Third Shravan Somvar 2021
Third Shravan Somvar 2021 
संस्कृती

Third Shravan Somvar 2021: शिवामूठ तिसरा श्रावणी सोमवार

सकाळ डिजिटल टीम

घरंगळत जाणाऱ्या शिवामुठी बरोबर ओठातून "शंभो हर हर महादेव"चा स्वर प्रतिध्वनित होत राहतो.

डॉ. मृणालिनी जमदग्नि

क्षणात येणारे ढग, सरसर येणारी पावसाची सर क्षणात पसरणारे रुपेरी कलाबतू सारखे ऊन, हिरव्यागार गवतावर इवल्याशा दवबिंदुंची पखरण! सारेच विलोभनीय! त्यातून येतो तिसरा श्रावणी सोमवार! अश्या नयनरम्य वातावरणात शांत, सौम्य, भगवान शंकराच्या मंदिरातील शाळुंका नितांत भावगर्भ वाटते. अंतरंगातील भक्ती भाव दाटून येतो.

शिवामुठीची पूजेची तयारी करताना 'कैलास राणा शिव चंद्रमौळी।फणींद्र माथा मुकुटी झळाळी।कारुण्य सिंधु भवदु:ख हारी। तुज वीण शंभो मज कोण तारी॥ "ओठावर येत राहत." आज मुगाची शिवामूठ आहे बर का" अशी थोरल्या बायकांकडून आठवण केलेलीच असते. तकतकीत हिरव्या रंगाचे मूग मुठीत घेतानाच घरंगळत असतात. मग पुजेच्या थाळीत घसरतील म्हणून पसरट वाडग्यात घेतले जातात. पावल झर झर शिवालयाची वाट धरतात.

गाभाऱ्यातील काळ्या पाषाणातील शिवलिंग, त्यावर सतत होणारा जलाभिषेक, ओघळणाऱ्या दुग्ध धवल बिंदूंची चमक, पांढरी फुले, बेलाची पाने, सुगंधित केवडा, कापूर, उदबत्ती असा सारा संमिश्र साज मनात रेंगाळत राहतो. भावगर्भित मनाने मूगघान्याची मूठ शिवाला अलगद अर्पण केली जाते. घरंगळत जाणाऱ्या शिवामुठी बरोबर ओठातून "शंभो हर हर महादेव"चा स्वर प्रतिध्वनित होत राहतो.

भौतिक सुखाच्या पलिकडे सुखाचे असंख्य बिन्दू असतात. ते मौन मनाने संतोष वृत्तीने उपभोगायचे असतात. शिव शंकर असेच आत्ममग्न वृत्तीत रमत असतात. हिरव्या रंगाच्या उत्सवात हिरव्या मुगाची शिवामूठ आणि संतोषवृत्ती याच काही नात तर नसेल!

आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म आणि उदरभरणाला यज्ञकर्म संबोधले आहे. "जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।" असा समर्थ रामदास स्वामींचा श्लोक ही आपण भोजन करताना म्हणतो. या यज्ञकर्मात सात्विक अन्नाची आहुती देऊन क्षुधाग्नि शांत करायचा असतो. मूग या कडधान्यात ही सात्विकता आणि पोषकता आहे. त्यामूळे भुकेचे शमन आणि आणि त्यामूळे येणारी संतोषवृत्ती मूगामधे आहे. भारतामधे अगदी प्राचीन आयुर्वेद चिकित्सा ते आधुनिक वैद्यक शाश्त्र माणसाच्या दैनंदिन आहारात मुगाला प्राधान्य देण्यासाठी आग्रही आहे.

प्राचीन काळापासून आपल्या यज्ञीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे यज्ञ, होम, स्वाहाकार यांचे आयोजन केले जाते. रात्रंदिवस चालणाऱ्या या कार्यात भुकेचे शमन अधिक काळपर्यंत रहावे म्हणून मूग शिजवून खात असत. त्यामूळे मुगाचे लाडू, शिरा किंवा शिजवून उसळ खात असत. संन्यासी लोक शिजवलेले मूग भिक्षा म्हणून स्वीकार करत असत.

प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी चोवीस चातुर्मास पायी परिक्रमा केली. अश्यावेळी ते फक्त दक्षिणी ब्राह्मणांच्या घरची भिक्षा घेत असत. पण अशी भिक्षा नाही मिळाली तर ते मूग शिजवून खात असत, असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहेत. यावरुन मूग हे अन्न नसले तरी अन्नाचे समाधान देणारे कडधान्य आहे. यावरुन मुगाची पोषकता समजून येते.

आजच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे मूग भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, रक्तदाब, पचन क्रिया योग्य ठेवण्यासाठी, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, लठ्ठपणा यावर सर्वाधिक पोषणयुक्त द्विदल धान्य मानले जाते. यामुळे मुगाचे आणि मुगाच्या डाळीपासून आमटी, कढण, उसळ, खिचडी, खीर, शिरा, दोसे, लाडू, कोशिंबीर, धीरडे, चकली, पापड, सांडगे, बिस्किट, शेव, केक असे अनेक प्रकार घरी आणि बाजारात उपलब्ध होत आहेत. चौरस आहारातील प्रथिन युक्त आहाराची पूर्तता करणाऱ्या मुगाचा बोलबाला प्रत्येक गृहिणींच्या स्वयंपाकघरात झाला तर नवल ते काय!

श्रावण महिन्यात जेव्हा पोटातील अग्नी मंद असतो. तेव्हा ऊर्जा शक्ती देणाऱ्या या मुगाचे महात्म्य सांगताना मूग गिळून गप्प बसायचे नाही तर शिवामूठ वाहताना समाधान आणि तृप्तिचा आनंद घेत म्हणायचे…

नम:शिवाय च शिवतराय च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT