बंगळूर - येथील राजराजेश्वरीनगरचे आमदार मुनिरत्न यांच्या घराजवळ गूढ स्फोट होऊन एक व्यक्ती ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचा देह छिन्नविच्छिन्न झाला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनामुळे हा स्फोट झाला असण्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
व्यंकटेश (वय ५८) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो आमदारांच्या घरात काम करत होता. स्फोटामुळे आमदारांच्या घराच्या खिडक्यांचे गज, दरवाजाही फुटला आहे. घराच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. शेजारची घरे काहीशी दूर असल्याने त्यांना विशेष धोका पोहोचला नाही. कोणत्या प्रकारच्या स्फोटकापासून ही दुर्घटना घडली याची निश्चित माहिती मिळू शकली नसल्याचे शहर पोलिस आयुक्त सुनीलकुमार यांनी सांगितले. स्फोट झालेल्या ठिकाणाला भेट देऊन त्यांनी पाहणीही केली. स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या वस्तू विधीविज्ञान प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
घटनास्थळाचा बॉम्ब निष्क्रिय दल व श्वानपथकाच्या मदतीने तपास झाला. परंतु, स्फोट झालेल्या ठिकाणी कोणत्याच स्फोटक वस्तू आढळून आल्या नाहीत. स्फोट झालेली जागा रस्त्याची असून ती कोणाच्याच मालकीची नाही. आमदार मुनिरत्न यांना टार्गेट करून हा स्फोट घडविण्यात आला किंवा नाही, याची प्राथमिक तपासात माहिती समजू शकलेली नसल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले. स्फोटाबाबत राष्ट्रीय तपास पथक व इतर एजन्सींना माहिती कळविण्यात येणार असल्याचे
ते म्हणाले.
दरम्यान, हा स्फोट सिनेमा चित्रिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनापासून घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आमदारांच्या घरात काम करणारा व्यंकटेश रसायन भरलेले कॅन घेऊन जात असताना हा स्फोट घडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात
येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.