Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule sakal
देश

Chandrasekhar Bawankule : मोदी आणि मतदार यातील आम्ही केवळ दुवा

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर आहे. ‘४०० पार’च्या घोषणेचे भवितव्य ज्या राज्यांवर अवलंबून आहे, त्यात महाराष्ट्र सर्वाधिक महत्त्वाचे. एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात गेली साडेचार वर्षे प्रचंड उलथापालथ झाली आहे, अन् राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र नेमक्या कोणत्या बाजूला याचे उत्तर आता मिळणार आहे. महाराष्ट्रातील ‘मिशन ४५ प्लस’चे प्रमुख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी यासंदर्भात केलेली बातचीत :

प्रश्न : सलग दोनदा लोकसभा निवडणूक जिंकल्यावर तिसऱ्या वेळी जनतेच्या भावना वेगळ्या असतात. ‘अॅंटी इन्कम्बन्सी’ जाणवतेय का?

उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ही निवडणूक आजवरच्या सर्व प्रचलित समजांपेक्षा वेगळी आहे. मोदींच्या नेतृत्वातील भाजपने दोन कार्यकाळात केलेले बदल हे नागरिकांच्या आस्थेचा विषय आहेत. भारत आता विकसनशील देश या वर्गवारीतून विकसित देश होत महासत्ता होईल यावर जनतेचा केवळ विश्वास नाही तर तशी बहुतांश नागरिकांची श्रद्ध आहे. कोविडचा धक्का सोसूनही अर्थव्यवस्था वाढत आहे. शेतकरी, गरीब, महिला, दलित या चार वर्गांना मोदी देवता मानतात. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हेच मोदींचे ध्येय आहे. कोट्यवधी भारतीय हाच मोदींचा परिवार आहे. या प्रयत्नांमागची प्रामाणिक तळमळ जनतेला कळते. त्यामुळे या वेळी ‘अँटी इन्कम्बन्सी’ नाही तर ‘प्रो इन्कम्बन्सी’ची लाट आहे. क्षेत्रनिहाय प्रगतीचे चित्र जगासमोर आहे. जाहीरनाम्यात दिलेली वचने अगदी कलम ३७० सारखा अशक्य वाटणारा विषयही मोदींनी मार्गी लावला आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. येथे बरेच काही घडलेय अन् उत्तरेतले मोदीमय वातावरण येथे आपल्याकडे नाहीये. हे वास्तव तरी मान्य कराल ना?

उत्तर : असत्य आहे हे. महाराष्ट्राने गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांत मोदींच्या नेतृत्वातील भाजपसाठी बटन दाबले. या वेळीही तसेच होईल. मोदींना मतदान करण्यास जनता उत्सुक आहे. ही मंडळी मतदानकेंद्रांपर्यंत कशी पोहोचतील हे बघणे एवढेच आमचे काम आहे. पक्षाच्या यंत्रणेला एकच काम करायचे आहे, मतदानकेंद्र कुठे आहे ते जनतेला समजावून सांगायचे आहे. आम्ही केवळ दुवा आहोत मोदी आणि मतदारांमधील. अन् हे दुवा होण्याचे काम महाराष्ट्रात भाजपचे हजारो कार्यकर्ते मनापासून करताहेत हे अध्यक्ष या नात्याने मी अभिमानाने सांगतो.

प्रश्न : पण महाराष्ट्रात लढणारा भाजप हा काही एकटा पक्ष नाही. सहा मोठे पक्ष मैदानात आहेत अन् भाजप तर दोन पक्षांना समवेत घेऊन निवडणूक लढतो आहे. एकजिनसीपणा आला आहे का महायुतीत?

उत्तर : दोन मोठे पक्ष आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आमच्या समवेत आहे. यातील शिवसेना हा आमचा परंपरागत मित्रपक्ष आहे. गेली कित्येक वर्षे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित निवडणूक लढवतात. हिंदुत्वावर नव्हे तर सत्तेच्या लोभावर निष्ठा असलेली मंडळी आमच्यापासून दूर गेली. त्यामुळे आता जे समवेत आहेत त्यांना भारताला महासत्ता करायचे आहे. जनतेला सोयीसुविधा द्यायच्या आहेत. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मोठे करायचे आहे. दुसरा पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस आमच्यात नव्याने आलाय हे खरे आहे. पण भाजपप्रणीत विकासाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी ते आमच्यासमवेत आले आहेत. जानकर आमचेच आहेत. भाजपची ताकद वाढली आहे.

प्रश्न : भाजप तीन पक्षांना समवेत घेऊन जनतेसमोर जातोय. भाजपची पारंपरिक मते या पक्षांकडे हस्तांतरित होतील काय?

उत्तर : केवळ तीन नाही, आमच्या महायुतीत अन्य पक्षही आहेत. रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आहे ,कवाडे आहेत. आमच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी काम करीत आहेत. समवेत आलेल्या पक्षांच्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी आमचीही आहे. ठिकठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते यासाठी मित्रपक्षांशी संवाद साधत आहेत, बैठका घेत आहेत.

प्रश्न : भाजपमध्ये जा आणि आरोप, चौकशीतून मुक्ती मिळवा असे विनोदाने म्हणतात. तुम्हीच ज्यांच्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना घेतलेच का?

उत्तर : मोदींच्या नेतृत्वातील भाजपवर विश्वास ठेवून जी मंडळी आली त्यांची कुठलीही चौकशी थांबलेली नाही. आरोप होणे, चौकशीसाठी ताब्यात घेणे, गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा ठोठावली जाणे यात खूप फरक आहे. ‘सीबीआय’, ‘ईडी’ या स्वतंत्र यंत्रणा आहेत. आज आमच्या पक्षात जे नेते आले त्यांची कुठलीही चौकशी थांबवण्याचा निरोप अगदी अप्रत्यक्षपणेही आम्ही दिलेला नाही.

प्रश्न : बावनकुळेंचे नाव आज बूथचनेवरील आत्यंतिक भरामुळे सतत चर्चेत असते. तुम्ही नेमकी कशी रचना केली आहे?

उत्तर : बूथरचना यावर गेली दोन वर्षे काम सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक बूथवरील मतदारांच्या यादीचे पालकत्व मी एकेका नेत्याकडे सोपवले आहे. अगदी देवेंद्र फडणवीसही कुठेही असले तरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील दोन बूथची जबाबदारी त्यांनी पार पाडायची आहे. तेथे काय होते आहे, प्रश्न कोणते आहेत, शासनाच्या योजनांचे लाभ मिळाले का, याची तंतोतंत माहिती या नेत्याने आमच्याकडे पाठवायची असते. १९८० पासूनचे ३३ हजार कार्यकर्ते या कामात आहेत. ४८ लोकसभा मतदारसंघांचे १५ भाग तयार केले आहेत. तेथे काय सुरू आहे हे मला कळत असते अन् पक्षाच्या यंत्रणेलाही. आम्ही ही माहिती महायुतीच्या उमेदवारांना कळवत रहातो. या यंत्रणेचे यश चार जूनला समोर येईल. ‘४५ प्लस’ दिसेल.

प्रश्न : महाराष्ट्रात खरी लढाई कुणाशी?

उत्तर : प्रदेशनिहाय बदल आहेत त्यात. भाजप हा सर्व भागातला मुख्य पक्ष. कुठे कमळावर आम्ही लढतोय, कुठे धनुष्यबाणावर तर कुठे नव्याने समवेत आलेल्या घडाळ्यावर. विदर्भात कॉँग्रेसशी लढाई, मराठवाड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी.

प्रश्न : उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे म्हणतात . .

उत्तर : (मध्येच तोडत) स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी, मुलाला मंत्री करण्यासाठी हिंदुत्वाला दूर ठेवत वैचारिक तडजोड करणाऱ्यांबद्दल कसली सहानुभूती !

प्रश्न : मराठा समाज नाराज आहे. त्याचा मतदानावर परिणाम होईल? भाजपला फटका बसेल . .?

उत्तर : समाजगटांना भडकावण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात यशस्वी होवू शकत नाहीत. विकास हाच एकमेव विषय आहे. मुस्लिम समुदायातील मंडळीही मोदींच्या विकासयात्रेला पाठिंबा देणार आहेत.

प्रश्न : निकालांनंतर महाराष्ट्रात काही राजकीय बदल होतील?

उत्तर : आम्ही सगळे एक आहोत. शिंदे आमचे नेते आहेत. शिंदे-फडणवीस-अजित पवार ही महाराष्ट्रासाठी एक आलेली मंडळी आहेत. एकदिलाने एकसाथ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT