Mi Ti Tuch Ka Sakal
संस्कृती

मी ती तूच का गं?

नवरात्रीचे घूमर गरबे कोविडमुळे बंद आहेत खरे; पण स्त्रीशक्तीला सालाबादप्रमाणे ओसंडून उधाण आले आहे. मुंबईत लोकलगाड्या मर्यादित शक्तीने धावताहेत.

- मृणालिनी नानिवडेकर

देवळातल्या अन्‌ गावकुसाबाहेरच्या महिलेला बरोबरीचे हक्क हवे आहेत. माणूस म्हणून जगायचे आहे. देवी म्हणूनही नाही अन्‌ दासी म्हणूनही नाही. लढा जेव्हा विषम असतो तेव्हा शोषितांनीच एकमेकींना आधार द्यायचा असतो. सकल हातांनी गोफ धरायचा असतो. तुझ्या व्यथा माझ्या वाटल्या अन्‌ तुझे भोग माझे वाटले तर एकहृदयी ब्रिगेड तयार होईल. नवरात्रीचा जागर ती दृष्टी देवो.

नवरात्रीचे घूमर गरबे कोविडमुळे बंद आहेत खरे; पण स्त्रीशक्तीला सालाबादप्रमाणे ओसंडून उधाण आले आहे. मुंबईत लोकलगाड्या मर्यादित शक्तीने धावताहेत. त्यातले महिलांचे जत्थे नवरंग उधळताहेत. सुंदर दृश्य दिसते ते. सगळ्या महिला साधारण एकाच रंगाकडे झुकणारी वसने लेवून वावरत असतात.

महिलाशक्तीचा तो एकजिनसी आविष्कार वाटतो. एक रंग, एक मन आणि एक संवेदना. अवघ्या महाराष्ट्रभर गावागावांतही हे रंगसोहळे आविष्कृत होत असतात म्हणे. पाच-सहा आकडी पगार असलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या महिला असोत किंवा त्यांच्या घरी काही हजारांची नोकरी करणाऱ्या कामकरी एका रंगाच्या माळेत गुंफलेल्या असतात या काळात. प्राचीन संस्कृतीच्या आपल्या देशाने महिलेला देवघरात स्थान दिले, मातृशक्ती संबोधले. आदिमायेला पूजले. आज उत्सवी वातावरणात नवरात्र रंगतेय. देवळात गर्दी होतेय; पण स्त्री-शक्तीला पूजताना समाजाचे अर्धं अंग, ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांबद्दल नेमका काय विचार होतोय? महिलांच्या खऱ्या जागरासाठी अशा सणावारांचा उपयोग करता येईल का? देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होताहेत. नियोजनकार अशाप्रसंगी समाजाबद्दल चिंतन करत असतात. भारताला पुढे नेण्याचे प्रयत्न करणाऱ्या योजना आखल्या जातात. ५० टक्के लोकसंख्येकडे लक्ष दिल्याशिवाय प्रगती साधली जाऊ शकत नाही, हे जगाने स्वीकारलेले सत्य. प्रश्न फक्त एवढाच असतो की, भारतासारख्या परंपराप्रिय, उत्सवप्रिय देशात सणांच्या निमित्ताने असा जागर होतो का? शासन वेगवेगळ्या योजना निश्चित करत असते, स्वयंसेवी संस्थाही आपापल्या परीने उपक्रम राबवत असतात. समूहमनाचा आविष्कार असणाऱ्या समारंभांची यात काही भूमिका असते का?

मुंबईसारख्या शहरात कोणतीही इव्हेंट इक्वलायझर असते. अठरा पगड जातीचे, अठरापगड प्रदेशातले लोक इथे एकत्र नांदतात. पर्याय नसतोच काही. त्यामुळे मराठी-अमराठी, भूमिपुत्र, उपरे असे वाद होतात. फायद्याकडे लक्ष देऊन ते कधी वाढवले जातातही; पण ते लगेच संपतात. सहजीवन हा मुंबईचा स्थायीभाव आहे. तुझ्यामाझ्यातले साहचर्य हाच जिथे आत्मा तिथे सणही एकत्व आणतात. समूहमनाची प्रगती महिलांपासून सुरू होईल. आज महिला नवी स्वप्ने पाहात आहेत. जीवनाच्या कित्येक क्षेत्रांत धडपडताहेत. नवरात्रात त्यांच्या धडपडीचा जागर होईल?

महिलांबाबत जे लोकप्रिय गैरसमज पसरवले जातात, त्यातला महत्त्वाचा म्हणजे त्यांचे आपापसातले कायम ताणले जाणारे संबंध. सासू-सून, नणंद-भावजय हे कायम ताणले जाणारे नातेसंबंध. मालकीभावनेमुळे असेल, पण घरात येणारी सून ही कायम शोषणाची शिकार व्हायची. आता घड्याळाचे काटे उलटे फिरत असल्याने सुना शिरजोर झाल्या आहेत, अशी ओरड सुरू असते. आपण खूप कौतुक करतो त्या कुटुंबव्यवस्थेतही असे महिलाप्रधान शोषण तर बाकी कथेचे काय बोलणार? महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देणारी चर्चा सुरू होती. तेव्हा बॉबकटवाल्या महिला, स्लीव्हजलेस ब्लाऊज घालणाऱ्या महिला असे कितीतरी भेदभाव बड्या नेत्यांनी चर्चेत आणले. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत महिला उतरल्या आहेत. त्यांच्यासमोरची आव्हाने कितीतरी मोठी आहेत. घरचे सांभाळून करिअर किंवा नोकरी करणे हे मोठेच आव्हान. बऱ्या घरातली ही स्थिती, कामकरी कष्टकरी महिला तर घरीदारी शोषणाची शिकार ठरतात. नवरा व्यसनाधीन असल्याने ही महिला तणावात जगत असते. कौटुंबिक हिंसाचाराची बऱ्याच वेळी शिकार ठरते. या वास्तवावर उत्तर शोधता येईल?

स्वातंत्र्योत्तर भारतात महिलांच्या सबलीकरणासाठी कायदे बरेच झाले. मताधिकार, वडिलांच्या संपत्तीत बरोबरीचा वाटा, विवाहातील बळजबरीला विरोध करणारा मॅरीटल रेप कायदा, कार्यालयातल्या विशाखा समित्या, दिल्लीतील निर्भया कांडानंतर न्यायमूर्ती वर्मा समितीने केलेल्या शिफारशी, विवाहाचे वय थेट १८ वर्षांवर नेणारे सुधारणा कायदे प्रागतिक; पण अंमलबजावणीच्या पातळीवर अंधार. पुरुषी व्यवस्थेला बदल नको असतात का? की महिलांबद्दलचे प्रागतिक कायदे हे केवळ दाखवण्यासाठी होत असतात? महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढत असताना त्यावर उपाय शोधण्यासाठी मिळून साऱ्याजणींनी प्रयत्न करायला नकोत? इरावती कर्वे या विदुषी. समाजशास्त्राच्या अभ्यासक. एका उत्खननात महिलेचा सांगाडा दिसला, तेव्हा त्यांनी भावनिक होत म्हटलं, ‘‘तू ती मीच का गं?’’ कित्येक शतकांच्या आधीचा तो देह इरावतीबाईंच्या मनात एकत्वाची भावना जागवून गेला होता. आज नवरात्रीच्या जागरात हेच प्रत्येकीला एकमेकींबद्दल वाटले तर? एकत्रित साखळी काही उत्तरे शोधू शकेल? साड्यांच्या वस्त्रप्रावरणांच्या पलिकडे एक होईल स्त्रीमन. जग गाजवणाऱ्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपतीपदावर इथे महिला विराजमान झाली, लोकसभेचे अध्यक्षपद सलग दोनदा महिलांनी सांभाळलेले, प्रमुख विरोधी पक्षनेतेपदाची सूत्र महिलेकडे आहे. आकाशात झेपावणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सपर्यंत महिला कर्तृत्वाची पताका फडकते आहे, पण ही कहाणी एखाददुसरीची आहे. फार तर चारचौघींची. तिची व्याप्ती वाढवणे आज कधी नव्हे तितके महत्त्वाचे झालेय.

अमृत महोत्सवात भारतात महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, प्रसूतीदरम्यानचे महिलामृत्यू कमी झाले आहेत, बचतगटांची मोहीम सुरू झाली आहे. हौसले बुंलद आहेत. ख्वाईशे हजारो आहेत. दुसरीकडे त्याच वेळी नोकरी, रोजगार अशा कामात असणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी झाले आहे. कोविडने रोजगार गेले. त्यात महिलांचे नुकसान झाले आहे. तरुण मुलींचे रोजगार जाण्याचे प्रमाण १४ टक्के एवढे मोठे आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाच्या चळवळी जोरात चालल्या. येथे तरी खऱ्या अर्थाने महिला पुढे याव्यात. घरात चार पैसे खेळू लागले की महिलांनाच घरी बसवले जाते अन्‌ कर्मचारीकपात करायचा निर्णय झाला की महिलांचीच नोकरी संपवली जाते. आर्थिक प्रगतीची शिकार महिला अन्‌ दुरावस्थेचा बळीही तीच. हे वास्तव बदलणे गरजेचे आहे. उत्सव थोर होतात; पण या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता म्हणणारा समाज नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: म्हणतो अन्‌ महिलेला मखरात बसवतो. देवळातल्या अन्‌ गावकुसाबाहेरच्या महिलेला बरोबरीचे हक्क हवे आहेत. माणूस म्हणून जगायचे आहे. देवी म्हणूनही नाही अन्‌ दासी म्हणूनही नाही. लढा जेव्हा विषम असतो तेव्हा शोषितांनीच एकमेकींना आधार द्यायचा असतो. सकल हातांनी गोफ धरायचा असतो. ‘मी तू’पणा संपवायचा असतो. तुझ्या व्यथा माझ्या वाटल्या अन्‌ तुझे भोग माझे वाटले तर एकहृदयी ब्रिगेड तयार होईल. नवरात्रीचा जागर ती दृष्टी देवो. अंबे महिलांचे जागरण आणि एकत्रीकरण होवो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT