अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे. राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात अक्षता पाठविण्यात येत असून, कलश यात्रेचेही आयोजन केले जात आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेबरोबरच अयोध्येत जल वाहतूकही सुरू होणार आहे. नव्या वर्षात शरयू नदीत जल मेट्रो सुरू होणार आहे.
उत्तर प्रदेशमधील पहिली जल मेट्रो अयोध्येत सुरू होणार आहे. राममंदिरात राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ जानेवारीला अयोध्येत येणार आहेत. त्यांच्याच हस्ते या जल मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. या जल मेट्रोची निर्मिती कोची शिपयार्डमध्ये झाली आहे. ही मेट्रो कोचीहून अयोध्येकडे रवाना करण्यात आली आहे. जलमार्गाने ती कोलकत्याहून पाटण्यामार्गे अयोध्येत पोहोचेल.
मेट्रोसाठी दोन जेट्टी कोलकत्याहून रामनगरीत पोहोचल्या आहेत. शरयूवरील घाट आणि मेट्रो या दरम्यान ये-जा करण्यासाठी या जेट्टीचा वापर करण्यात येणार आहे. यातील एक जेट्टी नया घाट आणि दुसरी गुप्तार घाट येथे उभी करण्यात येणार आहे.
जेट्टीबरोबर आलेले भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे (आयडब्लूएआय) एक पथक अयोध्येत पोहोचले आहे. जल मेट्रोचे आगमन १४ किंवा १५ जानेवारीला होणार असल्याचे ‘आयडब्लूएआय’चे उपाध्यक्ष सुनीलकुमारसिंह यांनी सांगितले.
या जल मेट्रोमुळे अयोध्येत धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात या मेट्रोचे संचलन उत्तर प्रदेश सरकार करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जलमार्ग प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. शरयू नदीतील जलवाहतूक हा त्याचाच एक भाग आहे. पुढील काळात नया घाट ते गुप्तार घाट या मार्गावर कॅटामरान नौका सुरू करण्याचेही नियोजन असल्याचे ‘आयडब्लूएआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने अद्याप या मेट्रो प्रवासाचे शुल्क निश्चित केलेले नाही. पण एका बाजूचे तिकीट २० ते ३० रुपये असण्याची शक्यता आहे. यापूर्वी केरळमधील कोची शहरात सुरू झालेल्या देशातील पहिल्या जल मेट्रोचे तिकीट २० रुपये आहे. तेथे मासिक किंवा साप्ताहिक पासची सुविधा देखील आहे. याच धर्तीवर अयोध्येत जल मेट्रोचे आरक्षण ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा सुरू होऊ शकते.
नया घाट ते गुप्तार घाट मार्गावर वाहतूक
या दोन घाटांमधील अंतर नऊ किलोमीटर
हे अंतर कापण्यासाठी दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणार
सध्या या दोन्ही घाटांवर रस्त्याने जाण्यासाठी ४० मिनिटे वेळ लागतो
५० आसन क्षमता
मजबूत लोखंडी आसने
कोची शिपयार्डमध्ये बांधणी
संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.