Vat Purnima 2025 Rituals and Puja at Home: दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला, वट पौर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या दिवशी स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात. भारतभर आणि जगभरात जिथे जिथे हिंदू नागरिक आहेत तिथे तिथे हा सण अतिशय पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
पण वाढत्या वृक्षतोडीमुळे आणि झाडांची लागवडच कमी होत असल्याने अनेक वेळा घराजवळ किंवा परिसरात वडाचे झाडच नसते. अशा वेळी पूजा कशी करावी उपवास कसा करावा, हे जाणून घेऊया.
वट पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा आणि व्रताचा संकल्प करा की "मी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुख-समृद्धीसाठी हे व्रत करत आहे."
जर वडाचे झाड प्रत्यक्षात उपलब्ध नसेल, तर त्याचा पर्याय वापरता येतो. पर्याय म्हणून पुढील गोष्टींचा वापर करू शकता-
पिंपळाची फांदी
वडाच्या झाडाचा फोटो किंवा चित्र
माती अथवा धातूपासून बनवलेली वडाच्या झाडाची मूर्ती
हे सर्व प्रतीक स्वरूपात वापरून ती वस्तू पूजा करण्याच्या ठिकाणी ठेवा.
लाल कापड, कुंकू, अक्षता, फुले, फळे, धूप, दिवा, धागा, सात प्रकारचे धान्य, पाण्याने भरलेला कलश, १६ श्रृंगाराच्या वस्तू.
पूजेच्या वेळी वडाच्या झाडाचे प्रतीक आणि सावित्री-सत्यवान यांच्या प्रतिमा/चित्र समोर ठेवा.
कलशाची स्थापना करा आणि विधिपूर्वक पूजा करा. व्रतकथा वाचा किंवा ऐका. धाग्याने वडाच्या झाडाच्या प्रतीमेची सात वेळा प्रदक्षिणा घाला व धागा बांधा.
या दिवशी वट पौर्णिमेच्या व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे खूप महत्त्वाचे मानले जाते. या कथेमध्ये सावित्रीचा दृढ निश्चय, पतीवरील प्रेम आणि यमराजासोबत झालेला तिचा संवाद सांगितला आहे, जो स्त्रियांच्या श्रद्धेचं प्रतीक मानला जातो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.