Increase in heat in Delhi Mumbai Kolkata Report of CSE Sakal
देश

काँक्रिटीकरण, आर्द्रता महानगरांना ‘ताप’दायक; दिल्ली, मुंबई, कोलकत्यात उष्णतेत वाढ; ‘सीएसई’चा अहवाल

सीएसई’ने दिल्ली, मुंबई, कोलकता, हैदराबाद, बंगळूर आणि चेन्नई या महानगरांतील जानेवारी २००१ ते एप्रिल २०२४ या कालावधीत उन्हाळ्यातील हवेचे तसेच जमिनीचे तापमान आणि आर्द्रतेच्या डेटाचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशभरात यंदा कडक उन्हाळा असून राजस्थानसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. महानगरांमध्ये वाढते काँक्रिटीकरण, आर्द्रतेच्या वाढत्या पातळीमुळे उष्णता वाढत असून या शहरांत दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता रात्रीही तापमान कमी होत नसल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई)च्या नव्या अहवालात म्हटले आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

सीएसई’ने दिल्ली, मुंबई, कोलकता, हैदराबाद, बंगळूर आणि चेन्नई या महानगरांतील जानेवारी २००१ ते एप्रिल २०२४ या कालावधीत उन्हाळ्यातील हवेचे तसेच जमिनीचे तापमान आणि आर्द्रतेच्या डेटाचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला.

वाढलेल्या आर्द्रतेमुळे दिल्ली, हैदराबाद या महानगरांतील सर्व हवामान क्षेत्रांत पूर्वीप्रमाणे हवेच्या तापमानात किरकोळ घटही होऊ शकत नाही, असे या संस्थेच्या विचारगटाला आढळले. केवळ बंगळूर वगळता २००१ ते २०१० च्या तुलनेत २०१४ ते २०२३ या काळात इतर महानगरांत उन्हाळ्यातील सरासरी सापेक्ष आर्द्रता पाच ते दहा टक्क्यांनी वाढली आहे.

देशातील अनेक भागांना उष्णतेच्या तीव्र लाटेने आपल्या कवेत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन प्रकाशित झाले आहे. देशातील सर्व महानगरांत गेल्या दोन दशकांत वेगाने काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे, ती अधिक तापत आहेत.

उष्णतेच्या बदलत्या स्वरूपाचा सामना करण्यासाठी महानगरांसाठी सर्वसमावेशक उष्णता व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी सापेक्ष आर्द्रता, जमिनीचे तसेच दिवस-रात्रीचे तापमान आदी घटक लक्षात घेण्याची आवश्यकता असल्याचेही सीएसईच्या कार्यकारी संचालक (संशोधन व विधी विभाग) अनुमिता रॉयचौधरी यांनी नमूद केले.

देशातील मुंबई, दिल्लीसारखी महानगरे उन्हाळ्यात दिवसा तापल्यानंतर रात्रीही थंड होत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. दिवसाच्या कमाल तापमानानंतरही रात्र उष्ण राहिल्याने लोकांना फारसा दिलासा मिळत नाही. त्यामुळे, उष्ण रात्री दिवसाच्या कमाल तापमानाइतक्याच धोकादायक ठरु शकतात.

महानगरांतील रात्रीचे तापमान २००१ ते २०१० दरम्यान दिवसाच्या कमाल तापमानाच्या तुलनेत ६.२० ते १३.२० अंश सेल्सिअसने कमी होत होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान त्यात ६.२० ते ११.५० अंशांची घट झाली, असे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. अतिउष्ण रात्रींमुळे भविष्यात मृत्यूचा धोका सहापट वाढू शकतो.

हवामान बदलाच्या मॉडेलच्या आधारे दिवसाच्या सरासरी उष्णतेपेक्षाही हा मृत्यूदर अधिक असू शकतो, असे सीएसईचे वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक अविकाल सोमवंशी यांनी सांगितले. वाढत्या आर्द्रतेमुळे दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई मॉन्सूनपूर्व काळापेक्षा उष्ण होत आहेत. केवळ वृक्षराजी वाढल्याने रात्रीची उष्णता कमी होणार नाही, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये तापमानाचा उच्चांक

चंडीगड: पंजाबमध्ये लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू असताना उच्चांकी तापमानाने विक्रम मोडले आहेत. भटिंडा येथे सर्वाधिक ४८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमृतसर, लुधियाना, पतियाळा, पठाणकोट, फरिदकोट येथे उष्णतेच्या लाटेचे परिणाम जाणवत आहेत.

या कारणांमुळे पंजाबमधील सहा जिल्ह्यातील कमाल तापमान ४५ अंशापेक्षा अधिक राहिले आहे. भटिंडाचे कमाल तापमान पाहिल्यास पतियाळा, लुधियाना, जालंधर येथील उच्चांकी तापमानाला मागे टाकले आहे. लुधियानात यापूर्वी १९४४ मध्ये ४८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याचप्रमाणे १९९८ मध्ये पतियाळा येथे ४७ अंशांची नोंद झाली होती. त्याचवेळी अमृतसर येथे २०१३ मध्ये ४८ अंशांवर तापमान पोचले होते.

प्रमुख निरीक्षणे

  • कोलकत्यात सर्वाधिक काँक्रिटीकरण व सर्वांत कमी वृक्ष

  • दिल्लीत सर्वांत कमी काँक्रिटीकरण व सर्वाधिक वनराजी

  • दोन दशकांत मुंबई, कोलकता, चेन्नईत बांधकामाचे क्षेत्रफळ दुप्पट

  • या महानगरांतील वृक्षसंपदेत १४ टक्क्यांनी घट

अधिक तापमान आणि आर्द्रता यांचे एकत्रीकरण मानवी शरीर घामाच्या माध्यमातून थंड ठेवणाऱ्या मुख्य शीतलीकरण यंत्रणेवर परिणाम करू शकते. त्यामुळे, या एकत्रीकरणाचा सामना करणे महत्त्वाचे आहे. घामातून होणारे बाष्पीभवन आपले शरीर थंड करते. मात्र, आर्द्रतेची उच्च पातळी या नैसर्गिक शीतलीकरणास मर्यादित करते. त्यामुळे, लोकांना अधिक उष्णतेचा सामना करावा लागून ते आजारीही पडू शकतात.

- अविकाल सोमवंशी, वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक, सीएसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT