा), क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर हे अनादी काळापासून सर्व मानवाचे सहा शत्रू आहेत. श्रीरामचंद्रांनी या षड्रिपूंवर मात केली आहे. माता कैकेयीने राजा दशरथाकडून श्रीरामचंद्रांना वनात पाठविण्याचा निर्णय वदवून घेतला, तेव्हा लक्ष्मण भयंकर संतापतो; परंतु श्रीराम मात्र शांत असतात. कैकेयी आणि तिला भरीस घालणाऱ्या मंथरा दासीवरही त्यांचा राग नाही.
साहाय्य करणाऱ्यांविषयी कृतज्ञता
सीतेला कुठे आणि कसे शोधायचे, हे अद्भुत कार्य हनुमानाने केले. सीता सापडल्याचे वृत्त हनुमानानेच श्रीरामांना सांगितले. तेव्हा श्रीराम म्हणतात, ‘‘आज तुला पुरस्कार देण्यासाठी माझ्याजवळ योग्य वस्तू नाही याचे मला वाईट वाटते. मी केवळ प्रगाढ आलिंगन देऊ शकतो.’’ यातच श्रीरामांनी हनुमंताला सारे काही दिले.
शरण आलेल्याला अभय
बिभीषण रावणाचा पक्ष सोडून श्रीरामांकडे येतो, तेव्हा त्याला सामावून घ्यायला वानरश्रेष्ठी तयार नसतात. कारण खरे-खोटे कळायला काहीही मार्ग नसतो. परंतु जो कोणी मला शरण आला आहे, त्याला मी अभय देणार, ही खरोखर केवळ परमेश्वरच घेऊ शकेल, अशी भूमिका घेऊन श्रीराम त्याला आश्रय देतात.
अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतं मम। (युद्धकाण्ड/१८/३३)
श्रीरामांनी रावणाच्या बळाचेही कौतुकच केले आहे.
अधर्मानृतसंयुक्तः कामं त्वेष निशाचरः।
तेजस्वी बलवान् शूरः संग्रामेषु च नित्यशः । (युद्धकांड/१११/९८) (अर्थात, हा निशाचर भलेही अधर्मी आणि असत्यवादी असेल परंतु संग्रामात सदाच तेजस्वी, बलवान आणि शूरवीर राहिला आहे.) एवढ्या विजयानंतरही श्रीरामांना आपल्या पराक्रमाचा दर्प चढला नाही. ते बिभीषणाला म्हणतात, ‘‘राक्षसराज! मला तुमचेही प्रिय करावयाचे आहे, कारण की तुमच्याच प्रभावाने मला जय मिळाला आहे.’’ याचबरोबर ‘मरणान्तानि वैराणि।’ (मृत्यूनंतर वैर संपते) हा सिद्धान्त सांगून, ‘‘हा रावण जसा तुमचा भाऊ आहे तसाच माझाही आहे; म्हणून याचा दाहसंस्कार उचित प्रकारे करा.’’ (युद्धकांड/१११/१००) अशी आज्ञाही बिभीषणाला देतात. लंकेहून अयोध्येला परत यायला निघाल्यावर काही कारणाने श्रीरामांना दिलेल्या मुदतीत अयोध्येत पोहोचणे शक्य होत नाही. उशीर झाल्यास भरत प्राणत्याग करणार असतो. श्रीरामांना भरताचा मत्सर वाटला असता तर कोणालाही आश्चर्य वाटले नसते, कारण त्यांचा राजसिंहासनावरील वैध हक्क तर गेलाच आणि तो सावत्र भावाला म्हणजे भरताला न मागताच मिळाला होता! तरीही श्रीरामांचे भरतावरील प्रेम अद्भुतच म्हटले पाहिजे.
समरसतेचे अग्रदूत
श्रीरामांनी हनुमंताला हेही सांगितले, ‘वाटेत जाता जाता गुह या राजाला मी कुशल आहे, हे सांगायला विसरू नकोस. कारण तो माझा मित्र आहे. माझ्यासाठी आत्म्याप्रमाणे आहे.’ रामस्यात्मसमः सखा। (अयोध्याकांड/५०/३३) श्रीरामांनी ज्यांना स्वत:च्या बरोबरचे स्थान दिले त्यात गुहाचे स्थान श्रेष्ठ आहे. गुह हा निषाद समाजाचा होता. श्रीरामांनी पुढे वानर, अस्वल, गृध्र इत्यादी समाजांनाही जोडले. वानर म्हणजे प्राणी नसावेत, तर ते वनात राहणारे लोक होते. ते आर्यच होते. आजही मातंग समाज स्वतःला वाली, सुग्रीव, हनुमंत यांचे वंशज मानतो. शबरी याच समाजाची असून, ती मतंग ऋषींची शिष्या होती. तिच्या हातची उष्टी बोरेही श्रीरामांनी प्रेमाने खाल्ली. श्रीराम हे सामाजिक समरसतेचे अग्रदूत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.