Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Rahul Gandhi and Arvind Kejriwal sakal
देश

Loksabha Election : आप-काँग्रेसचा 'या' तीन राज्यांत आघाडी करण्याचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशनंतर काँग्रेसने ‘आप’शी दिल्ली, गुजरात आणि हरियाना राज्यांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पंजाबमध्ये मात्र या दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे आता स्पष्ट झाले.

पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने आता सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

आता आप व काँग्रेसमध्ये सुरू असलेली आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यानुसार दिल्लीत ‘आप’ चार जागांवर तर काँग्रेसचे उमेदवारी तीन लोकसभा मतदारसंघात रिंगणात राहणार आहेत. यापूर्वी ‘आप’च्या वाट्याला नवी दिली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली व उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ तर काँग्रेसच्या वाट्याला पूर्व दिल्ली, चांदणी चौक व उत्तर दिल्ली मतदारसंघ येणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय ‘आप’ला गुजरातमध्ये दोन मतदारसंघ मिळणार आहेत. यात भरूच, भावनगर, सुरत या तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात आपचे उमेदवार राहणार आहेत. उर्वरित मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रिंगणात राहतील. याशिवाय हरियाना राज्यातही काँग्रेससोबत आपची आघाडी राहणार आहे. हरियानातील दहा लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ ‘आप’ला सोडण्यात येणार आहे.

फरिदाबाद किंवा गुरुग्राम या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. गोव्यातील दोनपैकी एकही मतदारसंघ आपकडे राहणार नाही. ‘आप’ने दक्षिण गोवा मतदारसंघ काँग्रेसकडे मागितला होता. पंजाबमध्ये मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

‘इंडिया’ आघाडी सोडण्यासाठी दबाव

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडावे, यासाठी केंद्र सरकारमार्फत ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा आरोप ‘आप’च्या ज्येष्ठ नेत्या आतिशी मार्लेना यांनी केला आहे. येत्या दोन दिवसात ‘इंडिया’ आघाडीतून मुख्यमंत्री केजरीवाल बाहेर न पडल्यास ईडीची कारवाई करण्यात येईल, असे संकेत ईडी अधिकाऱ्यांनी दिल्याचे आतिशी यांनी सांगितले.

भाजपचा विरोधकांवर ‘कर दहशतवादाचा हल्ला’

अ. भा. काँग्रेस समितीची विविध बँकांमध्ये असलेली खाती गोठविणे हा भाजपने केलेला ‘कर दहशतवादाचा हल्ला’ असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस, खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

मोदी सरकारने प्राप्तिकर विभागाच्या सहाय्याने काँग्रेसच्या खात्यांमधील ६५ कोटी रुपये सरकारजमा केले.

ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बँकांमध्ये जात व बँक व्यवस्थापकांना धमकावून सरकार जमा केल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला. मुळात कोणत्याही पक्षाला प्राप्तिकर भरावा लागत नाही. काँग्रेसच्या खात्यात जमा झालेली सर्व रक्कम सामान्य कार्यकर्त्यांनी जमा केलेली आहे. ही रक्कम भाजपसारखी रोख्यांच्या माध्यमातून मिळालेली रक्कम नाही, असे वेणुगोपाल म्हणाले.

विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा डाव

विरोधकांना नेस्तनाबूत करून त्यांच्यासमोर आर्थिक संकटे उभी करण्यासाठी मोदी सरकारने आखलेला हा डाव आहे. परंतु या हल्ल्याला काँग्रेस पक्ष घाबरणार नाही. जनतेची ही लढाई रस्त्यावर व न्यायालयात लढली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आम्ही प्राप्तिकर विभागाच्या लवादात याचिका दाखल केलेली आहे. अशा कृती करून भाजप काँग्रेसला हतबल करू पाहत असेल तर त्याचे उत्तर दिले जाईल.

मोदी सरकारने विरोधकांना या निवडणुकीत उभे राहू नये, यासाठी सर्व व्यवस्था करण्याचा पण केलेला दिसत आहे. पुढील काही दिवसात इतर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांवर व पक्षांवर अशीच कारवाई होण्याची शक्यता असल्याचे खासदार वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT