संग्रहित छायाचित्र
esakal
Over 100 Naxalites including a top leader surrender in Chhattisgarh: केंद्र सरकारच्या नक्षलविरोधी अभियानास आणि २०२६पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पास यश येत असल्याचं दिसत आहे. कारण, मोठ्याप्रमाणात नक्षलवादी आणि मोठा इनाम असणारे नक्षलवाद्यांचे लीडर देखील आत्मसमर्पण करत आहेत.
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील कोयलीबेडा पोलीस स्टेशन परिसरात तब्बल १०० हून अधिक नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, अद्याप याबाबत अधिकृतपणे माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. अधिकारी सध्या यावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत आहेत. सर्वप्रथम या नक्षलवाद्यांचे रेकॉर्ड पोलिस तपासतील आणि उद्या किंवा परवा या संदर्भात माहिती जाहीर करतील अशी चर्चा आहे.
कोयलीबेडा पोलीस स्टेशन परिसरातील कामटेडा बीएसएफ कॅम्पमध्ये १०० हून अधिक नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. तर छत्तीसगडमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे नक्षलवादी आत्मसमर्पण असल्याचे म्हटले जात आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये रावघाट एरिया कमिटीचा प्रमुख नक्षलवादी नेता राजू सलाम, मीना, प्रसाद आणि भास्कर यांच्यासह १०० हून अधिक नक्षलवाद्यांचा समावेश आहे. तर अशीही माहिती समोर येत आहे की, पोलिस प्रथम या सर्व नक्षलवाद्यांचे रेकॉर्ड तपासतील आणि उद्या किंवा परवा याबाबत अधिकृ माहिती जाहीर करतील.
दरम्यान, बुधवारी सुकमा जिल्ह्यात एकूण २७ सक्रिय माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यात ५० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांनी सुकमा जिल्हा मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शस्त्रे टाकली आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची इच्छा व्यक्त केली.