Nitish Kumar and Navin Patnaik sakal
देश

राज्यरंग : ओडिशा : नवीनबाबूंचे पुन्हा ‘एकला चलो रे’...

आगामी निवडणुकीत बिजू जनता दल सर्व पक्षांना समान अंतरावर ठेवणार असल्याचे नवीन पटनाईक यांनी स्पष्ट करीत पुन्हा एकदा ‘एकला चलो़ रे’चा नारा दिला आहे.

धनंजय बिजले d.bijale@gmail.com

आगामी निवडणुकीत बिजू जनता दल सर्व पक्षांना समान अंतरावर ठेवणार असल्याचे नवीन पटनाईक यांनी स्पष्ट करीत पुन्हा एकदा ‘एकला चलो़ रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे विरोधी नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. पण त्याची तमा न बाळगता नवीनबाबू शांतपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास भेटून विनंती केल्यानंतरही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक पाटण्यात झालेल्या भाजपविरोधी पक्षांच्या बहुचर्चित बैठकीला उपस्थित राहिलेच नाहीत. विरोधकांसमवेत उभे राहण्यास त्यांनी ठाम नकार दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा बिजू जनता दल भाजप तसेच काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांपासून समान अंतरावर राहणार असल्याचे पटनाईक यांनी स्पष्ट करीत पुन्हा एकदा ‘एकला चलो़ रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा हिरमोड झाला असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तर त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पण त्याची भीडभाड न ठेवता नवीनबाबू शांतपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

७६ वर्षीय नवीन पटनाईक सध्या सर्वांत अनुभवी मुख्यमंत्री आहेत. २००० मध्ये ते सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सलग पाच वेळा निवडणुका एकहाती जिंकण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. पवन चामलिंग आणि ज्योती बसू यांच्यानंतर सलग इतका काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे पटनाईक एकमेव नेते आहेत.

ओडिशात भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही राष्ट्रीय पक्षांना समान अंतरावर ठेवत स्वतःचे स्वतंत्र राजकारण करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. राजकारणात अंतर ठेवूनही त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. संजय गांधी हे त्यांचे वर्गमित्र. पण म्हणून ते कधी काँग्रेसच्या वळचणीला लागले नाहीत.

ओडिशात सत्ता मिळवण्यासाठी गेली काही वर्षे भाजप जंग-जंग पछाडत आहे. २०१९च्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजपने ओडिशा जिंकण्याचा जोरदार प्रयत्न केला. तथापि, ओडिशाच्या मतदारांनी भाजपला साफ नाकारत नवीनबाबूंच्याच पारड्यात सत्तेचे माप टाकले.

राज्याला काढले गरिबीतून बाहेर

देशातील नऊ गरीब राज्यांत ओडिशाचा समावेश होतो. त्यामुळे सत्ताशकट हाकताना पटनाईक यांची कसोटी लागली. अमेरिकेत शिकलेले नवीन पटनाईक वडील आणि माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या निधनानंतर देशात परतले आणि कायमचे भुवनेश्वरला स्थिरावले.

आजही त्यांना उडिया ही स्थानिक भाषा अस्खलितपणे बोलता येत नाही. पण त्यांना जनतेच्या डोळ्यातील गरिबी ओळखता आली. त्यामुळे राजकारणात त्यांना भाषेचा अडसर आला नाही. २३ वर्षांपूर्वी जेव्हा त्यांना प्रथम सत्ता मिळाली तेव्हा ओडिशातील गरिबीचे प्रमाण तब्बल २९ टक्के होते. गरिबीचे हेच प्रमाण आता दहा टक्क्यांवर आणण्यात पटनाईक यांना यश आले आहे.

एकप्रकारे ही ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागेल. कल्याणकारी योजना, ग्रामीण तसेच जिल्हा स्तरावर महिलांना राजकारणात प्राधान्य आणि पायाभूत विकासाचा विस्तार ही त्यांच्या यशाची त्रिसूत्री मानली जाते.

विशेष म्हणजे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना त्यांच्या कारकिर्दीवर कधीही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. वादग्रस्त विधानांपासून चार हात दूर राहणारे पटनाईक शांत व संयमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. पण पक्षांतर्गत विरोधकांना ते तितक्याच निर्दयपणे संपवून टाकतात.

चक्रीवादळ आणि ओडिशा यांचा निकटचा संबंध. चक्रीवादळात त्यांनी केलेल्या मदत व पुनर्वसानाची दखल साऱ्या जगाने घेतली आहे. एकेकाळी हॉकीपटू असलेल्या नवीन पटनाईक यांनी भारतीय हॉकी संघाला प्रायोजकत्व दिले आहे. अशा प्रकारे भारतीय संघाचे प्रायोजकत्व स्वीकारलेले ओडिशा हे देशातील एकमेव राज्य असेल.

राज्यात भाजप टोकाचा विरोध करीत असूनही नवीनबाबू मधूनच केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या या गुगलीने अनेकदा राज्यातील भाजप नेते बुचकाळ्यात पडतात. उदाहरणादाखल बोलायचे झाल्यास राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा असो किंवा संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो सर्व विरोधकांनी भाजपला कडाडून विरोध केला.

पण पटनाईक यांनी आश्चर्यकारक भूमिका घेत मोदींना साथ दिली. वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी उभय नेत्यांनी एकमेकांची स्तुतीही केली. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते हवालदिल झाले. पण लगेचच दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला पटनाईक यांनी दांडी मारत भाजपने फार हुरळून जाण्याची गरज नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

पटनाईक यांना राज्यातील जनतेची नाडी पुरती माहिती आहे. त्यामुळेच ते योग्य वेळी मोदी सरकारच्या धोरणांना पाठिंबा देतानाच राज्यात मात्र भाजपची डाळ शिजू देत नाहीत.

भाजपचे आस्ते कदम

कर्नाटकमधील पराभवानंतर केंद्रातील भाजप नेत्यांनी पटनाईक यांना फार अंगावर घ्यायचे नाही असे धोरण अवलंबल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दल तसेही पुन्हा विजयी होणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे केंद्रात गरज पडल्यास किंवा विरोधकांच्या एकीला सुरुंग लावण्यासाठी त्याचप्रमाणे राज्यसभेत विधेयके संमत होण्यासाठी प्रसंगी पटनाईक यांची मदत घेण्याची वेळ मोदी सरकारला येवू शकते.

हे राजकीय आराखडे लक्षात घेत भाजपही ओडिशात फार आक्रमक भूमिका घेणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळेच पटनाईक यांनी सर्व राष्ट्रीय पक्षांना समान अंतरावर ठेवण्याचे ठरविलेले आहे. त्यांची ही ‘सोची समझी चाल़’ त्यांना पुन्हा सत्तेपर्यंत घेऊन जाईल, असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT