वटवृक्षाला संपूर्ण भारतातच विशेष महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच त्याला ‘भारताचा राष्ट्रीय वृक्ष’ होण्याचा बहुमान मिळाला आहे.
वटवृक्षाला संपूर्ण भारतातच विशेष महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच त्याला ‘भारताचा राष्ट्रीय वृक्ष’ होण्याचा बहुमान मिळाला आहे. भौगोलिकदृष्ट्या त्याचा विस्तार पहिला, तर अगदी टोकाचे हवामान असलेले वाळवंटी किंवा थंड पर्वतीय प्रदेश सोडता, तो संपूर्ण भारतात आढळतो. मुख्यतः मानवी वस्तीच्या बाजूला लावलेला आढळतो. या वृक्षाचे धार्मिक महत्त्व आपण जाणतोच, परंतु ते का प्राप्त झाले असावे याची उत्तरे कदाचित त्याच्या पर्यावरणीय मूल्यांत मिळू शकतील.
पानांचं महत्त्व
हा वृक्ष ‘पानगळी आणि सदाहरित’ या दोन गुणधर्मांच्या सीमेवरचा आहे. कारण
पाने गळली तरी त्याला लगोलग पालवी येत असल्याने तो सदाहरित असल्याचे भासते.
वर्षभर ओलावा टिकवून धरणाऱ्या मातीत लावलेला असल्यास पानगळ नगण्य होते.
‘रुंद पानी’ असल्याने भर उन्हातही त्याची दाट सावली तयार होते.
जितकी पाने अधिक किंवा एकूण पानांचे क्षेत्रफळ अधिक तितके प्रकाश संश्लेषण अधिक आणि प्राणवायू हवेत सोडण्याचे प्रमाण अधिक.
वडाची वैशिष्ट्ये
भव्य आकार आणि पारंब्या हे सुंदर वैशिष्ट्य.
वाढत्या वयाबरोबर त्याला सर्व बाजूंनी आधार देणाऱ्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचतात.
वय वाढेल तशी व्याप्ती वाढत जाते. काही ठिकाणी वड अनेक एकरांवर पसरलेले आढळतात.
मोठे क्षेत्रफळ व्यापू शकेल अशा त्याच्या डेरेदार सावलीमुळे वस्तीच्या मध्यात आवर्जून लावला जातो.
त्याच्याभोवती पार बांधला जातो. वड आणि त्याचा पार माणसे एकत्र येण्याची हक्काची जागा.
गावातील अनेक स्थितंतराचा साक्षीदार
देशातील अनेक गावांतला उपयुक्त आणि कार्यशील घटक. अनेक गावांमध्ये पारावर चावडी भरते, ज्यात अनेक महत्त्वाचे सामाजिक, राजकीय निर्णय घेतले जातात.
पशुपक्ष्यांसाठी ‘आधार’
पर्यावरणीय भाषेत वडासारख्या काही वृक्षांना ‘कळीचा दगड/घटक’ (Keystone) मानतात.
आजूबाजूच्या परिसरातील अनेक प्राणी, पक्ष्यांसाठी तो आधारस्तंभ ठरतो.
बुलबुल, मैना, भोरड्या, कुरटुक, तांबट, हरियल, धनेश अशा अनेक पक्ष्यांसाठी त्याची फळे आवडते खाद्य आहे.
काही पक्षी रात्रीच्या विश्रामासाठी वडाचा वापर करतात.
खाली पडलेली फळे खायला हरणे, माकडे असे काही सस्तन प्राणी येतात.
अनेक कीटक-बीटल्स, बग्स, मुंग्या-मुंगळे त्याच्या खोडावर, पालापाचोळ्यात वावरताना दिसतात.
खाली पडलेल्या कुजलेल्या फळांवर काही फुलपाखरे येऊन अन्नद्रव्य शोषून घेतात, तर काही बुरशा वाढताना दिसतात.
ऑक्सिजन पार्क!
अलीकडे अनेक लोक ऑक्सिजन पार्क करून त्यात तुळशीसारखी छोटी हर्ब्स लावतात. त्या शेकडो हर्ब्सपेक्षा हा एकच वटवृक्ष किंवा कुठलाही सदाहरित वृक्ष लावणे अधिक योग्य, असे वाटते. वटवृक्ष अहोरात्र प्राणवायू सोडतो हा सोशल मीडियावरून सर्वत्र पसरलेला समज मात्र शास्त्राच्या कसोटीवर चुकीचा ठरतो. कारण प्रकाश संश्लेषण, ज्यामध्ये प्राणवायू बाहेर टाकला जातो ती प्रक्रिया करण्यासाठी कुठल्याही झाडाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यामुळे रात्री हे कार्य पूर्णपणे थांबते. मात्र, अशा पार्कमध्ये वटवृक्ष इतर झाडांपेक्षा किंचित सरस ठरतो त्याच्या इतर गुणधर्मांमुळे. वडामध्ये इतर वनस्पतींच्या मानाने अधिक बायोमास असल्यामुळे तो इतरांपेक्षा कर्बोदके आणि प्राणवायू निर्मितीत जास्त कार्यक्षम असतो.
संवर्धनाचे पूजन
आपल्या संस्कृतीतील शिकवणीनुसार आपण अशा आधारवडाची पूजा करणे, त्याचे संवर्धन करणे ओघानेच आले. पूजनाचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत गेले, तेही स्वाभाविकच. मात्र, खास वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण फांद्या तोडून त्यांची पूजा करणे हे वरील निरीक्षणांच्या आणि सत्याच्या पार्श्वभूमीवर मोठेच विरोधाभासाचे वाटते. धार्मिक कार्य म्हणून किंवा मनोरंजन म्हणून पूजन करावे की नाही, हा वैयक्तिक मुद्दा; परंतु सध्याच्या काळात त्याऐवजी किंवा त्याबरोबरीने त्याचे शास्त्रीय आणि व्यावहारिक महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी उपक्रम हाती घेणे अधिक सयुक्तिक वाटते. याची सुरुवात आपापल्या भागातील वड व इतर विशाल वृक्षांची नोंदणी करण्यापासून होऊ शकेल. पुढची पायरी त्यांना संरक्षण देण्याची. वाढायला वाव ठेवण्याची. त्यावर काय जीवन दिसते याच्या नोंदी ठेवण्याची. त्यांना धोका पोहोचू नये याची काळजी आणि नियोजन करण्याची. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या वेगळ्या पूजनाचा शुभारंभ झाल्यास निसर्ग आपल्यावर कृपा करेल याविषयी शंका नसावी. वटपौर्णिमेचे सध्याच्या काळाला अनुसरून उपयुक्त व्रत तेच होईल.
औषधी गुणधर्म
मुळे, साल, पाने, चीक अशा सर्वच अंगांचा विविध औषधांत वापर.
Ficus beghalensis हे त्याचे शास्त्रीय नाव. Ficus म्हणजे Fig म्हणजे अंजीर प्रजातींमधील वनस्पती. उंबर, नांदरुख, पिंपळ हे वडाचे सख्खे भाऊ. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची फुले फळे थेट फांदीवर दिसत नाहीत तर बंद फळातच आतल्या बाजूने वाढतात त्यामुळे फळ उघडल्याशिवाय दृष्टीस पडत नाहीत. या फुलांचं परागीभवन करणारा एक वैशिष्ट्यपूर्ण ‘वास्प’ (Wasp) - एक कीटक आहे. या ‘वास्प’ ची मादी फळाच्या मुखातून आत शिरते आणि आतल्या मादी फुलांचे परागीभवन करताना आतच अंडी घालते आणि तिथेच मरून पडते. काही दिवसांनी अंडी फलित होऊन नर व मादी कीटक बाहेर येतात, अर्थात फळाच्या पोकळीतच असतात. मिलन झाल्यावर नर कीटक फळाला छिद्र पाडतो आणि स्वःत आतच मरतो. तोवर नर फुले उमललेली असतात. त्यांचे पराग अंगावर लेवून मादी या छिद्रातून बाहेर पडते पुनःश्च दुसऱ्या फळात शिरून परागीभवन करण्यासाठी. इकॉलॉजी, उत्क्रांती या शास्त्रात हे महत्त्वाचे नाते मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.